संधी.... हुकलेली आणि मिळालेली!

21 Jul 2023 20:52:34
Article On Vishnu Bhikaji Gokhale
 
मार्क्स पूर्णपणे इहवादी-नास्तिक आहे, तर विष्णुबुवांची सामाजिक धारणा आध्यात्मिक पायावर उभी आहे. अशा या विष्णुबुवांचा जन्म दि. २० जुलै १८२५चा...

बेळगावनिवासी परमपूज्य कलावतीदेवी या अलीकडच्या काळातल्या एक आत्मसाक्षात्कारी संत स्त्री होत्या. कर्नाटकातील हुबळी येथील प्रख्यात संत सिद्धारूढ महाराज यांच्या त्या शिष्या. महाराजांच्या आदेशानुसार १९४२ साली कलावतीदेवी बेळगाव येथे स्थायिक झाल्या. १९७८ साली त्यांचं निर्वाण झालं. बेळगावात अनगोळ या ठिकाणी त्यांची समाधी आणि मठ असून, त्यांच्या मठाला ’श्रीहरीमंदिर’ असं म्हणतात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या भजन, उपासनेचा खूपच प्रचार झालेला असून, भक्तमंडळी त्यांना ’आई’ या नावाने ओळखतात.

परमपूज्य आई दरवर्षी साधारणपणे डिसेंबर महिन्यात मुंबई-पुणे-ठाणे भागांत प्रवास करीत असत. त्यावेळी अनेक लोक त्यांच्या दर्शनाला येत असत. त्यांचे सेवेकरी मुद्दाम अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रण देऊन त्यांची भेट करवून देत असत. असेच मुंबईचे एक लेखक त्यांच्याकडे गेले. जे काही संभाषण झालं, त्यामुळे लेखक महाशय खूपच प्रभावित झाले आणि मग ते नेहमीच आईंच्या भेटीला येऊ लागले. त्यांचा हिंदू धर्माचा, तत्त्वज्ञानाचा उत्तम अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या आणि आईच्या गप्पा या नुसत्या गप्पा न राहता, तो आध्यात्मिक संवाद होत असे. आजूबाजूच्या सेवेकर्‍यांना, दर्शनाला आलेल्या इतर भक्तांना या संवादातून खूप आनंद, ज्ञान मिळत असे.

असेच एकदा लेखक महाशय आपल्या पत्नीसह आईंच्या दर्शनाला आले. नेहमीप्रमाणे संवाद सुरू झाला. अचानक लेखक महाशयांची तंद्री लागल्यासारखं झालं आणि ते आईंना आध्यात्मिक विषयातले काही गूढ, कूट प्रश्न विचारू लागले. आईंनी एकदा त्यांच्याकडे नीट पाहिलं. त्या सावरून बसल्या. जवळच्या सेवेकर्‍याला यांनी सांगितलं, ‘आता कुणालाही आत सोडू नकोस’ आणि मग जवळपास दोन तास लेखक महाशय, त्यांच्या पत्नी आणि आई यांच्यामध्ये अतिशय उच्चस्तरावरची आध्यात्मिक चर्चा सुरू होती.

दोन तासांनंतर आईंसमोर साष्टांग दंडवत घालून लेखक महाशय आणि त्यांच्या पत्नी निघून गेले. आईंनी जवळच्या सेवेकर्‍याला विचारलं, ’काय समजलं तुला?’ सेवेकरी म्हणाला, ’मला एवढंच कळलं की, लेखक महाशय इतर लोकांसारखे संसारातल्या अडचणींवर तोडगा विचारायला आलेले नव्हते. हा माणूस वेगळा आहे.‘ आई हसून म्हणाल्या, ’होय. हा माणूस वेगळा आहे. तो खूप वरच्या दर्जाचा साधक आहे. पण, या सगळ्या प्रश्नांमध्ये एक मूलभूत प्रश्न त्याने विचारलाच नाही. तो जर आज त्याने विचारला असता, तर आजच त्याला आत्मज्ञान होणार होतं. अरे, आज अशी संधी चालून आली होती की, या दत्ताचा दत्तात्रेय होणार होता. पण, त्याचं कुठचं तरी कर्म आडवं आलं. त्याने तो विशिष्ट प्रश्न विचारलाच नाही आणि आपल्या या आध्यात्मिक क्षेत्रात असा नियमच आहे मुळी की, तहानलेल्यालाच पाणी द्यायचं. मी उत्तर द्यायला सिद्ध होऊन बसले होते. पण, त्याच्याकडून प्रश्न आला नाही. आलेली संधी हुकली.’

