’अॅमेझॉन वेब सर्व्हिस’ बाहुबली असणार्या ‘पब्लिक क्लाऊड सर्व्हिस’ क्षेत्राने तब्बल ५०० अब्ज डॉलर्सचा महसुलाचा टप्पा ओलांडला. आपल्या दैनंदिन वापरात असलेले हे क्षेत्र सर्वसामान्यापासून दुर्लक्षित असले, तरीही तितकेच महत्त्वाचे आहे. ’५ जी’, ’६जी’ आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या येणार्या युगात ’क्लाऊड सर्व्हिसेस’ची पाळेमुळे आणखी खोलवर भक्कम होतीलच. त्यामुळे येणार्या नव्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे.
‘अॅमेझॉन वेब सर्व्हिस’, ’मायक्रोसॉफ्ट’, ‘सेल्सफोर्स’, ’गुगल’, ‘आयबीएम’, ‘अलीबाबा’ आणि ‘ओरॅकल’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे ‘पब्लिक क्लाऊड सर्व्हिसेस’चा एकूण ४१ टक्के इतका वाटा आहे. एकट्या ‘अॅमेझॉन’कडे या क्षेत्राची ५५ टक्के मक्तेदारी आहे. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे दरवर्षी सरासरी वाढ ही २२.९ टक्के इतकी असल्याचे २०२१ मध्ये प्रकाशित झालेला एक अहवाल सांगतो. ‘अॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेजोस यांनी सुरुवातीपासूनच पडद्याआड ठेवण्याची गरज आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येईल. ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिस‘ ज्याला ’एडब्ल्यूएस’ संबोधले जाते.
काळाच्या पुढचा विचार करणाराच ’लीडर’ बनतो. हे जेफ बेजोस यांच्या उदाहरणावरून दिसून येते. त्यासाठी क्लाऊड सेवा देणार्या क्षेत्रातील स्पर्धेचा विचार करायला हवा. जेफ बेझोस यांनी २००४ साली ही सेवा स्वतःच्या कार्यालयात सुरू केली. प्रायोगिक तत्त्वावर सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर २००६ मध्ये सर्वसामान्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली. त्यानंतरही बराच काळ या सेवेतून मिळणारा लाभांश हा ‘अॅमेझॉन’चा नफा म्हणून जाहीर केला नव्हता. मात्र, ज्यावेळी ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिस’ जगापुढे आणली, तेव्हा अनेक बलाढ्य कंपन्यांना त्यांनी चक्रावून सोडले होते. जोपर्यंत जेफ बेजोस यांच्या व्यवसायातील खाचखळगे या कंपन्यांना समजतील तोपर्यंत त्यांनी हा व्यवसाय खूप पुढे नेऊन ठेवला होता.
‘क्लाऊड सर्व्हर‘चे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. एक म्हणजे ’पब्लिक’, दुसरा ’हायब्रीड’ आणि तिसरा ‘प्रायव्हेट.’ नावाप्रमाणे पहिल्याचा प्रकारच्या सेवेचा उपयोग सर्वसामान्य जनता करू शकते. दुसर्यामध्ये काही प्रमाणात खासगी संस्था आणि सर्वसामान्य जनता यांचा अंतर्भाव असतो, तर तिसर्या प्रकारात फक्त काही खासगी संस्था, कंपन्या आणि व्यक्तींनाच याचा वापर करता येतो. ‘क्लाऊड मॅनेजमेंट’ आणि जिथे सार्वजनिक वापराचा विषय येतो तिथे सुरक्षा, गोपनीयता हे मुद्देही प्रामुख्याने चर्चिलेले असतात. याची खबरदारीही या सेवा देणार्या कंपन्यांना तितकीच महत्त्वाची असते. साधारणतः दहावर्षांपूर्वी क्लाऊड सेवा वापरणार्यांमध्ये केवळ बड्या कंपन्यांचा सामावेश होता. त्यामुळे ग्राहकही मोजकेच. भारतात उभी राहिलेली यशस्वी ’डिजिटल इंडिया’ मोहीम आणि त्याला मिळालेला जनतेचा पाठिंबा यानंतर या क्षेत्राचा सेवाविस्तार अभूतपूर्व असा झाला. महसूल वाढही तितकीच झाली. अनेक लहान मोठ्या कंपन्यांनीही क्लाऊड सेवा अवलंबिली. पूर्वीपासून डाटास्टोरेजसाठी लागणारा वेळ, जागा, संसाधने याचा विचार केला असता कंपन्यांतर्फे दिली जाणारी सेवा ही वाजवी किंमतीची होती. शिवाय डाटा सुरक्षाही तितकीच महत्त्वाची त्यामुळे कमी कालावधीत या कंपन्या लोकप्रिय ठरल्या.
