भारतात 'जंक फूड'च्या जाहिरातींवर बंदी येणार का? काय म्हणते WHO?

12 Jul 2023 15:59:00
आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मनुष्याला आपले व आपल्या कुटुंबीयांचे शारीरिक स्वास्थ्य जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अस्वास्थ्यकारक आहार हा जागतिक आरोग्य चिंतेचा विषय बनत असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांसाठी जंक फूडच्या विपणनावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मसालेदार अन्न, मैदा, जंक फूडच्या अतिसेवनामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. यामुळे लठ्ठपणा येतो. पूर्वी हा आजार वयाच्या ७० व्या वर्षी यायचा. आता तो अवघ्या 30 व्या वर्षी दिसत आहे. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर पोटाशी संबंधित आजार 90 टक्के कमी होतील. असे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे.
 
 
WHO on Junk Food
 
 
जंक-फूड जाहिरातींवर बंदी घालण्याच्या WHO च्या आवाहनाकडे भारताने का लक्ष द्यावे? असा तुमच्या मनात प्रश्न असेलच, तर जंक फूडमध्ये शरीराला पोषक अशा गोष्टी कमी आणि घातक ठरू शकणाऱ्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. फॅट्स, मीठ, साखर आणि विविध प्रकारची रसायने जंक फूडमध्ये असतात. तसेच पदार्थ अधिक लज्जतदार बनविण्यासाठी त्यात सर्रासपणे रंगांचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी मानवी शरीरासाठी चांगल्या नसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होत असतो. जंक वा फास्ट फूडमुळे वजन वाढते. सतत जंक फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. एकदा का स्थूलपणा आला की सर्व व्याधी शरीराला जडू लागतात. त्यात मधुमेह, रक्तदाब, धाप लागणे, सांधेदुखी, हृदयविकार, इत्यादींचा समावेश असतो. लठ्ठपणामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. यासाठीच जागतिक आरोग्य संघटना जंक-फूड जाहिरातींवर बंदी घालावी अशी शिफारस करत आहे.
 
आपले स्वास्थ्य बिघडण्यामागचे अजुन एक मुख्य कारण म्हणजे, बदलत चाललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच घटणारे शरीर श्रम. यासाठी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया पॅकबंद खाद्यपदार्थांसाठी वॉरनिंग लेबल लागू करत आहे. ग्राहक पॅकच्या मागील बाजूस पोषण माहिती पाहू शकतात. तर ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी अल्कोहोल घेणे टाळावे. तुम्ही अल्कोहोलऐवजी पाणी, सोडा वॉटर किंवा लिंबूपाणी पिऊ शकता. तळलेल्या गोष्टी खाऊ नका. आहारात तळलेल्या-भाजलेल्या गोष्टींचा वापर कमी करा. अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट्स आपल्या कॅलरीज वाढवण्यासाठी काम करतात. आपल्या आहारात सॅलड खा. जर तुम्हाला कधी भूक लागली तर त्यासाठी काही फळे तुमच्यासोबत ठेवा. ज्यामुळे भूक लागल्यावर ती फळे आपण खाऊ शकतो. यामुळे बाहेरचे अन्न खाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. जंक फूडची लालसा थांबवण्यासाठी किती वेळ लागतो? तर अवघे सहा आठवडे पुरेसे आहेत. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा नेहमीचा आहार पौष्टिक पदार्थांसह संतुलित ठेवत असाल, तर अधूनमधून फास्ट फूड खाणं तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. जो घेईल सकस आहार, त्याला न होई कधी आजार.
 
- साक्षी कार्लेकर 
 
 
 
Powered By Sangraha 9.0