सेवेकर्‍याला मनापासून वाईट वाटलं. तो आईना म्हणाला, ’मी जाऊन त्यांना परत बोलावून आणू का?’ आई म्हणाल्या, ’अरे, या गोष्टी अशा दुसर्‍याने सांगून होत नसतात. ती तहान, ती तळमळ ज्याची त्यालाच लागावी लागते. बघू, परत केव्हातरी येईल संधी.’
हुकलेल्या संधीच्या संदर्भात आता मिळालेल्या संधीची सुमारे १५० वर्षांपूर्वीची गोष्ट आता पाहू, विष्णू भिकाजी गोखले हे अव्वल इंग्रजी राजवटीत, कोकणातल्या माणगाव जवळच्या शिरवली गावी जन्मले. दारिद्य्रामुळे वयाच्या नवव्या वर्षीच ते घरातून बाहेर पडले आणि मिळेल ती नोकरी करू लागले. त्याचवेळी त्यांनी हिंदू धर्माचा, तत्त्वज्ञानाचाही कसून अभ्यास केला. नाशिक जवळच्या सप्तश्रृंगी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी काही काळ साधना केली. दत्त संप्रदायातल्या काही अवस्था त्यांना प्राप्त झाल्या. मग ते वेदोक्त हिंदू धर्मावर प्रवचनं करू लागले. नाशिक, कोल्हापूर, पुणे, वाई, नगर अशा ठिकाणी प्रवचन करीत १८५६ साली ते मुंबईला आले.

मुंबईत त्यांची भेट दादाजी धाकजी राणे या पाठारे प्रभू ज्ञातीतल्या एका हिंदू धर्मप्रेमी गृहस्थांशी झाली. ‘पाठारे प्रभू‘ ही मुंबई शहरातली एक धनवान आणि प्रतिष्ठित अशी ज्ञातिसंस्था होती. काळबादेवी, गिरगाव या भागांत या ज्ञातीतल्या प्रतिष्ठितांचे मोठमोठे वाडे होते. ‘प्रभू सेमिनरी‘ ही या ज्ञातीची ठाकुरद्वारमधील संस्था फारच प्रख्यात होती. दादाजी धाकजी विष्णुबुवांची विद्वत्ता पाहून प्रभावित झाले. या वेळेपर्यंत विष्णू भिकाजी गोखले हे त्यांची विद्वत्ता, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, वैराग्य वृत्ती यामुळे ‘विष्णुबुवा ब्रह्मचारी’ या नावाने प्रसिद्ध झाले होते. दादाजी धाकजींच्या पुढाकाराने विष्णुबुबांनी, ’प्रभू सेमिनरी’मध्ये १८५६ सालच्या सप्टेंबर ते डिसेंबर या काळात सुमारे ५० व्याख्यानं दिली. वेदोक्त हिंदू धर्माच्या त्यांच्या सडेतोड प्रतिपादनाने मुंबईकर हिंदू भारावून आणि आनंदून गेले.

