पुण्यक्षेत्र वाराणसी

12 Jul 2023 22:30:54
Article On Punya Kshetra varanasi

समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीने जनसामान्यांविषयीच्या वाटणार्‍या कळकळीने लोकांसाठी रामनामाचा उपदेश केला असला तरी काही लोकांचे मन त्याविषयी साशंक असते. ते नेहमी नामाच्या विरोधी भूमिका घेऊन रामनाम घेत नाहीत. त्यांच्या मनात सदैव संशयच असतो, अशांना समर्थांनी मागील श्लोक क्र. ९८मध्ये ’पापरूपी जीव’ असे म्हटले आहे. या पापावरून स्वामींना सगळीकडे पुण्यस्थिती असलेल्या काशिक्षेत्राची आठवण झाली असावी.

भवसागर पार करून जाण्यासाठी इतर आध्यात्मिक साधनांपेक्षा भगवंताच्या नामाचे साधन साधे, सोपे, फलदायी व हितकारक आहे, असे समर्थांनी आतापर्यंतच्या श्लोकांतून सांगितले आहे. समर्थांसारख्या अधिकारी व्यक्तीने जनसामान्यांविषयीच्या वाटणार्‍या कळकळीने लोकांसाठी रामनामाचा उपदेश केला असला तरी काही लोकांचे मन त्याविषयी साशंक असते. ते नेहमी नामाच्या विरोधी भूमिका घेऊन रामनाम घेत नाहीत. त्यांच्या मनात सदैव संशयच असतो, अशांना समर्थांनी मागील श्लोक क्र. 98 मध्ये ’पापरूपी जीव’ असे म्हटले आहे. या पापावरून स्वामींना सगळीकडे पुण्यस्थिती असलेल्या काशिक्षेत्राची आठवण झाली असावी. काशीला बनारस, वाराणसी अशा नावांनीही ओळखतात, तेथे पवित्र गंगेचा शांत प्रवाह, विस्तीर्ण धार व अनेक देवदेवतांची देवालये आहेत. काशिविश्वेश्वराचे प्रसिद्ध देवालय तेथे आहे. या परिसरात अनेक ऋषिमुनींनी पूर्वी तप:साधना केली असल्याने हिंदूंसाठी ते महान पुण्यक्षेत्र, तीर्थस्थळ आहे. या पुण्यक्षेत्री भगवान शंकरांच्या अधिपत्यामुळे तेथे भगवंताच्या नामाचे महत्त्व कसे आहे, हे आता स्वामी पुढील श्लोकातून सांगत आहेत-

जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी।
तयेमाजिं जातां गती पूर्वजांसी।
मुखें रामनामावळीं नित्यकाळीं।
जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥
समर्थ या श्लोकात काशीचा उल्लेख ‘वाराणसी’ असा करीत आहेत. काशिक्षेत्राचे माहात्म्य फार पूर्वीपासून आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांना सद्गती लाभावी, यासाठी महत्प्रयासाने गंगेला भूतलावर आणले, अशी कथा सांगितली जाते. पृथ्वीवर येताना गंगेचा ओघ प्रचंड होता. तो रोखण्यासाठी भगवान शंकरांनी प्रथम तिला आपल्या जटेत धारण केले आणि नंतर जगाला मानवेल असा गंगेचा प्रवाह जटेतून मुक्त केला. गंगा नदीचे पाणी अत्यंत शुद्ध आहे. वाराणसीला काशिविश्वेश्वराचे प्रसिद्ध मंदिर, गंगेचा प्रसन्न घाट त्यामुळे या क्षेत्राला हिंदूंच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. तेथील काशिविश्वेश्वराचे दर्शन व गंगास्नान यांनी आपली जन्मोजन्मीची पापे नाहीसी होतात व अंत:करण शुद्ध होते, अशी हिंदूमनाची श्रद्धा आहे.
 
पूर्वीच्या काळी प्रवासाची साधने नसल्याने काशियात्रा करणे फार अवघड होते. सर्वांना ती घडत नसे. तथापि, आयुष्यात एकदा तरी काशियात्रा करावी, असे त्यावेळी लोकांना वाटत असे. त्यामुळे ’काशीस जावे नित्य वदावे’ असे म्हणण्याची प्रथा पडली. या संकल्पाची मनात सतत उजळणी होत राहिली, तर कधीतरी काशियात्रेचा योग येईल अशी सकारात्मक भावना त्यावेळी लोकांच्या मनात असे. समर्थांच्या काळी वाराणसी म्हणजेच काशी हे सर्व हिंदुस्थानातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले गेले होते. जर या काशिक्षेत्रात एखाद्याला मृत्यू आला, तर ते परमभाग्याचे समजले जाई. कारण, काशीसारख्या तीर्थक्षेत्रात मृत्यू आला, तर त्या जीवाला चांगली गती प्राप्त होतेच, पण त्याच्या पूर्वजांनाही सद्गती प्राप्त होऊन ते जन्ममरणांच्या फेर्‍यांतून मुक्त होतात, अशी त्याकाळच्या लोकांची श्रद्धा होती. समर्थांनी याचा उल्लेख या श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत केला आहे. तो असा- ’तयेमाजिं जातां गती पूर्वजांसि।’ या ओळीतील ‘तयेमाजिं जातां’ याचा अर्थ ‘त्याठिकाणी देह सोडून जाता’ असा आहे. सर्वसाधारणपणे जीव जन्ममरणांच्या फेर्‍यांतून सुटत नाही. कारण, मृत्यूसमयी देह सोडून जाताना हा जीव अनेक अतृप्त कामना, वासना यात गुंतलेला असतो. त्यामुळे त्या जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असे शास्त्रात सांगितले आहे.

