आपल्या धारदार निर्भय लेखणीतून आणि तितक्याच प्रभावशाली कार्यविचारांनी देशात स्वातंत्र्याचे अग्निबीज रूजववणारे बाळ गंगाधर टिळक अर्थातच आपले लोकमान्य. त्यांच्या प्रखर निर्भय कार्याने आणि विचारतेजाने समग्र हिंदुस्थान धुमसला. स्वातंत्र्यलढ्यात समाज एकमनाने सामील झाला आणि त्यातून काही दशकांनीच स्वातंत्र्याचे अमृत देशाला मिळाले. लोकमान्य टिळकांची आज रोजी जयंती. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळकांच्या प्रखर समाजशील आणि तितकेच प्रखर देशकार्य विचार अत्यंत संक्षिप्त स्वरूपात या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
टिळक महाराज, तुम्ही स्वराज्य का काय म्हणता, ते म्हणजे काय हो?” त्या गरीब शेतकर्याने लोकमान्य टिळकांना विचारले. तशी बैठक विचारवंतांची होती आणि ती संपली होती. मात्र, लोकमान्य टिळकांनी त्या शेतकर्याला प्रेमाने बसवले आणि विचारले, “घरातला कारभार कोण बघतो?” तो म्हणाला, “मीच.” टिळक म्हणाले, ’‘आपल्या घरातला कारभार आपण पाहणे, म्हणजेच स्वराज्य. तुझ्या घरातला कारभार दुसर्या कोणी केलेला, तुला चालेल का?’ ’शेतकरी म्हणाला, “असे कसे?” यावर टिळक म्हणाले, ‘’तसेच देशाचेही आहे. आपल्या देशाचा कारभार आपल्या देशातल्या लोकांनीच करायला हवे. तेच स्वराज्य.” स्वराज्य हे काही चार शिकल्या सवरलेल्या लोकांनी चालवलेली चळवळ नाही, तर ती देशातील प्रत्येकाला आपली वाटावी, असे लोकमान्य टिळकांचे मत होते.
पुढे देश स्वतंत्र झाल्यावर संविधानामध्ये नागरिकांचे हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये टिळकांनी सांगितलेली स्वराज्याची व्याख्या प्रतिबिंबित होताना जाणवते. त्यामुळेच की, काय ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ असे जेव्हा टिळक म्हणाले, तेव्हा तो अधिकार टिळकांसोबतच देशातील अठरापगड जातीसमाजातील करोडो लोकांचा अधिकार आहे, हे अधोरेखित झाले होते. ‘ओरायन’, ’आर्क्टिक होम इन दि वेदाज’ आणि ‘गीता रहस्य’ यांसारखी ग्रंथनिर्मिती करणारे प्रकांड पांडित्य आणि असीम बुद्धिमत्तेचे धनी असलेले लोकमान्य टिळक समाज सुधारणेबाबत म्हणतात की, ”सामाजिक स्थितीत हल्लीच्या परिस्थितीप्रमाणे सुधारणा झाली पाहिजे, ही गोष्ट खरी आहे.
पण, ती जर धर्माच्याच पायावर झाली नाही, तर तुमची उन्नती न होता उलट अवनती मात्र होईल. आपणास पुढे जी ऊर्जितावस्था प्राप्त व्हावयाची आहे, ती हिंदूराष्ट्र या नात्याने झाली पहिजे.” १८व्या शतकाच्या उत्तरार्धात भारत पारतंत्र्यात असताना आणि समाजासह सर्वच संस्कृतीला एकप्रकारे बंदिस्तता आली असताना, टिळकांनी ‘हिंदूराष्ट्र आणि समाजाची ऊर्जितावस्था’ याबाबत भाष्य करणे. म्हणजे भारताच्या नियतीच्या भविष्यात हिंदू समाज राजकारणाचे स्वप्न पेरणे होते. कारण, त्यानंतर दोन शतकांनंतर का होईना, लोकशाहीच्या माध्यमातून देशातील बहुसंख्य हिंदूंच्या भावनांचा आणि श्रद्धेचा विचार करणारी भाजपप्रणित राज्यसत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने २०१४ साली भारतात सत्ता रूढ झाली. त्यानंतर कोरोना काळाचा कठीण प्रसंग असू दे की, आणखी काही आर्थिक किंवा जागतिक संकट असू दे, भारत सातत्याने प्रगतिपथावर आहे.
