विरोधकांच्या बंगळुरूमधील बैठकीपूर्वी अजित पवार यांच्या गटातील मंत्री व नेत्यांनी सलग दोन दिवस शरद पवारांच्या मुंबईत भेटीगाठी घेतल्या. यावेळी पवारांची मनधरणी करण्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राखण्यासाठी प्रयत्न करावे, म्हणून अजितदादा गटातील नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पवारही या सगळ्या नेत्यांना आवर्जून भेटले. त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यावर पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिल्या नसल्याच्या बातम्याही समोर आल्या. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे पवारांनीही सगळ्यांचे ऐकले खरे; पण अखेरीस ते बंगळुरूच्या विरोधकांच्या बैठकीला मंगळवारी उपस्थित राहिलेच. याचाच अर्थ दादा गटाच्या नेतेमंडळींची आग्रही मागणी शरद पवारांनी धुडकावून लावत, भाजपबरोबर न जाण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे एकीकडे काका महागठबंधनच्या बैठकीत बंगळुरूमध्ये, तर पुतण्या दिल्लीला रालोआच्या बैठकीत असे चित्र दिसून आले. मतभेद असले, तरी अजितदादा आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. याचाच अर्थ यापुढेही ते शरद पवारांच्या भेटीला गेल्यास त्यात आश्चर्यकारक असे काहीही नाही. परंतु, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे संबंध इतके ताणले गेले की, ते फुटीनंतर एकमेकांच्या वार्यालाही उभे राहिले नाहीत. खरं तर याचे आत्मपरीक्षण खुद्द उद्धव ठाकरेंनी करायला हवे. अजितदादा आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवार आजही दैवत वाटतात. तितकेच पवार जवळचेही वाटतात. परंतु, उद्धव ठाकरेंना पवारांइतका मान, सन्मान शिंदे गटाकडून फुटीनंतर मिळाला नाही. त्याचे कारण म्हणजे, ठाकरे आणि राऊतांनी शिंदे आणि नेत्यांवर वाहिलेली अश्लाघ्य शिव्यांची, टोमण्यांची आणि अपमानाची लाखोली! याउलट पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीला चातुर्याने हाताळून वाणीवरही संयम बाळगलेला दिसतो. त्यामुळे शरद पवारांनी त्यांचे दरवाजे अजितदादा आणि मंडळींसाठी एकप्रकारे खुले ठेवल्याचे म्हणता येईल. परंतु, ठाकरेंनी आपल्या गलिच्छ वाणीने ‘मातोश्री’चे दरवाजे शिंदे गटातील नेत्यांसाठी अगदी पहिल्या दिवसापासूनच बंद केले. हाच पवार आणि ठाकरेंमधील फरक म्हणजे राजकीय सुसंस्कृतपणा आणि राजकीय अभिनिवेष याचे उत्तम उदाहरण. म्हणून पवारांचे लोक अजूनही सांगाती आहेत, तर दुसरीकडे ठाकरे मात्र एकाकी!
राजकीय चातुर्य आणि चारित्र्य
अन्य कुठल्याही क्षेत्रापेक्षा तसूभर अधिक राजकारणात चारित्र्य हा सर्वाधिक मौल्यवान दागिना ठरावा. या चारित्र्यावर एकदा का शिंतोडे उडले की, संबंधित व्यक्तीचे राजकीय भवितव्य हे अंधारात गेलेच म्हणून समजा. त्यातच राजकारणात खासगी आणि सार्वजनिक आयुष्य यांची रेषाही तितकीच पुसट. कारण, राजकारण्याचे आयुष्य हे जणू खुली किताब! आता यावर निश्चितच मतमतांतरे असू शकतात आणि ती तशी असणेही स्वाभाविकच. पण, राजकारण हे प्रतिमानिर्मितीच्या मानसशास्त्राशी अखंड जोडलेले शास्त्र. म्हणूनच एका राजकारण्याची खासगी कारणास्तव का होईना, प्रतिमा मलिन झाली की, त्याचा त्याच्या सार्वजनिक, राजकीय आयुष्यावर परिणाम होणे, हे समीकरणच (याला अपवादही आहेतच!!) म्हणजे पाण्यात एकदा दूध टाकल्यानंतर ते जसे वेगळा करता येणे शक्य नाही, तशीच गत राजकारणातील चारित्र्याची. म्हणूनच राजकीय क्षेत्रात, लहान असेल अथवा मोठ्या अशा कुठल्याही पदावर वावरताना आपली प्रतिमा, आपले चारित्र्य हे स्वच्छ ठेवण्याचे मोठे आव्हान हल्लीच्या राजकारणात अधिकाधिक गडद होताना दिसते. त्यातच आजच्या स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात याबाबतीत २४ तास सतर्कता बाळगणेही तितकेच महत्त्वाचे. कायदा, नैतिकता, योग्य-अयोग्य असे अनेक प्रश्न खरं तर राजकारण्यांचे ‘असले’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित होतात. त्याचा मनस्ताप न केवळ त्या राजकारण्याला मात्र त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांच्याही वाटेला येतो. त्यातच माध्यमांनी केवळ टीआरपीसाठी अशा व्हिडिओंना दिवसभर प्रसारित करुन, संबंधित व्यक्तीवर इतरांना जाहीर शिंतोडे उडवण्यासाठी संधी देणे, हेही तितकेच निंदनीय. विशेषकरून तेव्हा, जेव्हा याविषयी संबंधित व्यक्तीची बाजू जाणून न घेता, त्यांचे सरसकट ‘मीडिया ट्रायल’ चालवले जाते. एका वृत्तवाहिनीने त्याचा बाऊ केल्यानंतर आपसुकच इतरांनाही मागे राहता येत नाही आणि चिखलफेकीचा हा खेळ आणखीन भीषण स्वरुप धारण करतो. विरोधक आयत्या व्हिडिओवर आंदोलने, जोडे मारून आपला कंडही भागवून घेतात. म्हणूनच मुळात असे काही घडले की हे असेच होणार, हे तसे सर्वश्रूतच. म्हणूनच राजकीय चातुर्याइतकेच सद्चारित्र्य राखणे हेदेखील क्रमप्राप्तच!