मिझोराममध्येही मैतेई मृत्युछायेत...

24 Jul 2023 20:42:36
panic among the small community of Meiteis residing in Mizoram

मणिपूरमध्ये कुकी समुदायाविरोधात हिंसाचार झाला असून, यामुळे मिझो तरुण दुखावले आहेत, असा त्यांचा दावा आहे. राज्य न सोडल्यास मिझोराममध्ये राहणार्‍या मैतेई लोकांना काही झाले, तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील, अशी धमकीही त्यांनी दिली. मिझो हेदेखील कुकी वंशाचे असल्याचा या संघटनेचा दावा. त्यामुळे त्यांनी केवळ मैतेई समुदायालाच राज्य सोडून जाण्यास सांगितले आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून मणिपूरमध्ये महिलांविषयी घडलेल्या घृणास्पद प्रकारावरून गदारोळ सुरू आहे. हा प्रकार देशासाठी लज्जास्पद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते. त्यानंतर या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आम्ही चर्चेस तयार आहोत, असे सरकारतर्फे वारंवार सांगूनही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप आणि अन्य विरोधी पक्ष संसदेत गदारोळ घालत आहेत. मणिपूरविषयी सविस्तर चर्चा होऊ द्या, त्यामुळे सत्य काय आहे, हे जगासनोर येईल, असे आवाहन सोमवारीदेखील केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले. त्यामुळे सोमवारी या विषयावर चर्चा होईल, असे वाटत असतानाच, विरोधी पक्षांनी मात्र गदारोळ घालण्यातच धन्यता मानली. त्यामुळे एवढ्या संवेदनशील विषयावर एकीकडे चर्चेची मागणी करायची आणि दुसरीकडे चर्चेची तयारी दाखविली की, गदारोळ घालायचा; अशी अजब भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांना या घटनेचे केवळ राजकारण करायचे आहे की, संसदेत चर्चेद्वारे कुकी समुदायाद्वारे मैतेईंवर होणारे अत्याचार, कुकी समुदायाचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग या आणि अशा अनेक गोष्टी पुढे येऊन एक विशिष्ट ‘अजेंडा’ नष्ट होण्याची त्यांना भीती आहे; यावर विचार करणे आवश्यक ठरते.

मणिपूरमध्ये कुकी समुदायातील महिलांविषयी जे झाले, ते निश्चितच समर्थनीय नाही. या घटनेतील गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच. मात्र, सध्या त्या घटनेवरून मैतेई समुदायास गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न विशिष्ट ‘इकोसिस्टिम’द्वारे होत आहे. त्यामुळे मणिपूरच्या संघर्षाचे मोठ्या प्रमाणात बळी असलेल्या मैतेईंवर होत असलेले अत्याचार बेमालूमपणे दुर्लक्षित केले जात आहेत. कारण, मणिपूरमध्ये कुकी समुदायाने मैतेईंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले आहेत, त्यांच्या हत्या केल्या आहेत आणि घरे जाळली आहेत; असे विविध माध्यमांतून समोर आले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणार्‍या पैशांतून गबर झालेल्या कुकींकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत, त्यांचे प्रचारतंत्र प्रशिक्षित आहे आणि त्यांना परकीय मदतदेखील मिळते. त्याच्या जोरावर मणिपूरमध्ये आणि केवळ कुकीच कसे बळी ठरत आहेत, हा प्रपोगंडा निर्माण करण्यास कुकींना यश आल्याचे दिसते. त्यामुळेच आज कुकींकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना आता मिझोराममधूनही मैतेईंना आपला जीव वाचविण्यासाठी पलायन करावे लागत आहेत. मात्र, सध्या कुकींचाच गलबला एवढा आहे की, त्यामुळे मैतेईंना कोणी वाली आहे की, नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आता मिझोराममधील मैतेई समुदायाला धमकी मिळाली आहे की, जर त्यांना त्यांचा जीव वाचवायचा असेल, तर तातडीने मिझोराम सोडून निघून जावे. ’पीस अ‍ॅकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन’ (पीएएमआरए) नावाच्या संस्थेने धमकीचे हे निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, शेजारच्या मणिपूर राज्यात महिलांची नग्न परेड करून सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मिझोराममधील तरुणांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ‘पीएएमआरए’ ही बंडखोर संघटना होती, ज्यांनी शस्त्रे सोडल्याचा दावा केला होता. एक बिगर राजकीय संघटना म्हणून स्वतःची ओळख ही संघटना सांगते.

