पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यानंतरच चीनसोबत संबंध सुधारणार : एनएसए अजित डोवाल

25 Jul 2023 17:51:53
National Security Adviser Ajit Doval On Ladakh

नवी दिल्ली
: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे चीनचे परराष्ट्र विभागातील अधिकारी वांग यी यांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांनी लडाखसारख्या सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित झाली तरच चीनसोबत संबंध सुधारणार असे त्यांनी यी यांना सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे फ्रेंड्स ऑफ ब्रिक्स कार्यक्रमात एनएसए अजित डोवाल सहभागी झाले होते. तेथे त्यांनी चीनच्या परराष्ट्र विभागाचे सर्वोच्च अधिकारी वांग यी यांची भेट घेतली.

भेटीविषयी परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, भारत-चीन सीमेच्या पश्चिम सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थितीमुळे २०२० पासून दोन्हीव देशातील धोरणात्मक विश्वासासह सार्वजनिक आणि राजकीय संबंध कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असल्यास त्यासाठी सीमावर्ती भागातील परिस्थितीचे निराकरण करणे आवश्यक आहे. सीमाप्रश्न सुटल्याशिवाय दोन्ही देशांमध्ये संबंध सामान्य होणार नाही, असेही त्यात म्हटले आहे.

दरम्यान, द्विपक्षीय संबंध लवकरात लवकर मजबूत आणि स्थिर विकासाच्या मार्गावर आणले पाहिजेत. भारतासह अनेक विकसनशील देशांसोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे लोकशाहीकरण आणि बहुपक्षीयतेला पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला अधिक न्याय्य दिशेने नेण्यास चीन तयार आहे, असे वांग यांनी डोवाल यांना सांगितले.

Powered By Sangraha 9.0