फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. कारण, युक्रेन अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या ‘नाटो’ संघटनेत सहभागी होण्यासाठी आग्रही होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की त्यासाठी प्रयत्नरत होते. रशियाने वेळोवेळी इशारा देऊनही युक्रेन ’नाटो’मध्ये सहभागी होण्यावर अडून राहिला. याच कारणामुळे युक्रेनच्या पूर्व भागावर हल्ला करून रशियाने युद्ध छेडले. युक्रेन ‘नाटो’त सहभागी झाल्यास त्या जोरावर अमेरिका वरचढ ठरू शकते, ही चिंता रशियाला सतावत असल्याने युद्धारंभ झाला. युद्धाच्या झळा सोसूनही युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याची आपली मागणी कायम ठेवली आहे.
बाल्टिक देश लिथुआनियामध्ये नुकतेच ‘नाटो’चे वार्षिक शिखर संमेलन संपन्न झाले. यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसह आणि ‘नाटो’चे अनेक नेते सहभागी झाले. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनीही या संमेलनात सहभाग घेत ‘नाटो’चे सदस्य होण्याची मागणी पुढे रेटली. झेलेन्स्की यांची ही मागणी मान्य झाली नाही. परंतु, रशियाविरोधात युद्धादरम्यान सहकार्य करण्याचे आश्वासन ‘नाटो’ने युक्रेनला दिले. युक्रेनला ‘नाटो’चे सदस्यत्व का हवे आहे आणि ‘नाटो’ व पश्चिमी देश युक्रेनला सहकार्य करत असताना, ते युक्रेनला ‘नाटो’ सदस्यत्व देण्यास का टाळाटाळ करीत आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
‘नाटो’ अर्थात ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ची स्थापना दि. ४ एप्रिल १९४९ रोजी झाली. १२ संस्थापक देशांनी वॉशिंग्टन येथे यासंदर्भात करार केला. ’नाटो’ एक आंतरसरकारी सैन्य संघटना असून, त्याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये आहे. सध्या ‘नाटो’चे ३१ सदस्य असून, २०२३ फिनलंडला सदस्यत्व देण्यात आले. ’नाटो’च्या कोणत्याही सदस्य देशावर आक्रमण झाले, तर ते सर्व सदस्य देशांवर झालेले आक्रमण मानले जाते. दरम्यान, युक्रेन १९९२ पासूनच एक भागीदार म्हणून ‘नाटो’सोबत जोडला गेला. ’नाटो’ने युक्रेनला १९९७ मध्ये युक्रेन-नाटो आयोग स्थापनेवरून सुरक्षा प्रश्नावर चर्चेसाठी व्यासपीठ दिले. यानंतर युक्रेनला सदस्यत्व तर मिळाले नाही; पण ‘नाटो’शी युक्रेनचे संबंध मात्र आणखी मजबूत झाले.
२००८ साली ’बुखारेस्ट शिखर संमेलना’त ’नाटो’ने युक्रेनला ’नाटो’त सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस पावले न उचलल्याने युक्रेन ’नाटो’चा अधिकृत सदस्य होऊ शकला नाही. रशियाच्या सीमेलगत असलेल्या युक्रेनच्या डोन्बास भागातील लुहान्स्क आणि डोनेट्स्क याठिकाणी काही फुटीरतावादी गट युक्रेनपासून स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन करत असतात, ज्यांना रशिया आपले छुपे समर्थन देतो. याठिकाणी शासकीय कार्यालयांनाही येथील फुटीरतावादी आपल्या ताब्यात घेतात. देशांतर्गत फुटीरतावाद्यांच्या आंदोलनाला कंटाळूनच युक्रेन ’नाटो’च्या छायेखाली येण्याच्या प्रयत्नात आहे, जे रशियाला कदापि मान्य नाही. कारण, युक्रेन ’नाटो’त सहभागी झाल्यास संपूर्ण ’नाटो’ देशांना अंगावर घ्यावे लागेल, हे रशिया जाणून आहे.
युक्रेन ‘नाटो’मध्ये सहभागी झाल्यास युक्रेनविरोधातील सर्व कारवाया थांबवाव्या लागतील, याचीही रशियाला जाणीव आहे. युक्रेन ‘नाटो’त सहभागी झाल्यास ‘नाटो’ देश आपले शत्रू बनतील आणि आपल्या सीमांना धोका निर्माण होईल, असेही रशियाला वाटते. त्यामुळेच रशिया नेहमी युक्रेनच्या ‘नाटो’मध्ये जाण्याला विरोध करत आला आहे, ज्यात त्याला यशदेखील आले. कारण, अजूनही ‘नाटो’ने आपले दरवाजे युक्रेनसाठी उघडलेले नाही. रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरू आहे. हे युद्ध संपल्यानंतरच युक्रेनला ’नाटो’त घेण्याविषयी विचार होऊ शकतो. युद्ध सुरू असताना युक्रेनला ’नाटो’मध्ये सहभागी करून घेतल्यास त्याने रशिया आणि अन्य देशांसोबत तणाव आणखी वाढेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले होते.
रशियावर दबाव टाकण्यासाठीच युक्रेन ‘नाटो’त जाण्याचे स्वप्न पाहत असल्याचा प्रचार रशिया आधीपासूनच करत आला आहे. अशात युद्धादरम्यान युक्रेन ’नाटो’त सहभागी झाल्यास रशियाचा अंदाज खरा ठरेल. रशिया-युक्रेन युद्ध इतक्यात संपेल अशी तूर्तास चिन्हे नाहीत. त्यामुळे युक्रेनला ’नाटो’चे दरवाजे कधी उघडले जातील, हेही सांगणे शक्य नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आश्वासनांवर आश्वासने युक्रेनला मिळाली; पण ‘नाटो’चे सदस्यत्व मिळाले नाही. युक्रेनमुळे विनाकारण रशियाशी शत्रुत्व नको, अशी काही ‘नाटो’ देशांची भावना. त्यामुळे युक्रेनचे ‘नाटो’त जाण्याचे स्वप्न सध्या, तरी धूसर दिसते.
७०५८५८९७६७