मणिपूरमध्ये कुकी समुदायाविरोधात हिंसाचार झाला असून, यामुळे मिझो तरुण दुखावले आहेत, असा त्यांचा दावा आहे. राज्य न सोडल्यास मिझोराममध्ये राहणार्‍या मैतेई लोकांना काही झाले, तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील, अशी धमकीही त्यांनी दिली. मिझो हेदेखील कुकी वंशाचे असल्याचा या संघटनेचा दावा. त्यामुळे त्यांनी केवळ मैतेई समुदायालाच राज्य सोडून जाण्यास सांगितले आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारशीही चर्चा केली आहे. एका अंदाजानुसार, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि मजुरांसह सुमारे दोन हजार मैतेई मिझोरामची राजधानी ऐझॉलमध्ये राहतात. यामध्ये महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश आहे. शनिवार, दि. २२ जुलैपर्यंत यातील बरेच लोक मणिपूरला परत गेले आहेत. मिझोराममध्ये मैतेई समुदायाच्या असलेल्या दुकानांवर आणि व्यवसायांवरही बहिष्कार टाकण्याची मोहीम चालविण्यात येत आहे. त्यामुळे आता येथे राहणारे मैतेई मणिपूर किंवा अन्य राज्यांमध्ये जाण्यास प्रारंभ झाला आहे. पलायन करणार्‍यांमध्ये सरकारी कर्मचारी, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी अशा सर्वस्तरातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

दुसरीकडे भारतीय सैन्याच्या कारवाईमध्येही कुकी समुदाय आपल्यातीलच महिलांचा वापर करत असल्याचेही सिद्ध झाले आहे. भारतीय सैन्याने प्रदर्शित केलेल्या एका चित्रफितीमध्ये भारतीय सैन्याच्या ’स्पीयर्स कॉर्प्स’ने त्याविषयी निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ’मणिपूरमधील महिला कार्यकर्त्या जाणूनबुजून सैन्यदलाचा मार्ग अडवत आहेत आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करत आहेत. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गंभीर परिस्थितीत सुरक्षा दलांनी वेळेवर दिलेल्या प्रतिसादासाठी असा अनावश्यक हस्तक्षेप हानिकारक आहे. भारतीय लष्कर सर्व घटकांना शांतता प्रस्थापित करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मणिपूरच्या घटनेस अनेक कंगोरे आहेत. महिलांवर अत्याचार झाले. दि. ४ मे रोजी आणि त्याची चित्रफित सार्वजनिक झाली ती दि. १९ जुलै रोजी, म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर. त्यामुळे साहजिकच पावसाळी अधिवेशनावर परिणाम व्हावा, याच हेतूने संबंधितांनी ही चित्रफित तब्बल ७५ दिवस दडवून ठेवण्यात आली, असा आरोप करण्यासही वाव आहे. खरे तर एवढ्या भयानक घटनेची चित्रफित संबंधितांनी तातडीने राज्य पोलिसांकडे देण्याची गरज होती. जेणेकरून आरोपींना तत्काळ अटक झाली असती. मात्र, त्यामुळे या घटनेवरून मणिपूरचे भाजप सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याची संधी हिरावली जाईल, असा विचार करण्यात आला असण्याचा संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळेच मणिपूरच्या संघर्षाचा विचार हा भावनातिरेकातून न करता नेमक्या परिस्थितीच्या आधारेच करण्याची गरज आहे.


Powered By Sangraha 9.0