‘कॅनव्हास’वरील भव्य चित्रकृतींचा ‘उद्देश’

24 Jul 2023 20:29:28
Article On Uddesh Govardhan Paghal

धरतीच्या ‘कॅनव्हास’वर भव्यदिव्य चित्रकृती साकारत आठ विक्रमांवर नाव कोरणार्‍या उद्देश पघळ यांची अभिनव चित्रकहाणी...

उद्देश गोवर्धन पघळ हा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराईचा. एका उच्चशिक्षित सुखवस्तू कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील जिल्हा बँक व्यवस्थापक म्हणून कार्यरत. घरात मागील अनेक पिढ्यांमध्ये कुणी कलाकार-चित्रकार नाहीत, तरीही उद्देश बालपणापासून सुरेख चित्र काढायचा. त्याच्या चित्रांचे पालक कौतुकही करत. मात्र, मोठा झाल्यावर आपल्या मुलाने कला छंद म्हणून जोपासावा, परंतु करिअर इंजिनिअरिंगमध्ये करावे, असे त्यांच्या पालकांना वाटे. उद्देशच्या मनात चित्रकारितेशिवाय काहीच येत नसे. उद्देशच्या मावसभावाने त्याची चित्रे पाहून त्याने दहावीनंतर चित्रकारितेचा पायाभूत अभ्यासक्रम करावा असे सुचवले. कलेच्या क्षेत्रात अतिमागास असणार्‍या बीडसारख्या शहरात उद्देशच्या चित्रकलेला बहर येणे शक्य नव्हतेच.

मुलाने भरगच्च पगार देणार्‍या रोजगार संधी सोडून चित्रकारितेचे शिक्षण घ्यावे, असे त्यांच्या पालकांनाही वाटत नव्हते. चित्रकारितेमध्येच करिअर करणार या विचारावर उद्देश ठाम होता. साहजिकच कला शिक्षणासाठी त्याला घरातूनच विरोध झाला. उद्देशने विरोध पत्करून छ. संभाजी नगर येथील यशवंत चित्रकला महाविद्यालयात पायाभूत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या क्षेत्रात करिअर करायचे, तर मराठवाड्यासारख्या कलेतील मागास भाग सोडून पुण्या-मुंबईतच जावे लागणार, हे त्याने जाणले होतेच. म्हणूनच पुण्यात त्याने ‘जीडी आर्ट’मध्ये प्रवेश घेतला. पुण्यात गेल्यावर त्याला त्याचे मामा शुक्राचार्य जाधव, भीष्माचार्य जाधव यांनी मोठी आर्थिक मदत केली आणि चित्रकारितेमध्ये करिअरसाठी प्रोत्साहन दिले.

हातात उपजत कला असल्याने उद्देशने तेथील शिक्षणात स्वतःला झोकून दिले. पहिल्याच वर्षीत त्याने रेखाटलेली सुरेख चित्रे पाहून महाविद्यालयातील वरिष्ठ विद्यार्थी त्याला ’कमिशन वर्क’ साठी कामाला घेऊन जात. हरीश सोनवणे, अभिजित मस्के आणि अंकित कुंभार या सिनिअर मित्रांनी उद्देशला अनेक व्यावसायिक कामे मिळून देण्यात मोलाची मदत केली. ’लर्निंग व्हिथ अर्निंग’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून उद्देशने पुण्यात गेल्यापासून पहिल्या वर्षांपासूनच कमाईला प्रारंभ केला. ‘लॉकडाऊन’नंतर विजयसिंह पंडित यांनी उद्देशला प्रथम जागतिक विक्रम करणारे भव्य शिवाजी महाराजांचे चित्र काढण्यासाठी संधी दिली. चित्रासाठी धरतीच्या ’कॅनव्हॉस’वर ’ग्राफ’ टाकण्याचे काम करावे लागणार होते. उद्देशचे गणित आणि मोजमाप तुलनेने कच्चे असल्याने ’ग्राफ’मधून शिवरायांचे प्रमाणबद्ध व्यक्तिचित्र जमणार की, नाही, याबद्दल तो सांशक होता. त्यावेळी पंडित याने त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकून मदतीसाठी शाळेतील गणित शिक्षकवर्ग मदतीला दिला. उद्देशनेच अवघ्या तीन दिवसांत दगड आणि चुन्यातून १५ हजार चौरस फुटांचे भव्य शिवाजी महाराजांचे चित्र साकारले. गेवराईत साकारलेल्या या चित्राची नोंद ’वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये सर्वात भव्य चित्र म्हणून घेण्यात आली. हे आणि त्यानंतर सर्वच चित्रे भव्यदिव्य आणि ड्रोनद्वारेच पाहता येतील, इतके भव्य चित्रे काढण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला.

धरतीच्या ’कॅनव्हॉस’वर भव्य चित्रकृती काढणारा चित्रकर्मी म्हणून अल्पावधीच उद्देशची ओळख सर्वदूर झाली. नंतर गेवराई येथे त्याने गव्हाची पेरणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ३० हजार चौरस फुटाचे भव्य व्यक्तिचित्र हुबेहूब काढले. उंच आकाशातून दिसणार्‍या या सर्व कलाकृतींतून भव्यतेची साक्ष देत चर्चेचा विषय ठरल्या. त्याच वर्षी उद्देशने अहिल्यादेवी नगर येथील जामखेड येथे राजमाता जिजाऊ यांचे १५ हजार चौरस फुटांचे पाषाण, माती अन् चुन्यापासून निर्मित भव्य चित्र साकारले. त्याचीही नोंद ‘इंडिया बूक’ मध्ये झाली. या चित्रासाठी आपली ताई अंजली बोराडे व जिजाजी पंकज बोरडे यांची मोठी मदत झाली, हे सांगण्यास उद्देश विसरत नाही.

शिवजयंतीचे औचित्य साधून खर्डा किल्ल्याजवळ त्याने शिवरायाचे एक एकर परिसरात भव्य चित्र त्याने साकारले. नाशिकजवळील पिंपळगाव बसवंत येथेही शिवजयंतीनिमित्त त्याने १५ हजार चौरस फूट आकारात फायबर, गवतापासून भव्य शिवाजी महाराजांची प्रतीमा साकारली. ४० हजार पणत्यांपासून अहिल्याबाईंचे, ३० हजार घोटीव कागदांपासून शिवरायांचे चित्र काढून त्याने विक्रमाची श्रृंखला सुरू ठेवली. उद्देश आज पुण्यात चित्रकारितेच्या क्षेत्रात स्थिरावला असून, वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी त्याचे मासिक उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. “कलेचे शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात विलक्षण संधी आणि पैसा आणि आदर आहे. मात्र, त्यासाठी जगापेक्षा काही निराळे ‘आऊट ऑफ द बॉक्स’ देण्याचा प्रयत्न करावा,” असे तो सांगतो.

अत्यंत शांत स्वभावाचा उद्देश आपले आजोबा ‘बीड जिल्हा म. बँके’चे माजी अध्यक्ष अश्रुबा पघळ यांना आदर्श मानतो. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार असल्याचे तो सांगतो. छ. संभाजी नगर येथे जायकवाडी धरणाच्या पाण्यावर भव्य आकाराचे छ. संभाजी महाराजांचे चित्र आगामी काळात साकारण्याचा मानस आहे. त्यासाठी उद्देशला दै. ’मुंबई तरुण भारत’कडून असंख्य शुभेच्छा.

निल कुलकर्णी
९३२५१२०२८४


Powered By Sangraha 9.0