अमेरिकेमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, असे म्हटले जाते. मात्र, त्याच्या मर्यादा कधी-कधी उघड्याही होतात. उदाहरणार्थ अमेरिकेच्या युटा राज्यातील ही घटना बघा. बाल आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामधून हिंसा आणि लैंगिकता, लैंगिक संबंधांबाबतचे पुस्तक गाळावे, असा कायदाच केला गेला. या कायद्यानुसार या राज्यातील सॉल्ट लेक सिटीच्या डेविस स्कूल डिस्ट्रिक्ट नॉर्थने शेरमन एलेक्सीचे ‘द अॅब्सोल्यूटली ट्रू डायरी ऑफ पार्ट टाईम इंडियन’ पुस्तक आणि जॉन ग्रीनचे ‘लुकिंग फॉर अलास्का’ ही दोन पुस्तके शालेय अभ्यासक्रमातून वगळली. विशेष म्हणजे, शाळेने बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथसुद्धा अभ्यासक्रातून वगळला. बायबल अभ्यासक्रमातून का वगळले, हे सांगताना शाळेच्या प्रशासनाने स्पष्टीकरण दिले की, ‘बायबलमध्ये अनेकवेळा हिंसा, अवैध लैंगिक संबंध आणि बलात्काराच्या घटना नमूद केलेल्या आहेत.
या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊ शकतो.’ अर्थात, शालेय प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी आव्हान दिले. मोर्चे काढले, मागणी केली की, हिंसा किंवा लैंगिक संबंध किंवा बलात्कारासंदर्भातील घटना वगळून शाळेने मुलांना बायबल शिकवायलाच हवे. याबद्दल वाचनस्वातंत्र्य मानणार्या व्यक्तींचे म्हणणे आहे की, काय वाचावे हे वाचकाचे स्वातंत्र्य आहे. मात्र, बायबल जर पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट होत असेल, तर मग शालेय अभ्यासक्रमात निर्बंध घातलेली इतर पुस्तकेसुद्धा अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवी. मिसुरी आणि टेक्सास या प्रांतातील शाळांनीही त्यांच्या त्यांच्या वाचनालयांमधून बायबलला वगळले होते. अमेरिकेतील ’अमेरिकन लायब्ररी असोसिएशन’च्या यादीमध्ये बायबल हे असे पुस्तक आहे की, ज्याला सगळ्यात जास्त आव्हान दिले गेले आहे.
या अमेरिकेच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि श्लील-अश्लीलतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची लाकेज-लाचनी आणि तिने जिंकलेली न्यायालयीन लढाईही पाहणे गरजेचे. तिच्यावर अश्लीलता पसरवण्याचा गुन्हा होता. २०२२ साली लाकेज-लाचनी ही युवती अमेरिकेच्या लुुइसियानामधील डाऊनटाऊन विनफील्डमध्ये आयोजित केलेल्या संगीत उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी गेली. तिच्यासोबत तिचे कुटुंबीयही होते. इतक्यात तीन महिला पोलीस आल्या आणि त्यांनी लाचनीला अटक केले. लाचनीला जेव्हा अटक झाली, तेव्हा तिने काळ्या रंगाचा क्रॉप्ड टी-शर्ट और डेनिम शॉर्ट्स असा पोषाख परिधान केला होता. अमेरिकन कायद्यानुसार शरीराचे जे भाग दाखवायचे नाहीत, ते भाग तिने कपड्याने झाकले होते; तरीसुद्धा तिला अटक झाली होती. पोलिसांचे म्हणणे होते की, ’तिचे कपडे सैल होते आणि त्यातून तिचे अंतवस्त्र आणि शरीर दिसत होते.’ त्यानंतर लाचनी हिने कायदेशीर लढाई लढली.
न्यायालयीन लढाई ती जिंकलीदेखील; पण या घटनेनंतर पुन्हा अमेरिकेमध्ये काय श्लील आणि काय अश्लील, याची चर्चा सुरू आहे. कपडे आणि आविर्भाव यामध्ये कमालीची सजगता दाखवणार्या अमेरिकेमध्ये नुकतीच एक घटना घडली. फ्र्र्रॅन्कलीनमधील फुटबॉल क्लबचा प्रमुख प्रशिक्षक कैमिलो याला अटक करण्यात आली. ६३ वर्षांचा कैमिलो एका उपहारगृहामध्ये गेला, तिथे तो मोबाईल विसरला. मोबाईल कुणाचा राहिला हे पाहण्यासाठी उपहारगृहाच्या लोकांनी तो मोबाईल अनलॉक केला, तर त्यात त्यांना ९ ते १६ वर्षांच्या बालकांचे स्वतंत्र दहा व्हिडिओ दिसले. ज्यात ही मुले बेशुद्ध होती आणि कॅमिलो त्यांच्यावर बलात्कार करत होता. अर्थात, उपहारगृहाच्या नोकरवर्गाने तो मोाबईल पोलिसांना दिला आणि कॅमिलोला पोलिसांनी पकडले. २० वर्षांपासून तो प्रशिक्षक आहे आणि खूप लोकप्रिय आहे. इतक्या वर्षांमध्ये हजारो मुले त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी आली होती. मोबाईलमध्ये दहा पीडित मुले दिसली; पण कॅमिलोने अत्याचार केलेले अनेकजण असू शकतात. कुणीही त्याच्याविरोधात तक्रार केली नाही. पीडित बालके आणि त्यांचे पालक ही गप्प बसले, असा प्रश्न अमेरिकन प्रशासनला पडला आहे,
भयंकर! अमेरिकेमध्ये उठसूठ गोळीबार होण्याच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. यावरून एकच वाटते की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि कायदे हे नुसते घटनेत लिहून होत नसते, तर त्यावर नीतिपूर्वक अंमलबजावणी करणारे मन आणि संस्कारही नागरिकांमध्ये असावे लागतात.