मग विष्णुबुवांनी ख्रिश्चन मिशनर्‍यांना वादविवादाचं जाहीर आव्हानच दिलं. १८५७ सालच्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत दर गुरुवारी गिरगाव चौपाटीवर विल्सन महाविद्यालयाच्या समोरच्या पुळणीवर हे वादविवाद होत. यामध्ये हिंदूंबरोबरच पारशी लोकही हजर राहत असत. तर्ककठोर युक्तिवाद करून विष्णुबुवा पाद्य्रांचा युक्तिवाद साफ खोडून काढत असत लवकरच विष्णुबुवांचा लौकिक मुंबई शहरासह संपूर्ण मुंबई इलाख्यात पसरला. मिशनर्‍यांच्या प्रचारामुळे संभ्रमित झालेला हिंदू समाज, आपला तारणहार म्हणून विष्णुबुबांकडे पाहू लागला. गावोगाव त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रणं येऊ लागली. लोक त्यांना शाली आणि मानपत्र अर्पण करू लागते.

इथेच जरा गडबड सुरू झाली. प्रखर ज्ञानमार्गी असलेले विष्णुबुवा ज्ञान आणि वैराग्य यांचा पुरस्कार करताना भक्तिमार्गाची टिंगल करू लागले. सगुण उपासना, मूर्तिपूजा म्हणजेच भक्ती हा मार्ग चुकीचा असून निर्गुण, निराकार परब्रह्माला ज्ञानमार्गाने जाणून घेणे, हाच खरा ऋषिमुनींचा वेदप्रणित हिंदू धर्म आहे, असं आग्रहपूर्वक सांगू लागले. अशी आणखी दोन वर्षे गेली. १८५९ साली सोलापूर जवळच्या अक्कलकोट या संस्थानचे राजे मालोजी भोसले यांच्या आमंत्रणावरून विष्णुबुवा अक्कलकोटला आले. त्यांच्या सोबत त्यांचे तीन पारशी मित्र होते. अक्कलकोटला येण्यापूर्वी विष्णुबुवांनी स्वामी समर्थ यांची कीर्ती ऐकलेली होतीच. स्वामी हे केवळ लंगोटी नेसून किंवा कित्येकदा संपूर्ण दिगंबर अवस्थेत कुठेही हिंडत असत. ते कसलीही शिवाशीव वगैरे पाळत नाहीत. कधी मालोजीराजांच्या राजवाड्यात असतील, तर कधी उकिरड्यावरसुद्धा जाऊन बसतील. पण, खुद्द राजेसाहेबांसकट सर्व लोक त्यांना दत्तावतार मानतात, इत्यादी गोष्टी त्यांनी ऐकलेल्या होत्या, त्यामुळे स्वामी आपलं व्याख्यान ऐकायला येतील, असे त्यांना वाटत होतं. पण, तसं झालं नाही. यामुळे विष्णुबुवा स्वतःच स्वामींकडे गेले.

स्वामी एका भक्ताच्या घरी बसलेले होते. स्वामी बालकाप्रमाणे गोट्या, रिंगणं, धान्याचे छोटे-छोटे ढीग करून खेळत असत. तसेच, ते यावेळी खेळत होते. काही सेवेकरी भोवती उभे होते. काही दर्शनाकरिता येत होते. फुलं, पेढे, हार इत्यादी समोर ठेवून जात होते. विष्णुबुवांना ते दृश्य फारसं पसंत पडले नाही. तरी त्यांनी स्वतःची ओळख सांगितली आणि नमस्कार करून ते बसले. महाराज काहीतरी तत्त्वज्ञानविषयक चर्चा करतील, अशी त्यांना अपेक्षा होती. पण, तसा काही रंग दिसेना. तेव्हा यांनी स्वतःच प्रश्न काढला, ’महाराज, ब्रह्मपदी वृत्ती तदाकार होणे म्हणजे काय?’ महाराजांनी एकवार त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ’उठ, चालता हो!’ विष्णुबुवा मुक्कामावर परतले. त्यांच्या मनात आले, उगीचच लोक यांना दत्तावतार मानतात. माझ्या प्रश्नांचं उत्तर काही यांना देता आले नाही. राजवाड्यातला पाहुणचार घेऊन विष्णुबुवा आणि यांचे मित्र झोपी गेले. मध्यरात्री विष्णुबुवा झोपेतून ओरडत उठले. आपल्या अंगावर शेकडो विंचू चढले असून, ते आपल्याला दंश करीत आहेत, असे त्यांना दिसलं. ते भीतीने थरथर कापू लागले.

