‘कांदा मुळा भाजी अवघी। विठाबाई माझी”

    15-Jul-2023
Total Views |
Article On Sant Savata Maharaj

‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग॥ मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥’ सावता महाराजांच्या अशा पुण्य विचारांचा वारसा आपल्याला लाभल्याने बहुतांश समाज जात म्हणून जरी एकत्रित येण्यास इतर जातींपेक्षा कमी पडत असेल, तरीपण देव, देश, धर्माच्या प्रत्येक घटकात सम्मिलीत व नेतृत्व करण्यात पुढाकार घेताना दिसतो. सावता महाराजांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करुया.

संत सावता माळी सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील अरणगावचे. सावता माळी यांचा भेंडगावचे भानवसे रूपमाळी यांच्या घरातील जनाईंशी विवाह झाला. त्या दोघांच्या पोटी विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. संत सावता महाराज हे कर्तव्यकर्म करीत राहाणे, हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती, ती त्यांच्या खालील अभंगातून प्रतीत होते.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, सावत्याने केला मळा विठ्ठल देखीयेला डोळा
कर्तव्य कर्म करीत ईश्वरभक्ती करता येते, यावर ते ठाम होते. ते स्वतः वारीत न जाणारे; पण वारीस जाणार्‍या वारकर्‍यास शक्य तेवढी मदत करत. कर्तव्यातून कसूर करून जाणार्‍या वारकर्‍यास त्यांच्या प्रेमळ वचनाने मार्गदर्शनही करत. ‘सर्वत्र पांडुरंग आहे आणि म्हणून माझ्या मळ्याचा धनीही पांडुरंगच आहे. मी चाकर म्हणून राबतोय,’ या भूमिकेतून ते प्रपंच व परमार्थ करीत असत.
 
करुन प्रपंच नेटका, लुटा परमार्थाच्या सुखा
त्यांनी जनसामान्यांत धार्मिक प्रबोधन व भक्ती प्रसाराचे कार्य निष्ठेने व व्रतस्थपणे केले. काही प्रसंगातून सावता महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात समरसता, अलिप्तता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड प्रतीत होते.
 
एकदा त्यांच्या शेतात म्हसोबाचा दगड रुतला होता, तो त्यांनी शेतकामात अडचण येऊ नये. म्हणून लगतच्या झाडाखाली भक्तिभावाने स्थापित केला. याकरिता तेव्हा गावात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. त्यावेळच्या परिस्थितीचा विचारही आपण आता करू शकत नाही, अशी त्यावेळची स्थिती होती. नंतर गावात पटकीची साथ आल्याने त्या सदर गोष्टीस जोडून त्यांना फार त्रास दिला गेला; पण सावता महाराजांनी त्या गोष्टीकडे फारसे लक्ष न देता गावातील रुग्णांना स्वतःच्या घरात परिवारास सोबत घेऊन त्यांची औषधोपचाराची सोय केली व काळजी वाहिली आणि त्यातून सर्वांना बरे केले. संत सावता महाराजांचे अभंग खूप गोड आहेत. विठ्ठल भक्तीच्या मधुरतेचे दर्शन त्यात होते.

भारतात विविध जातीत अनेक संतांनी जन्म घेतला. महाराष्ट्रात या संत परंपरेमुळे छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास सहकार्य लाभले, असे म्हणता येईल. कारण, संत विचारांमुळे समाजात जातीभेद न राहता सज्जन लढवय्या समाजमनाची मुहूर्तमेढ शिवरायांच्या काळात रचता आली. यानंतर मागच्या शतकात काही सामाजिक चळवळींच्या माध्यमातून कर्मकांडांचा विरोध करता करता समाज जातीभेदाच्या दिशेने जायला लागला. अशा चळवळींचा पगडा काही वर्षांत माळी समाजातील बहुतांश पोटजातीमध्येही आढळून येत आहे. ‘बहुजन’, ‘पुरोगामी’ या शब्दांचा मारा करून देव, देश, धर्म व संस्कृतीपासून समाजास दूर करण्यात देशविघातक शक्ती काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसून येते. यास माळी समाजातील बहुतांश मंडळं, संस्था समाजनेते जबाबदार असल्याचे अनुभवास येते. अनेकदा विवाह सोहळा आयोजित करणे व त्यातही समाजप्रबोधनाच्या नावाने विघटनवादी विचारांची पेरणी करण्यात येताना दिसते.
 
नामसंकीर्तनावर सावता महाराजांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग॥ मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥ सावता महाराजांच्या अशा पुण्य विचारांचा वारसा आपल्याला लाभल्याने बहुतांश समाज जात म्हणून जरी एकत्रित येण्यास इतर जातींपेक्षा कमी पडत असेल, तरीपण देव, देश, धर्माच्या प्रत्येक घटकात सम्मिलीत व नेतृत्व करण्यात पुढाकार घेताना दिसतो. सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प सर्व समाजाने केल्यास तो सर्वांच्या सर्वांगीण विकासास गती देईल हे निश्चित.....
राम कृष्ण हरी

हेमंत भास्कर
(लेखक माळी महासंघ, मुंबईचे अध्यक्ष आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.