यापूर्वीच्या सरकारांमध्ये भारतात इंटरनेट सेवेचा विस्तार ज्या गतीने व्हायला हवा तितका झाला नाही. शिवाय, त्या तोडीची यंत्रणा संसाधन व्यवस्था ज्यांची गरज होती, त्याचा अभावही होता. मात्र, गेल्या दशकभरातील भारतातील ही प्रगती वाखाणण्याजोगी आहे. इंटरनेट सेवेचा विस्तारलेले जाळे, मोबाईल वापरकर्त्यांची लक्षणीय संख्या, ’४जी’ सेवेचा गावाखेड्यांपर्यंत होत असलेल्या विस्तारामुळे एक वेगळे डिजिटल विश्व उभे राहिले आणि हे विश्व अखंड सुरू राहावे, त्यासाठी पडद्यामागील यंत्रणा म्हणजे क्लाऊड सेवा. क्लाऊड सेवा नेमकं काय काम करते, हे एका सोप्या उदाहरणावरून समजून घेऊ. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामाची फाईल संगणकात साठवून ठेवली आहे. मात्र, दुर्दैवाने त्या संगणकाला हानी पोहोचली आणि त्यासोबत तुम्ही साठवलेली माहितीही इतिहासजमा होते. याउलट सर्व्हरवर असलेली माहिती अबाधित राहण्याची शक्यता अधिक असते. डाटा सुरक्षा आणि साठवणुकीसाठी प्रचलित असलेल्या या यंत्रणेचे गरजेनुसार, विविध प्रकारही आहेत. या तांत्रिक मुद्द्यांमध्ये जास्त खोलवर माहितीही उपलब्ध आहे.
भविष्यात इंटरनेटचा वाढता पसारा पाहता ही सेवा आणखी विस्तारत जाणारी असेल. याअंतर्गत येणार्या विविध संधींचेही सोने करण्याची गरज आहे. अनेक कंपन्या त्यांच्या ’क्लाऊड बेस्ड्’ तंत्रज्ञानाविषयक अभ्यासक्रमही सुरू करत आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्यांसाठी अनेक नवी दारे खुली होताना दिसत आहे. अनेक क्लाऊड इंजिनिअरचे सध्याचे वेतन महिन्याला लाखोंच्या घरात आहे. भारतासारख्या देशात अद्याप खूप क्षमता आहे. ’ओटीटी प्लॅटफॉर्म्स’, ’ऑनलाईन गेमिंग’सारखे वाढत जाणारे मंच, डिजिटलायझेशन आदी सुविधा लक्षात घेता, ही गरज आणखी वाढत जाणारी आहे. जगाची बाजारपेठ जर ५०० अब्ज डॉलर्सची असेल, तर भारतासारख्या जगातील दुसरी मोठी डिजिटल बाजारपेठ असणार्या या देशाची गरज किती असेल, याचा अंदाज येईल. शिवाय, भारत हा माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणारा प्रमुख देश आहे. नुकत्याच आलेल्या एका वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार केल्यास युकेमध्ये गुंतवणूक करणार्यांमध्ये भारत हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. इंटरनेटच्या जगात विश्वासार्हताही तितकीच महत्त्वाची मानली जाते. भारतावर हा विश्वास जगातील अनेक कंपन्यांनी दाखविला आहे. ‘क्लाऊड सर्व्हिसिंग’ देणार्या कंपन्यांची व्याप्ती उत्तरोत्तर वाढतच जाईल, गरज आहे ती काळाची पावले ओळखण्याची...