काशिक्षेत्राची मुख्य देवता भगवान शंकर आहे. त्यामुळे तेथे मृत्यू पावलेल्या जीवांची काळजी भगवान शंकर घेतात,असे मानले जाते. महादेव सतत रामनाम घेत असल्याने भगवान शंकर, काशिक्षेत्रात मरण पावलेल्या जीवाच्या कानात रामनामाचा संकल्प देऊन, त्या जीवाची जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ती करतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. हिंदू धर्मात गुरूने केलेल्या कर्णोपदेशाला फार महत्त्व आहे. येथे तर प्रत्यक्ष भगवान शंकर गुरू असल्याने त्यांनी मृतात्म्याच्या कानात सांगितलेल्या रामनामाला निश्चित महत्त्व आहे. त्यात जीवाचे हित आहे. त्यातून त्याला व त्याच्या पूर्वजांना सद्गती प्राप्त होते. हा सारा श्रद्धेचा भाग आहे. तथापि पुढे पुढे याचा विपर्यास आल्याने लोक मृतात्म्यांची प्रेते गंगेत विसर्जित करू लागले. त्यामुळे मृतात्म्याला सद्गती मिळेल की नाही हे सांगता येत नाही, पण त्याद्वारा आपण गंगाप्रदूषणाचे पाप करतो, हे मात्र निश्चितपणे सांगता येते. गंगा ही पवित्र नदी आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या अस्थी श्रद्धापूर्वक विसर्जित करायला हरकत नाही. तशी प्रथा सर्वत्र असल्याचे दिसून येते. या काशिक्षेत्रात सतत रामनाम घेणारे शंकर जगाला हितकारक रामनाम सांगतात.

काशिक्षेत्राची धन्यता सांगितल्यावर समर्थ पुढील श्लोकात पुन्हा पापरुपी जीवाची अवस्था वर्णन करीत आहेत-
येथासांग रे कर्म तें हि घडेना।
घडे धर्म से पुण्य गांठी पडेना।
दया पाहतां सर्व भूतीं असेना।
फुकाचे मुखीं नाम तें हि वसेना ॥१००॥
धर्मात सांगितलेली कर्मे यथासांग करता येत नसल्याने, त्यापासून जे पुण्य अपेक्षित आहे, त्याचा लाभ माणसाला होत नाही. कर्माचरणात काही ना काही तरी त्रुटी राहतातच. अर्धवट कर्माचे पुण्यफळ मिळत नाही. स्वामींनी हा विषय यापूर्वी ७४व्या श्लोकात घेतला आहे. तेथे स्वामी सांगतात की, कर्ममार्गातील साधनांसाठी अपार कष्ट करावे लागतात. बरं ते सोडून व्रत, उद्यापन, दान या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी करायला जाव्यात, तर त्यासाठी जवळ भरपूर पैसा असावा लागतो.

सामान्य माणसांना ते शक्य नसते. तसं पाहिलं तर कर्मकांडांचे पालन, कर्ममार्गातील शुचिर्भूतता, व्रत उद्यापन, दानधर्म या प्रकारांनी चित्तशुद्धी झाली पाहिजे, अहंकार कमी झाला पाहिजे. पण, तसे होताना दिसत नाही. या साधनांच्या पालनांचाच माणूस गर्व करू लागतो. या सर्व प्रकारात कर्मफळाची अपेक्षा असल्याने देहबुद्धी अधिक घट्ट होते. देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धीचा उदय झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती होत नाही. सर्व प्राणिमात्रांवर दया केली, तर मन अनासक्त होते, अंतःकरण निर्मळ होते. पण, तेही माणसाला करता येत नाही. बरं हे सर्व नको, जाऊ द्या, निदान फुकटचे रामनाम तरी मुखी असू द्या आणि तेही नको असेल, तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. यानंतर भगवंताच्या नामाने दोष कसे आपोआप नाहीसे होतात, हे सांगून पुढील श्लोकांत समर्थांनी पहिले शतक संपवले आहे. मनाच्या श्लोकांना समर्थ ’मनाची शते ’म्हणतात. त्यातील एक शतक पुढील १०१वा श्लोक सांगून स्वामींनी संपवले आहे.

७७३८७७८३२२

Powered By Sangraha 9.0