नवोदित नाट्यकर्मींचा ‘संकल्प’कर्ता

12 Jul 2023 20:35:46
Article On Thetre Manager Anil Kadam

नाट्य व्यवस्थापक आणि निर्मिती सूत्रधार म्हणून काम करणार्‍या, नवोदित नाट्यकर्मींना रंगमचावर संधी देणार्‍या ‘संकल्प थिएटर आणि कल्चरल अकादमी’चे सर्वेसर्वा अनिल कदम यांच्याविषयी...

मागील ३० वर्षांपासून ‘म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँके’मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदावर कार्यरत असणारे अनिल कदम यांचा जन्म तळवडे येथे झाला. कदम यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील पालिकेच्या शाळेत झाले. तसेच, त्यांनी माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब हिरे शाळेतून घेतले. त्यावेळी शाळेतून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये कदम सहभागी होतं. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केले. मुळात कनिष्ठ महाविद्यालयात असताना कदम हे बँकेत कामासाठी रूजू झाले. त्यामुळेच त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेत पदवी मिळवली.

दरम्यान, बँकेत कामासाठी रूजू झाल्यानंतर कदम बँकेकडून होणार्‍या नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. तिथेच खरंतर कदम यांना नाटकाची आवड निर्माण झाली. मुळात बँकेतील नाट्य स्पर्धांआधी कदम यांचा नाटकाशी फार संबंध आला नव्हता; पण नंतर अभिनयाची गोडी निर्माण झालेल्या अनिल कदम यांनी ‘आविष्कार संस्थे’तून जयदेव हट्टंगडी यांच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला. तिथेच नाटकाची खरी ओळख त्यांना झाली. त्यावेळी अतुल कुलकर्णी, चेतन दातार, गिरीश पतके यांसारखे गुरुमित्र लाभल्याचे कदम आवर्जून सांगतात. त्यानंतर कदम यांनी मित्रांसह एकांकिका, ‘राज्य नाट्य स्पर्धां’मध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.

त्यावेळी दृश्य माध्यमात ही काम करण्यासाठी त्यांना विचारणा करण्यात आली होती; पण बँकेच्या व्यस्त दिनक्रमामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. म्हणून त्यांनी नाटकालाच प्राधान्य दिलं. त्यावेळी नवोदितांना मिळणार्‍या संधी या कमी असल्यामुळे कदम यांनी स्वतः एक नाट्य संस्था सुरू करण्याचा विचार केला आणि २००१ साली नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने कदम यांनी ’संकल्प थिएटर आणि कल्चरल अकादमी’ या नावाने संस्था सुरू केली. आज या संस्थेला २२ वर्षं पूर्ण झालेली आहेत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, कदम हे स्वतः या संस्थेची आर्थिक बाजू सांभाळतात. कोणत्याही कलाकराकडून नाटकात काम करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे जेव्हा आपण प्रामणिकपणे नाट्य कला जोपासण्यासाठी धडपडतो, तेव्हा आर्थिक गोष्टी दुय्यम असतात, असेही कदम सांगतात.

आज ‘संकल्प थिएटर’च्या माध्यमातून हौशी आणि प्रायोगिक नाट्य क्षेत्रात निर्मिती सूत्रधार म्हणून कदम काम करत आहेत. आतापर्यंत ‘संकल्प थिएटर’च्या माध्यमातून दहा वेळा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अनेक पारितोषिके संस्थेने मिळवली. तसेच, ५०पेक्षा जास्त एकांकिका स्पर्धेत संस्थेच्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. तसेच, सध्या ‘बिल्वा’ प्रस्तुत, लेखिका-निवेदिका श्रद्धा वझे यांचा पंजाबी साहित्यिका अमृता प्रीतम यांच्या साहित्यावर आधारित साहित्यिक कार्यक्रम ‘संकल्प थिएटर’च्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे नाटकात काम करण्यापेक्षा नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यात अनिल कदम यांनी जास्त रस घेतला. आज कलाकारांसह अनेक लेखकांना आणि दिग्दर्शकांनाही ’संकल्प थिएटर’मध्ये काम करण्याची संधी कदम यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे कदम यांनी आपल्या संस्थेतर्फे केलेली नाटके ही मनोरंजनासह तितकीच प्रबोधनात्मक आहेत. “नाटक हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम असून, नाटकातून दिला जाणारा संदेश लोकांच्या मनात खोलवर रूजतो,” असेही कदम सांगतात.

एकदा ‘कोबीची भाजी’ हे नाटक स्पर्धांसाठी ‘संकल्प थिएटर’च्या माध्यमातून करायला घेतले होते; पण त्यावेळी अनिल कदम यांचा अपघात झाला. त्यामुळे जवळ-जवळ सहा महिने कदम अंथरूणाला खिळून होते. मग नाटकातील कलाकारांना नाटक होणार का नाही, याची चिंता वाटू लागली. पण, ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणतं त्या परिस्थितीमध्ये ही कदम यांनी नाटकांचा शुभारंभ करत दणक्यात नाटकाची सुरुवात केली. याच नाटकाचे १८हून जास्त प्रयोग ’संकल्प थिएटर’च्या कलाकारांनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यावेळी त्या प्रसंगाची दखल अनेक माध्यम-संस्थांनी घेतली.

अनिल कदम हे सामाजिक कार्यातही तितकेच सक्रिय. कोरोनाच्या काळात नाट्यकर्मींना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंसाठी ज्ञानेश्वर आंगणे यांच्या सहकार्यातून कदम यांनी आर्थिक मदत केली होती. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’च्या निवडणुकीत कदम उमेदवार होते. त्यामुळेच रंगभूमीच्या उज्जवल भविष्यासाठी कदम नवोदित कलावंत आपल्या संस्थेतर्फे घडवण्याचे काम करत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा आणि ’श्री छत्रपती शिवाजी महाराज कला’ पुरस्कारही कदम यांना मिळाला आहे. तसेच, ‘संकल्प थिएटर’ला आगामी काही वर्षांमध्ये २५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने भव्य असा नाट्य महोत्सव करण्याचा अनिल कदम यांचा मानस आहे. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0