रायगडच्या लज्जतदार रानभाज्या

18 Jul 2023 21:46:58
Article On Vegetables In Monsoon Season

रानभाज्या रायगड जिल्ह्यात सर्वत्रच मिळतात असे नाही. रसायनी, पेण, रोहा, कर्जत-पाली या परिसरात जिथे पूर्वापार जंगल व डोंगर आहेत. तिथेच या रानभाज्या अस्तित्व राखून आहेत. रायगडमधील वनवासी बांधवांच्या आयुष्यात रानभाज्यांच्या माध्यमातून आर्थिक आणि त्याद्वारे इतर स्वावलंबनाची पहाट उमलू शकते, त्याचा घेतलेला मागोवा...

पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस निसर्गतः दरवर्षी उगवणार्‍या रानभाज्या गरिबांना मोठा आधार ठरतात. कोकणच्या ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला या रानभाज्यांची माहिती व उपयुक्तता तसेच आयुर्वेदिक उपयोग माहीत असल्याने पावसाळी हंगामात प्रत्येकाच्या घरात भाकरीच्या तुकड्याबरोबर लज्जतदार रानभाजी असतेच. पावसाळ्यात उगवणार्‍या सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असून प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या पोटाच्या विकारांवर व आरोग्याला उपयुक्त समजल्या जातात. प्रत्येक रानभाजीमध्ये असणार्‍या लोहामुळे शरीरात रक्तवृद्धी चांगल्या प्रकारे होते. या नैसर्गिक रानभाज्यांमध्ये खते, कीटकनाशके नसल्यामुळे त्या प्रदूषणमुक्त व आरोग्यास उपयुक्त ठरतात. याचबरोबर पावसाळ्यात ज्यावेळी अन्य भाज्यांची आवक कमी असते, त्यावेळी या रानभाज्या मोफत व विपुल प्रमाणात उपलब्ध होतात.

रानभाज्यातील प्रत्येक भाजी विशिष्ट पद्धतीने केली, तर त्याची चव अक्षरशः अविट असते. कोवळ्या कुड्याच्या शेंगा मोडून पाण्यात निथळत घालतात. नंतर पाणी काढून टाकून पीठ घालून परतून त्यांची भाजी करतात. पोटाच्या आरोग्याला ती उपयुक्त समजली जाते. कोचींद्याच्या कोवळ्या पाती चिरून त्याची भाजी करतात. कांद्यांना अंकुर फुटल्यानंतर कोवळ्या अंकुरांचीही भाजी केली जाते. कृमी व जंतावरही भाजी हमखास गुणकारी आहे. या हंगामात टाकळ्याची भाजी खाऊन कोकणवासीय कंटाळतात, एवढ्या विपुल प्रमाणात सर्वत्र टाकळा असतो. लोहयुक्त टाकळ्यात कडधान्ये घालून सुरेख भाजी केली जाते. टाकळ्याप्रमाणेच कवला या रानभाजीला पिवळी फुले येतात. या भाजीची चवही अविट आहे. भारंगीला करवतीच्या धारेप्रमाणे पाने येतात. हिच्या पानांची व फुलांचीही भाजी केली जाते.

फोडशी या रानभाजीच्या पाती हिरव्या व बारीक असतात. कुरडू ही माठाप्रमाणे दिसणारी पालेभाजी काहीशी कडवट आहे. याची फुले टिकाऊ असतात, तर बियांची चटणी केली जाते. लघवीच्या विकारांवर ही उपयुक्त असते. रानअळू हे पावसाच्या सुरुवातीलाच विपुल प्रमाणात उगवून येते. सुरुवातीला कोवळे असतानाच आठला घालून याची भाजी करतात. पुढे ते जून झाल्यावर त्याला खाज निर्माण होते. गोमेटू या भाजीला तोंडलीप्रमाणे लांबट हिरवी फळे येतात. याची भाजी करतात किंवा आमटीत घालतात. गोमेटूची फळे निखार्‍यात भाजून त्याचा गर पायाला चिखलामुळे होणार्‍या जखमांवर लावल्यास या जखमा लवकर बर्‍या होत असल्याने कोकणातील शेतकरी वर्ग गोमेटूचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो.

