जगातील अनेक दिग्गज विनोदवीरांमध्ये ज्याचे नाव अग्रस्थानी घेतले जाते असे कॉमेडी किंग चार्ली चॅप्लिन यांना पाहात, त्यांची अनोखी विनोदशैली पाहात अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आणि शिकल्या. मात्र, त्यांच्या कुटुंबातून एक वाईट बातमी समोर येत आहे. चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन हिचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हरायटी मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी पॅरिसमध्ये जोसेफिन चॅप्लिनचा मृत्यू झाला.
जोसेफिनने तिचे वडिल चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल टाकले होते आणि स्वतःची अभिनय कारकीर्द सुरू केली. ती तिच्या वडिलांसोबत "लाइमलाइट" सिनेमात अगदी लहान वयात सुद्धा दिसली होती, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः चॅप्लिन यांनी केले होते.
अभिनेत्री जोसेफिनने १९६७ मध्ये "अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग" या चॅप्लिन चित्रपटात काम केले. याशिवाय "द मॅन विदाऊट अ फेस" आणि "शॅडोमन" अशा चित्रपटांमध्ये जोसेफिन झळकली होती. जोसेफिनने वडील चार्ली चॅप्लिन यांच्या अभिनयाचा समृद्ध वारसा तिच्या परीने पुढे चालु ठेवला. चार्ली चॅप्लिनच्या कुटूंबाबद्दल कायमच लोकांना सहानुभुती आणि प्रेम वाटलंय. जोसेफिनच्या निधनानंतर तिला जगभरातल्या फॅन्सनी श्रद्धांजली वाहिली आहे.