स्पेनमधील सत्तानाट्य

25 Jul 2023 21:04:50
Spain election Right-wing bloc fails to secure majority

एकीकडे भारतातील राजकीय मंडळी २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकांकडे डोळे लावून असतानाच, दुसरीकडे स्पेनमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या चर्चांना चांगलेच उधाण आले. रविवार, दि. २३ जुलै रोजी स्पेनमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर समोर आलेल्या ‘ओपिनियन पोल’ने विरोधी पक्ष ’पार्टिडो पॉप्युलर’ (पीपी) या पुराणमतवादी पक्षाने आपल्या जागांच्या संख्येत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय फायदा मिळवून, सत्ताधारी पक्ष ’पार्टिडो सोशलिस्टा ओब्रेरो एस्पॅनोल’ (पीएसओई) दुसर्‍या क्रमांकावर येण्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज एकाअर्थी खराही ठरला, पण ‘पीएसओई’ने जिंकलेल्या जागांच्या संख्येने ‘ओपिनियन पोल’ची समीकरणे बर्‍यापैकी बिघडल्याचे दिसते. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हे जवळपास एक दशकापासून स्पॅनिश निवडणुकीच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिलेले कल कायम राहिले आहेत.

स्पॅनिश निवडणुकांच्या आलेल्या अंतिम निकालानुसार ‘पीपी’ने १३६ जागा, तर ‘पीएसओई’ने १२२ जागा जिंकल्या आहेत. बहुतांश ‘ओपिनियन पोल’मध्ये ‘पीपी’ सुमारे १४० जागा व ‘पीएसओई’ १०५ ते ११० जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, ‘पीएसओई’ने १२२ जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. कारण, नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन जागांची त्यात भर पडली आहे. उजव्या विचारसरणीच्या ’वोक्स’ने यंदा ३३ जागांवर आपले वर्चस्व स्थापन केले, तर योलांडा डियाझ यांच्या नेतृत्वाखालील डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या युतीने ३१ जागांवर आपला झेंडा फडकवला आहे.

निवडणुकीत समोर आलेले निकाल काहीसे अनिश्चित चित्र दाखवतात. कारण, पूर्ण बहुमतासाठी १७६ जागा आवश्यक आहेत. त्यामुळे आता स्पॅनिश संसदेच्या खालच्या सभागृहात कुठल्याही पक्षाला पुढील सरकार स्थापन करायचे झाल्यास, राजकीय सौदेबाजीचा पर्याय निवडावा लागणार असल्याचेच दिसते. ‘पीपी’ असो किंवा ‘पीएसओई’, कोणत्याही पक्षाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवण्याची अपेक्षा नव्हती. परंतु, ‘ओपिनियन पोल’ पाहिल्यास त्यात ’पीपी आणि ‘वोक्स’ असे युतीचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. हे दोन पक्ष स्पेनमधील काही स्वायत्त समुदायांमध्ये सहयोगी जरी असले, तरी त्यांची १६९ ही एकूण संख्याही बहुमतापेक्षा कमीच!

२०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘कॅटालोनिया’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती. कॅटालोनिया हा स्पेनमधील एक स्वायत्त समुदाय. शासन आणि महसूल वाटणीमधील स्वायत्तता यावरून मॅड्रिडशी अनेक दशकांपासून वादात राहिलेला हा समुदाय. यासह अनेक राजकीय पक्षांनी स्पेनपासून स्वातंत्र्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आहे. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. याकारणास्तव नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा सांचेझने कॅटलान राजकीय पक्षांशी बोलणी केली. या वाटाघाटीनुसार, कॅटालोनियामधील डाव्या पक्षांच्या युती असलेल्या ’एम कोमू पोदेम’ने सांचेझला पाठिंबा दिला आणि ‘एस्केरा रिपब्लिकना कॅटालुनिया’ (इआरसी) हा स्वातंत्र्य समर्थक कॅटलान पक्ष मतदानापासून दूर राहिला. या व्यवस्थेमुळे अखेरीस जानेवारी २०२० मध्ये सांचेझला त्यांच्या सरकार स्थापन करण्यात मदत झाली. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता, सांचेझला सरकार स्थापन करायचे असल्यास अशाच लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचा मार्ग आहे.

‘वोक्स’ला मिळालेल्या जागांचा काही परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसून आला. नोव्हेंबर २०१९ मध्ये ५२ जागा जिंकणार्‍या ‘वोक्स’ला यावेळी केवळ ३३ जागा जिंकता आल्या. तब्बल १९ जागा गमावल्यामुळे ‘पीपी’ला याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसते. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पुन्हा राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. ‘पीएसओई’ आणि ‘पीपी’ सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, असे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल की नाही, हे सांगणे कठीण. त्यामुळे सद्यस्थिती पाहता, येत्या काही महिन्यांत स्पेनमध्ये पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Powered By Sangraha 9.0