नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'माझे हृदय वेदनांनी भरले आहे. मणिपूरमध्ये उघडकीस आलेली घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पापी कोण आहेत, गुन्हे करणारे कोण आहेत, यांच्यामुळे संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. १४० कोटी देशवासियांना लाज वाटत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना माता-भगिनींच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची विनंती करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलतांना म्हणाले की, 'तुमच्या राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करा. घटना राजस्थान, छत्तीसगड किंवा मणिपूरची असो, राजकीय वाद विसरुन कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांच्या सन्मानाची काळजी घेऊ या. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. मणिपूरच्या या मुलींसोबत जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.
मागच्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. सरकारने या आधीपण मणिपूर हिंसाचारावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. आज पासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर आपली प्रतिक्रिया दिली. संसदेतही मणिपूर हिंसाचारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.