इर्शालगड वाडीवर दुःखाचा डोंगर! युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

    20-Jul-2023
Total Views |
 

नवी मुंबई : मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान १०० जण अडकल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. अद्याप ७५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. इर्शालगड डोंगरावरील काही भाग कोसळल्याने हा प्रकार घडला असून त्यात जीवितहानी देखील झाली आहे. खालापूर तालुक्यात मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून काल रात्री ११.३० ते १२.०० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफसह मदतकार्य करणाऱ्या अनेक यंत्रणांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री आणि मंत्री तात्काळ घटनास्थळी दाखल

इर्शालगड वाडीवर दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून कारवाईला लगेचच सुरुवात करण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ तिथे पोहचून सरकारतर्फे मदतकार्याला सुरुवात केली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी साडेसातच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईतील सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घटनेवर लक्ष ठेवत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवं देखील राज्यातील पावसाच्या इतर घटनांची माहिती घेत आहेत.