असो. लोकमान्य टिळक कट्टर देशभक्त होते. त्याचबरोबर समाजप्रवर्तकही होते. अस्पृश्यता निवारणावर टिळकांची भूमिका काय? टिळक म्हणत की, “परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल, तर मी त्या परमेश्वराला मानत नाही.’‘ तसेच, त्यावेळी महर्षी शिंदे हे समाजातील जातीय विषमता दूर व्हावी, म्हणून कार्य करत होते. त्यांना वाटले की, आपण समाजकारण सोडून राजकारणात जावे. त्यासंदर्भात त्यांनी लोकमान्य टिळकांकडून सल्ला मागितला. त्यावेळी लोकमान्य म्हणाले की, ”देशाचे स्वातंत्र्य जितके महत्त्वाचे, तितकेच समाजामध्ये अस्पृश्यता निवारण होणेही गरजेचे आहे.” सामाजिक सुधारणांचा मागोवा घेतला, तर जाणवते की, समाजाला दूषण देणारे सामाजिक कार्यकर्ते टिळकांच्या काळातही होते. याबाबत टिळकांचे मत होते की, ”समाजात आपल्याला सुधारणा घडवून आणायची असेल, तर त्याच्यावर टीकेची सतत झोड उठवून त्याचा पाठिंबा आपल्याला मिळू शकत नाही. जर समाजाचा पाठिंबा नसेल, तर समाजसुधारणा व्यर्थ जाऊ शकतात.
तिसरे समाजात सुधारणा घडविण्यासाठी सर्वप्रथम ती आपल्या जीवनात आचरण करून दाखवावी लागते.” लोकमान्य टिळक रूढीवादी होते. ते प्रतिगामी होते, असे आरोप काही लोक (जे काही लोक म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पायाची धूळ होऊ शकणार नाहीत असे लोक) करत असतात. त्यांचा आक्षेप आहे की, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते. पण, हे सत्य आहे का? तर मुळीच नाही! टिळकांचे म्हणणे होते की, ”आपण पुरूष मंडळी शिकून गोर्या साहेबांचे नोकर झालो. तसेच, आपल्या घरातल्या माताभगिगींनी व्हायचे का? तसे न करता तिच्या जीवनात गरजेचे असलेले आणि तिला मान्य असलेले शिक्षण द्यायला हवे.” टिळक असे का म्हणाले, तर त्याकाळी भारतीय महिलांना शिक्षण देण्यासाठी काही संस्था काम करत होत्या. त्यांना इंग्रजांकडून दहा-दहा वर्षांचे अनुदानही मिळाले होते. ते महिला आणि बालकांचे शिक्षणाच्या नावावर धर्मांतरण करत असत. अशा घटना त्याकाळी सर्रास घडत होत्या.
महिला घराचा खांब आहे. तिचा धार्मिक पाया ढासळला, तर कुटुंबाचे काय होणार? यासाठी असे धर्मांतरण आणि संस्कृतीपासून विभक्त करणार्या संस्थाच्या अधिपत्याखालील शिक्षणाला टिळकांचा विरोध होता. एक भारतीय म्हणून लोकमान्य टिळकांनी त्याकाळी घेतलेला मुस्लीम महिलांचा कैवार माझ्यासाठी आजही परम आदराचा आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की, त्यावेळी बालविवाह व्हायचे. पत्नी वारली की, वृद्धही दुसरा विवाह करत. मात्र, लहान बालिकेशी.... ते त्यावेळी समाजमान्य होते. न्यायमूर्ती रानडेही या कुप्रथेतून सुटले नाहीत. मात्र, लोकमान्य टिळक बालविवाहाबाबत काय म्हणाले? ते म्हणाले की, ”केस पिकले चार-पाच मुले झाली. लेकीसुना घरात चांगल्या नांदत्या झाल्या.
अशांनीही पुन्हा आठ-दहा वर्षांच्या कुमार मुलीला लेक किंवा नात म्हणून नव्हे, तर सहधर्मचारिणी म्हणून मांडीवर घेणे व तिच्याशी एखाद्या अल्पवयस्क नवरदेवाप्रमाणे सर्व विलास करणे, म्हणजे त्या पवित्र विवाहविधीची त्या सहधर्मचारिणी आपल्या पौरुषाची, वृद्धत्वाच्या अकलेची निव्वळ थट्टा करणे नव्हे काय? अशा बालवृद्ध दंपतीमध्ये वैवाहिक संबंधासारख्या संबंधाने अत्यंत प्रेम उत्पन्न होण्याची आशा करणे वेडेपणा नाही, तर काय? केवळ आपल्या सोयीखातर एका निरपराधी अज्ञान पोरीचा सर्व जन्म फुकट घालवला जातो. त्या कोवळ्या बालिकेस तुम्ही कोणते सुख द्याल, शेवटी त्या चिंतेने काळजी करून तुम्ही मरणोन्मुखच व्हाल, या अशा विजोड विवाहाचे प्रयोजन काय?” दुसरीकडे त्याकाळी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी विवाह झालेल्या बालिकेला पहिली मासिक पाळी आली की, गर्भादान विधी केला जायचा. तो विधी काय? तर पहिली मासिक पाळी होऊन गेल्यानंतर धार्मिक विधी करून त्या बालिकेला तिच्या पतीच्या खोलीत सोडले जायचे. मग तिची इच्छा असो नसो. पुढे तिच्यासोबत काय होणार, हे तिचे पती आणि तिच्या सुदैव-दुर्दैवावर अवलंबून. त्या बालिकांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत असेल, याचा विचार कुणीही करत नसे.
