ठाणे : राज्य सरकारचे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाण्यातही पावसाचे धुवाँधार 'अधिवेशन' सुरु आहे.बुधवारी सकाळपासुनच सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहरात पाणी तुंबण्यासोबतच वृक्षांची पडझड होऊन वाहनांची वाताहत उडाली. शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतुक मंदावली होती. बुधवारी दिवसभरात ठामपा आपत्कालीन कक्षाकडे १४० मि. मीटर पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने गुरुवारी शाळा - महाविद्यालयाना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात आठवड्याच्या सुरुवातीलाच गटारीनंतर अधिक मासात मुसळधार श्रावणसरी बरसत आहेत. बुधवारीही पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपुन काढले. धुवाँधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यावर पाणी तुंबुन वाहतूक मंदावली होती. शहरातील वंदना सिनेमा, मुख्य बाजारपेठ,भास्कर कॉलनी, चिखलवाडी, दिवा आदी आठ ठिकाणी पाणी साचल्याने वाहने चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. मुसळधार कोसळणार्या पावसामुळे मुंबई - अहमदाबाद रोड,मुंबई- नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर रोड आणि नौपाडा, सिव्हील रूग्णालय परीसरात वाहतूक कोंडी झाली होती. तर मध्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतुक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे जिल्ह्यात बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ८०. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक अंबरनाथमध्ये ११४. १ मिमी, उल्हासनगर ११०.५ मिमी, कल्याण ९८.६ मिमी, ठाणे ७५.६ मिमी, भिवंडी ७९.६, शहापूर ५३.७ मिमी इतका पाउस झाला. त्यानंतरही दिवसभर पावसाने ठाण्याला झोडपुन काढले.
प्रादेशिक हवामान विभागाने कोकण विभागात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची सुचना दिली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर व रायगड जिल्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुर्या, वैतरणा पिजाळ, काळू तसेच रत्नगिरी जिल्हयातील जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत.या अनुषंगाने कोकण विभाग महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.