कायदेशीर मार्गाने गोरक्षण करण्यासाठी, त्याने स्वतः वकील बनण्याचा निश्चय केला. जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील युवा गोरक्षक वैभव किरण जाधव याच्याविषयी...
सातारा जिल्ह्यातील तासवडे गावात वैभव किरण जाधव याचा जन्म झाला. वडिलांचे मुंबईत इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असल्याने त्याचे बालपण मुंबईतच गेले. मुंबईतील लक्ष्मण पांडुरंग जगदाळे गुरूजी विद्यालयात त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शालेय वयात कबड्डी आणि क्रिकेटची त्याला विशेष आवड होती. आई-वडील वारकरी असल्याने त्याच्यावर बालपणापासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. वैभव इयत्ता आठवीत असताना वडिलांचा अपघात झाला. त्यानंतर इयत्ता दहावीनंतर संपूर्ण कुटुंब सातार्यातील मूळ गावी परतले.
पुढे वैभवने एक वर्ष ‘आयटीआय‘चे शिक्षण घेतले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्याने कला शाखेची पदवी प्राप्त केली. शेजारील गावात ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘हिंदू धर्म जनजागरणा’च्या कार्याची माहिती वैभवला रोहित जगदाळे या त्याच्या वर्गमित्रामुळे मिळाली. त्यानंतर वैभवने आपली खासगी कंपनीतील नोकरी सांभाळत त्याच्या गावात हे कार्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने त्याच्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन कार्य सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रूजवण्यासाठी गावातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात महिन्यातून सात दिवस शिवचरित्राच्या पारायणाला सुरुवात झाली. यावेळी सुरूवातीला १० ते १५ मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
धर्म जागरणासाठी सुरू असलेल्या कामाला गावकर्यांनीदेखील मोलाचे सहकार्य केले. लोकांना छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याअगोदर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला कळले पाहिजे, यासाठी वैभवने सुरुवात स्वतःपासूनच केली होती. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहेत, परंतु, त्यांचे चरित्र वाचण्याची कुणाची सहसा तयारी नसते, असा अनुभव त्याला सुरुवातीला आला. नंतर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाविषयी वैभवने जनजागृती सुरू केली. पुण्यातील भक्ती-शक्ती संगम सोहळ्यालाही त्याने हजेरी लावली, तेव्हा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांची भेट वैभवला झाली. पुढे गडकोट मोहीम, गडकोट संवर्धन आणि इतिहासाची गोडी वैभवला लागली. कार्य वाढत गेले तसे सहकारीदेखील वाढत गेले. शिवशंकर स्वामी, मिलिंद एकबोटे यांच्याशी त्याचा संपर्क आला. कायदेशीर मार्गाने गोरक्षण करण्याची पद्धत वैभवला आवडली. कायदेशीर मार्गानेही गोरक्षण करता येते, याची जाणीव त्याला झाली.
२०१५ साली वडिलांचे निधन झाले, त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी वैभववर येऊन पडली. त्यामुळे पुण्यात त्याने एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. तिथेही वैभवचा बजरंग दल, ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ यांसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क आला. पुण्यात गोरक्षक शिवशंकर स्वामी यांचा सहवास त्याला लाभला. कायदेशीर मार्गाने गोरक्षणाविषयी वैभवने अधिक माहिती मिळवली. तो स्वामींसोबत गोरक्षण कार्यात सक्रिय सहभाग घेऊ लागला. कोरोना काळात ’लॉकडाऊन’मुळे तो पुन्हा आपल्या गावी परतला. शेती आणि गोरक्षणाचे कार्य पुन्हा जोमाने सुरू केले.
पुण्यातील गोरक्षण कार्याचा अनुभव गाठीशी असल्याने वैभवने गावीदेखील जोमात काम सुरू केले. आतापर्यंत ७००हून अधिक गोवंशाचे संरक्षण करण्यात त्याला यश आले. गोवंश, गोसंवर्धन यांवर जनजागृतीचे कार्य त्याने हाती घेतले. गोरक्षणासाठी कायदा समजून घेणे आवश्यक असून, कायद्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. त्यावर उपाय म्हणून वैभवनेच स्वतः वकील बनण्याचा निश्चय केला. सध्या तो ’एलएलबी‘च्या दुसर्या वर्षात शिकत आहे. शेतीबरोबरच गोरक्षणाचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा वैभवचा मानस आहे. वैभवला त्याची आई शिवशंकर स्वामी, यतीन जैन, मिलिंद एकबोटे यांचे सहकार्य लाभते.
गाय पूजनीय आहे, याची शिकवण बालपणीच मिळाली. गायीला कसायांपासून वाचवल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. गायीमध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वडील जसे आपल्या मुलीचे लग्न करताना आधी सर्व चौकशी करतात. मुलगा आणि त्याचे कुटुंब कसे आहे, याची माहिती घेतात. त्याचप्रमाणे शेतकर्यानेदेखील गाय दुसर्याच्या हवाली करताना सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. गोरक्षणाचे कार्य करताना समाधान आणि आनंद मिळतो, असे वैभव सांगतो.
आपली फसवणूक होऊ नये, म्हणून आपला गोवंश कोणालाही विकताना त्याचे आधार ओळखपत्र बघा. तो कोणत्या गावातील रहिवासी आहे, सदर व्यक्ती खरोखर शेतकरी आहे की, कसायांचा दलाल याची सखोल चौकशी करा. तेव्हाच तुमचा गोवंश सुखी राहील, अन्यथा गळ्यावर सुरी फिरलीच म्हणून समजा. पोलिसांनी गोरक्षण कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी केली, तर गोरक्षकांना रस्त्यावर उतरण्याची गरजच पडणार नसल्याचे वैभव सांगतो. कायदेशीर मार्गाने गोरक्षण करण्यासाठी स्वतः वकील बनण्याचा ध्यास घेतलेल्या वैभव जाधव याला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. (अधिक माहितीसाठी संपर्क ( ७०५८५८९७६७)