मुंबई रेल्वे अतिरेकी हल्ल्याला १७ वर्ष पूर्ण

11 Jul 2023 15:15:30
Bharatiya Janata party Leader Kirit Somaiya

मुंबई
: मुंबई लोकलमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला जवळपास १७ वर्षे उलटून गेली असली तरी अद्याप अतिरेक्यांविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरुच आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १७व्या स्मृतिदिनानिमित्त माहिम रेल्वे स्टेशन येथे उभारण्यात आलेल्या स्मारकाला भेट दिली. त्यांनी मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली, स्मरणांजली अर्पण केली. तसेच, याप्रसंगी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचे परिवार, सदस्य किरीट सोमय्यांसोबत उपस्थित होते.
 
दरम्यान, याप्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत दहशतवादाविरुध्द लढा देत आहे, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय या भयावह हल्ल्यातून सावरत नव्याने आयुष्य जगत आहेत, असे म्हणत त्यांनी यावर समाधान व्यक्त केले.
 
दि. ११ जुलै, २००६ रोजी झालेल्या मुंबई लोकल ट्रेन्सवरील हल्ल्यातील आरोपी अतिरेक्यांवर न्यायालयीन लढाई सुरु असून त्याबाबत अंतिम निर्णय लवकर होऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीसुध्दा किरीट सोमय्यांनी केली. दरम्यान, याप्रसंगी महेंद्र पितळे,पदमचंद गांधी, हंसराज कनौजिया, अरविंद ओझा, कमलेश खेमका, रमेश नाईक, साळुंखे जी, मा. नगरसेवक व महाराष्ट्र भाजप चे प्रवक्ते डॉ. नील सोमैया,मा. नगरसेविका शितल गंभीर, माहीम भाजपा अध्यक्ष अक्षता तेंडूलकर, भाजपा वॉर्ड अध्यक्ष डेविड अल्फोन्सो व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0