मुंबई : जेष्ठ लेखक व पत्रकार शिरीष कणेकर यांच्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी प्रकुती खालावल्याने शिरीष यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचार सुरु होण्यापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी १२.२७ वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे इतके होते.
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभलेख विशेष गाजले. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीषासन' या विनोदी लेखनामुळे त्याची ओळख निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर अवकळा आली आहे. इंडियन एक्सप्रेस आणि फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रांतून त्यांनी काम केले तर अनेक मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभ लेखन केले आहे.
त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’ इ.स. १९९९, नाशिक महापालिका वाचनालयातर्फे ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार तसेच ‘लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.