‘रोड हिप्नोसिस’चा मरणडोह

16 Jul 2023 21:22:01
Article On Samriddhi Highway Accident Road Hypnosis

समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघाताचे कारण शोधण्यासाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या ’सिव्हिल इंजिनिअरिंग’ शाखेच्या परिवहन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच उपयुक्त संशोधन प्रसिद्ध केले. ‘महामार्ग संमोहन’ अर्थात ‘रोड हिप्नोसिस’ हे महत्त्वाचे कारण ३३ टक्के अपघातास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला. रोजच्या स्थळी जाण्यासाठी मानवामध्ये स्वयंचलितता यंत्रणा असते. म्हणजे रोज एकच मार्गावरून गेल्याने वाट लक्षात ठेवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागत नाही. मनात कितीही विचार सुरू असले, तरी व्यक्ती बरोबर असंख्य विचारांच्या धुंदीतही इच्छित स्थळी पोहोचतोच. पण, स्वयंचलिततेमध्ये वाहन चालवताना जेव्हा चालकाचे लक्ष दुसरीकडे जाते, तेव्हा ती व्यक्ती अर्धवट स्मृतिभ्रंशाच्या स्थितीमध्ये जाते. त्याला ‘रोड हिप्नोसिस’ किंवा ‘मार्ग संमोहन’ म्हणतात. ‘हायवे संमोहना’मध्ये वाहन चालवताना चालकाचे वाहनावर पूर्णपणे नियंत्रण असते, तरीही अपघात घडतात. कारण, रस्ता मोकळा, चांगला असला की, चालकाचे लक्ष दुसरीकडे भरकटते. महामार्गावर ट्रॅफिक फारसे नसल्याने वाहनचालकाची एकाग्रता नष्ट होते. आजूबाजूने फक्त गाड्या सुसाट धावत असतात आणि मग चालकाचे मन निष्क्रियतेकडे जाते. यालाच ’महामार्ग संमोहन’ असे मानसशास्त्रज्ञीय परिभाषेत संबोधित केले जाते. कोणत्याही अडथळ्यांशिवाय एखाद्या महामार्गावर गाडी एका सरळ मार्गावर अनेक तास धावत राहिली की, चालकाच्या हालचाली स्थिर होत जातात. मेंदू क्रियेच्या प्रक्रियेसाठी निष्क्रिय होतो. मेंदूच्या कुंठितावस्थे (स्टॅगनन्सी)ने चालक अर्धवट ग्लानी, झोपेत वाहन चालवत राहतो. म्हणूनच अपघात घडतात. ही अवस्था येण्या अगोदर चालक प्रथम सक्रिय असतो. मात्र, नंतर न थांबता सलग ’ड्रायव्हिंग’ केल्यानंतर रस्त्यांचे संमोहन सुरू होते. या अवस्थेला ‘डोळे उघडे ठेवून झोप’(स्लिपिंग विथ ओपन आईज) असेही तज्ज्ञ म्हणतात. समृद्धी महामार्गावर झालेले ३३ ते ४० टक्के अपघात या ‘रोड हिप्नोसिस’मुळेच झाल्याचे संशोधन विद्यार्थ्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यांचा हा दावा नक्कीच निराधार नाही. ‘विकासाचा महामार्ग’ मानवाच्या नाशाचा डोह ठरू नये, एवढेच!

विनाशाचा डोह टाळण्यासाठी!

विकास हा मानवाच्या उत्क्रांतीचा राजमार्ग ठरतो. मनाच्या अवस्थेमुळे अपघात होणार असेल, तर ते टाळताही येणे शक्य आहे. ’महामार्ग संमोहना’चा धोका समृद्धीसारख्या महामार्गावर अधिक प्रमाणात होत आहे. कारण, हा मार्ग अत्यंत दर्जेदार, अधिक मार्गिकांचा आहे. रस्त्यांमध्ये अडथळा, नागरिकांचा अडथळा, वाहतुकीचा व्यत्यय नसल्याने चालकांची वाहन गती वाढलेलीच असते. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, कोणतेही वाहन सलग अडीच ते तीन तास विनाथांब चालवत राहिल्यास अशा ड्रायव्हिंगमुळे ’महामार्ग संमोहन’चा धोका कैक पटीने वाढतो. अशा संमोहन अवस्थेत चालकाचे डोळे उघडेच राहतात. मन, मेंदू मात्र निष्क्रिय(शून्य)अवस्थेत जाऊन संमोहन पडल्यासारखे होते. साहजिकच अशा अवस्थेत चालकाला त्याच्या समोरील वाहने लक्षात येत नाहीत की, गाडीचा वाढता वेगही कळत नाही. येथे सरळ मार्गावरून एक रेषेत विनाअडथळा प्रवासाने त्याच्यावर संमोहन होते. मेंदू निष्क्रिय झाल्याने गाडी भरधाव वेगाने चालवली जाते आणि अपघात हमखास होतात. जर चालकाला गाडी चालवत पुढे जाताना मागील १५ मिनिटांचे काहीच आठवत नसले, तर ती अवस्था ‘रोड हिप्नोसिस’चा इशारा समजून तत्काळ चालकाने वाहने बाजूला घेत ‘ब्रे्रक’ घ्यावा. असे संमोहन होवो अथवा न होवो, चालकाने एक ते दीड तासांनी वाहन थांबून चहा-पाणी घेणे, मनाला आणि शरीराला काही मिनिटे विश्रांती देऊन मार्गस्थ होणे, अत्यंत गरजेचेच! कारण, ’रोड हिप्नोसिस’ हे संशोधन आपल्याकडे तुलनेने नवीनच आहे. यावर संशोधन करणारा बुद्धिजीवी वर्ग वेगळा आहे. मात्र, ज्याच्यासाठी हे संशोधन आवश्यक आहे, त्या खासगी तसेच सर्वच मोठ्या वाहनचालकांना याची माहिती व्हावी. म्हणून कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग घेणे ही आता काळाची गरज झाली आहे. यापूर्वी देशात आजच्या इतकी वाहतुकीची साधने, वाहने नव्हतीच. साहजिक यावर विदेशात जरी फार पूर्वी संशोधन झाले असले, तरी आपल्या देशात तेव्हा याची गरज कधीच भासली नाही. आता सावध होत शासन, स्वयंसेवी संस्थांसह वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थांनीही सर्वच जिल्ह्यांत खासगी वाहनचालकांच्या तपासणीसह ‘रोड हिप्नोसिस’बद्दल जागृती करणे गरजेचे ठरणार आहे.

निल कुलकर्णी
Powered By Sangraha 9.0