भारंगी, कुवाळी, कुड्याथ्या, शेंगा, कर्टूली, भोपूड, मसाल्याची पाने या अस्सल रानभाज्यांनी बाजार भरून जातो. . या सार्‍या भाज्या नैसर्गिकपणे जंगलात, डोंगरावरच उगवतात. आदिवासी त्या गावातल्या बाजारात आणून विकतात. काही भाज्या तर वर्षातील केवळ १५ दिवसांतच उगवून वर येतात. मग त्या वनस्पती सुप्तावस्थेत जातात व पुन्हा पुढल्या वर्षी अस्तित्व दाखवितात. ना त्यांची कुणी कृत्रिम लागवड करत, ना त्यांच्या बी-बियाण्यांची कुणाला माहिती असते. आदिवासी बांधवांनी पिढ्यानपिढ्या जपलेले हे संचित आहे. त्यानाही ऐन पावसाळ्यात यातून बर्‍यापैकी रोजगार मिळतो. महिला या व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.

यंदा पहिल्या पावसाबरोबर बाजारात येणार्‍या शेवाळाच्या भाजीने केवळ तोंड दाखवून पळ काढला. कुंड्यांची पांढरी शुभ्र फुले केवळ अस्तिव दाखवायला बाजारात दिसली. भारंगीची भाजी जिथे दिवसाला तीन तीन टोपल्या निघत होती, ती आता आर्धी टोपलीही भरत नाही, असे आदिवासी महिलांकडूनच ऐकायला मिळाले. भोपुड, मसाल्याची पाने यांची परिस्थिती काही वेगळी नाही. नाही म्हणायला कर्टूलीची भाजी अजूनही खूप मोठ्या प्रमाणात विकायला येते. कारण तिला मोठी मागणी असते पण ही मोठी मागणी पुरवायला पुन्हा जंगलावरच आक्रमण करून आहे नाही ते ओरबाडून मिळविले जाते. त्यामुळे भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही.

वाघारी, पेंढरी, तीरकमळ, मौले या रानभाज्या काळाच्या उदरात अनेकविध कारणांनी नाहीशा झाल्या. उरलेल्या भाज्याही उद्या कदाचित त्याच वाटेने जातील. पृथ्वीतलावरून एखादा पक्षी नाहीसा झाल्यावर पुन्हा तो दिसण्यासाठी ज्याप्रमाणे एक आकाशगंगा जाऊन दुसरी यावी लागते. त्याप्रमाणे एखादी वनस्पती एकदा नाहीशी झाल्यावर पुन्हा दिसणे अवघड आहे. या भाज्यांचे औषधी गुण लक्षात घेऊन तरी शासनाने त्यांना विशेष संरक्षण द्यायला हवे. ऐन उन्हाळ्यात वारंवार चुकून किंवा हेतुपुरस्सरलागणारे वणवे, जंगलात हैदोस घालणारे, भटके, फार्महाऊसचे नव्या काळात निर्माण झालेले फॅड व खुद्द आदिवासींनीच काही प्रमाणात जंगलाचा केलेला त्याग यानेही या संकटांना अधिक बळ दिले आहे.

कृषी-तंत्र, आयुर्वेदांचे अभ्यासक व वनखात्याने या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष द्यायला हवे. या वस्तू लागवडीची कृत्रिम पद्धत, बी-बियाणे संवर्धन व जोमदार वाढीसाठी अधिक संशोधनाची गरज आहे. या भाज्यांच्या उत्तमोत्तम पाककृतीचा समावेश पंचतारांकित मेन्यूत केल्यास त्यालाही प्रतिसाद मिळेल. पर्यटनालाही त्यातून चालना मिळेल. कोकणातील माशांनी त्यासाठी आधीच मुसंडी मारलेली आहे. दोन्हीला एकत्र केल्यास फायदा मिळू शकेल. विक्री तंत्रात सुधारणा करायलाही वाव आहे. त्याने आदिवासी स्त्रीच्या आयुष्यात नवी पहाट येऊ शकेल.

या भाज्या शाकाहारी व मांसाहारी दोघामध्येही सारख्याच लोकप्रिय आहेत. आहारशास्त्राने त्याचे महत्त्व मान्य केले आहे म्हणून त्याच्या जतनासाठी प्रयत्न करायला हवेत.

आनंद जाधव
९३७३७१०३२७


Powered By Sangraha 9.0