पण, देशाच्या स्वराज्य प्राप्तीचे नेतृत्व करणार्या टिळकांनी या बालवधूंचा कैवार घेतला आणि समाजाला प्रश्न केला. ती बालिका ऋतुमती झाली म्हणजे तिला सगळेच कळले असे नाही. तिला त्या खोलीत गेल्यावर काय होणार, हे माहितीही नसते, हा तिच्यावरचा अन्याय आहे. आजच्या २१व्या शतकामध्येही या विषयावर स्त्रियांच्या मनोभूमिकेतून विचार मांडणारे सहसा कुणी आढळत नाहीत. पण, ते लोकमान्य टिळक होते. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनाचा विचार करणारे होते. टिळक महिलाविरोधी होते, म्हणणार्यांना टिळकांनी स्त्री हक्कविषयक घेतलेल्या या भूमिका माहिती आहे का? त्याकाळी काही लोक टिळकांना म्हणायचे की, ‘तुम्ही स्वातंत्र्य-स्वातंत्र्य म्हणतात, ते स्वातंत्र्य आधी तुमच्या घरातल्या महिलांना द्या. त्यांना रितीरिवाजातून सोडवा.’ त्यावेळी टिळक म्हणाले की, ”देशात कोटी लोक विवाहित आहेत. कुटुंबात कुणीही कुणावर अत्याचार करत नाही. कुणीही कुणाचे गुलाम नाही. आम्ही आमच्या बायका आमच्या बहिणी आमच्या मुली-मुले आम्ही सर्व केस पिकलेल्या अनादी सिद्धपुराण लोकरूढी जगदंबेचे अतिलीन आहोत. गुलाम आहोत.”
असे प्रत्येक स्तरावर टिळकांचे स्वतंत्र; पण समाजशील आणि राष्ट्रनिष्ठ विचार होते. त्यामुळेच की, काय सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे, छत्रपती शिवरायांची जयंती उत्सव साजरे करणारे टिळक, हे घराणेशाहीच्या विरोधातच होते. ’माझा बाप माझ्या बापाचा पक्ष’ असे वातावरण असलेल्या आजच्या जगात टिळकांचे घराणेशाहीबद्दलचे विचार महनीय आहेत. ते म्हणतात की, ”कोठेही झाले तरी एकाच कुळात १०-१५ कर्तबगारीची माणसे एकापुढे एक निपजत नाहीत. करिता राज्य अविछिन्न चालण्यास राजसत्ता एका कुळाच्या ताब्यात न ठेवता प्रजेच्या पुढार्यांच्या हातात असली पाहिजे.” तसेच, छत्रपती शाहू महाराज वेदोक्त प्रकरण असू दे की, ताईमहाराज दत्तकप्रकरण असू दे, टिळकांची नि:स्पृह न्यायवृत्ती आणि लोकप्रवीणवृत्ती दिसून येते.
ताईमहाराजांनी लोकमान्य टिळकांवर खोटे अतिशय निंदनीय आरोप केले. पण, टिळक शेवटपर्यंत लढले. २० वर्षे त्यांनी न्यायालयीन लढा दिला. का? तर मृत मित्राची इच्छा पूर्ण व्हावी. शेवटी ताईमहाराजांचे खरे दत्तकपुत्र कोण यावर टिळकांच्या म्हणणेच खरे ठरले. या न्यायालयीन लढ्यासाठी टिळकांवर ६० हजारांचे कर्ज झाले. हा खटला जिंकल्यानंतर जेव्हा दत्तकपुत्राने टिळकांना विचारले की, ”आपण आमच्या पित्याच्या इच्छेसाठी २० वर्षे लढा दिलात. हजारो रुपयांचे कर्ज तुमच्यावर झाले. आम्ही ते फेडतो.” यावर टिळक म्हणाले ,”तू आमच्या मुलासारखाच. कर्ज वगेरे फेडू नकोस. फक्त एक कर, तुझ्याकडे दत्तकविधानानुसार पडीक जमीन असेल, तर ती पुना महाविद्यालयाला दे. जेणेकरून आपल्या समाजातील युवकांना शिक्षणासाठी सुविधा होईल.”
ताईमहाराज प्रकरण आणि त्यानंतरही टिळकांचे कृती आणि विचार म्हणजे सच्च्या महापुरुषाने कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरणच आहे. त्यामुळेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे इतिहासाच्या पानावरच नव्हे, तर भारताच्या उज्ज्वल भवितव्याचेही लोकमान्यच आहेत. आचार्य अत्रेंनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेल्या ११वा अवतारमधील काव्यपंक्ती स्मरण करून टिळकांना अभिवादन करूया-
पराक्रमाचे रक्त नसातुनी उसळविले ज्याने
मृत अशांतुनी प्राण घातला ज्या रणमर्दाने
उत्साहाच्या ज्या शुराने भडकविल्या ज्वाळा
त्या वीराचा त्या धीराचा जय! जय! जय! बोला
९५९४९६९६३८