“बाई वाड्यावर या”, हे संवाद आजही कानावर पडले तरी डोळ्यांसमोर उभे राहतात ज्येष्ठ अभिनेते आणि मराठीतील उत्तम खलनायक निळू फुले. निळू फुलेंच्या आवाजातील तो भरभक्कमपणा प्रेक्षकांना कायमच खिळवून ठेवत राहिला. निळू फुलेंनी ताकदीने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका इतक्या खऱ्या वाटायच्या की प्रेक्षक ज्यावेळी प्रत्यक्षात निळू भाऊंना भेटायचे त्यावेळी त्यांचा राग, द्वेष करायचे. परंतु हीच खरी आपल्या कामाची पावती असल्याचे निळू फुलेंनी अनेकदा म्हटले. आज निळू फुलेंचा स्मृतिदिन. १३ जुलै २००९ रोजी मराठीतला अस्सल खलनायक निघून गेला आणि कायमची पोकळी निर्माण करुन गेला.
मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकारांनी रंगभूमीपासून सुरुवात करत हळूहळू आपल्या अभिनयाची झालर चित्रपटसृष्टीवर पसरण्यास सुरुवात केली. त्यापैकीच एक हरहुन्नरी अभिनेते म्हणजे निळू फुले. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे निलू फुलेंनी अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर निळू फुले यांनी 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सलग चाळीस वर्षे सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी त्यांचा खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला.
'चोरीचा मामला', 'शापित', 'सामना', 'सिंहासन', 'पिंजरा', आयत्या बिळावर नागोबा,एक होता विदुषक, जन्मठेप, फटाकडी अशा अनेक मराठी चित्रपटातून निलू फुले प्रेक्षकांच्या मनात बसले. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. 'कूली', 'जरा सी जिंदगी', 'दिशा', 'दुनिया', 'नरम गरम', 'प्रेम प्रतिज्ञा', 'मशाल', 'सारांश', 'सौ दिन सास के' यांतील त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या. निळू फुले यांनी चित्रपटात नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका केल्या. मात्र, त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय सखाराम बाईंडर आणि सुर्यास्त नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा नाट्यसृष्टीच्या इतिहास कायम लिहिल्या गेल्या.
चरित्रपट येणार
मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे बायोपिकची लाट आली आहे. अर्थात नव्या पिढीला जुने जाणते कलाकार कसे होते, त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आणि टिकण्यासाठी किती खस्ता खाल्या याची माहिती त्यांना असणे गरजेची आहे. त्यामुळेच अनेक दिग्गजांच्या जीवनावर आधारित चरित्रपट येत आहेत. असाच निळू फुलेंच्या जीवनावर आधारित चरित्रपट करण्याचे धनुष्य अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने हाती घेतले आहे. अद्याप निळूभाऊंच्या भूमिकेत कोणता अभिनेता आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.