सकाळी उठल्यावर त्यांच्या मनात आलं, आपण महाराजांना नावं ठेवली, त्याचे तर हे फळ नसेल ना? त्यामुळे भरभर स्नान वगैरे उरकून ते मित्रांसह पुन्हा महाराजांकडे आलेे. ते समोर दिसताच स्वामी म्हणाले, ’हट् गाढवा! स्वप्नात हजारी विंचू अंगावर चढले. म्हणून तू घाबरून बोंब मारत उठतोस आणि गोष्टी मात्र ब्रह्मपदाच्या करतोस? तू नुसता मूर्ख नसून, पढतमूर्ख आहेस. पुष्कळ ग्रंथ वाचले आणि प्रवचनं दिली म्हणजे झालं, असं तुला वाटतं. लोक आपल्याला मान देतात याच्याच धुंदीत तू असतोस. ब्रह्मपदी वृत्ती तदाकार होणं वाटेवर पडलेलं नाही. ज्याला ती अवस्था मिळवायची आहे, त्याने प्रथम मानाला झिडकारून टाकलं पाहिजे. उठ, चालता हो.’ महाराजांचे ते खणखणीत शब्द ऐकताच विष्णुबुवा एकदम भानावर आले आणि त्यांनी संधी साधली. विद्वत्ता, मान, शाल, बगैरे झुगारून देऊन त्यांनी महाराजांसमोर तिथेच लोटांगण घातलं. सगळा अहंकार टाकून देऊन यांनी महाराजांना पुढील साधनेकरिता मार्गदर्शन करण्याची विनंती केली. मग मात्र महाराजांनी त्यांची मुद्दाम चालवलेली बाललीला वगैरे बाजूला ठेवून विष्णुबुवांना त्यांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन केलं.

अक्कलकोटहून मुंबईला परतलेले विष्णुबुवा विद्वान तर होतेच, पण आता त्यांच्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान लाभले. त्यांनी ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ हे राजकीय-सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पुस्तक लिहिलं. हिंदू समाज जेव्हा पारतंत्र्याच्या बेड्या फेकून स्वतंत्र होईल, तेव्हा त्याने आपली शाश्वत जीवनमूल्ये आणि आधुनिक जीवनमूल्ये यांची सांगड घालून, आपल्या देशाचा राज्यकारभार आाणि सामाजिक अभिसरण कसे चालवावे, याची ’ब्ल्यू प्रिंट’ म्हणजे हे पुस्तक. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन भाषांतरकार बाळ शिंत्रे यांनी या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर करून त्याच्या दहा हजार प्रती छापून त्या देशा-विदेशात सर्वत्र पाठवल्या. गंमत म्हणजे, लाच १८६७ या वर्षी कार्ल मार्क्सचा ’दास कपिताल’ हा ग्रंथ (प्रथम खंड) हॅम्बर्गमध्ये छापण्यात आला. विष्णुबुवांनी सुचवलेल्या अनेक समाजधारणाविषयक गोष्टी जवळपास जशाच्या तशा मार्क्सने सुचवलेल्या आहेत. फरक इतकाच आहे आणि तोच महत्त्वाचा आहे की, मार्क्स पूर्णपणे इहवादी-नास्तिक आहे, तर विष्णुबुवांची सामाजिक धारणा आध्यात्मिक पायावर उभी आहे. अशा या विष्णुबुवांचा जन्म दि. २० जुलै १८२५चा. म्हणजे जुलै २०२४ मध्ये त्यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष सुरू होईल.


Powered By Sangraha 9.0