रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात बच्छड्यांसह वाघिणीचे दर्शन

17 Jul 2023 16:48:30
Ramgarh Vishdhari Sanctuary Tiger Reserve

मुंबई(विशेष प्रतिनिधी):
राजस्थानच्या रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात 'टी-१०२' ही वाघीण तीन बच्छड्यांसह विहार करताना दिसून आली. गेल्या वर्षी दि. १६ मे रोजी रामगढ विषधारी अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. टी-१०२ या वाघिणीला जुलै २०२२मध्ये रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून या प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या ५ वर गेली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या बातमीवर आनंद व्यक्त करत वाघिणीची तिच्या तीन पिल्लांसह एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. राजस्थानमध्ये सध्या चार व्याघ्र प्रकल्प आहेत. राज्यातील वाघांची लोकसंख्या असलेल्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त, अलवरमधील सरिस्का व्याघ्र प्रकल्प, कोटामधील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प आणि बुंदीमधील रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे. तर, भारतातील ५२वा व्याघ्र प्रकल्प आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ५जुलै २०२१ रोजी रामगड विषधारी अभयारण्य आणि लगतच्या परिसरांना व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. हा प्रकल्प १५०१.४९ चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे. नव्याने अधिसूचित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये ईशान्येकडील रणथंबोर आणि दक्षिणेकडील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पामधील वाघांच्या अधिवासाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे रणथंबोरमधील अतिरिक्त व्याघ्र लोकसंख्या नियंत्रित करण्यात मदत होणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात अंदाजे २,९६७ वाघ आहेत.


Powered By Sangraha 9.0