एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटर या प्रभावशाली समाजमाध्यमाने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे झाले असे की, रविवारी या भागातील लोकांनी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलमधील घडामोडी पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले, तेव्हा हे हॅण्डल ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश झळकला. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या काश्मीर अंतर्गत असल्याचे सांगण्यात आले.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग आहे, त्यासाठी आम्ही आमच्या प्राणांची बाजीही लावू,” असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे ‘कलम ३७०’ संपुष्टात आणल्यानंतरच्या चर्चेस उत्तर देतानाचे वक्तव्य हे चांगलेच गाजले होते. समाजमाध्यमांवर तर गृहमंत्री शाह यांचे ते वाक्य नेहमीच ‘ट्रेंडिंग’ असते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील वेळोवेळी पाकव्याप्त काश्मीर विषयीच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. त्याचप्रमाणे विविधप्रसंगी वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनीही भारतीय सैन्य सज्ज असून, केवळ केंद्र सरकारने आदेश देण्याची गरज आहे, असे सांगितले आहे. भारताची किती तयारी आहे, हे भारतीय सुरक्षादलांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअरस्ट्राईक’ करून यापूर्वीच दाखवून दिले आहे.
त्यातच सध्या पाकिस्तानमध्येच बंडाळीचे आणि आर्थिक दिवाळखोरीची स्थिती निर्माण झाली असताना, पाकव्याप्त काश्मीरमध्येही विविध घडामोडी वेगाने घडत आहेत. तेथील जनतेने काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कराविरोधात आंदोलन केले होते. हजारो लोकांनी महामार्ग रोखून धरून पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांना थेट आव्हान दिले होते. पाक लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील जमिनींवर मोठ्या प्रमाणात कब्जा केल्याचा आणि स्थानिकांकडून जमिनींची मालकी काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचवेळी स्थानिकांनी भारतामध्ये सामील होण्याची इच्छा असल्याचेही म्हटले होते. अर्थात, अशी आंदोलने अतिशय क्रूरपणे दडपण्याचा दांडगा अनुभव असलेल्या पाकिस्तान सरकार आणि लष्कराने हे आंदोलनही दडपले होते. मात्र, पाकव्याप्त काश्मीरचे आंदोलन असे दडपून संपविता येणार नसल्याचा अंदाजही पाक सरकार आणि लष्करास आला होता.
पाकिस्तानने हे आंदोलन दडपले असले, तरीदेखील गिलगिट-बाल्टिस्तानमधील राजकीय अस्थिरता मात्र संपलेली नाही. कारण, दि. ४ जुलै रोजी गिलगिट-बाल्टिस्तानमधील अपील न्यायालयाने मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांची कायद्याची पदवी बनावट असल्याचे घोषित केले आणि त्यांना अपात्र ठरवले. या घटनेनंतर येथील राजकीय पेच अधिक गडद झाला आहे. ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) नेते खालीद खुर्शीद यांच्या पदवीबाबत न्यायालयाच्या निकालाच्या एक दिवस आधी म्हणजे दि. ३ जुलै रोजी नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होणार होती. त्या दिवशी कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी गिलगिट शहरातील विधानसभेला घेराव घातला. कर्मचारी, सदस्य आणि पत्रकारांना आवारातून बाहेर काढून विधानसभेची इमारत सील करण्यात आली.
माजी पंतप्रधान इमरान खान यांचा पक्ष ’पीटीआय’ गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तीन गटात विभागला गेला आहे. मागील सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले जावेद मनवा यांनी ‘पीटीआय’ असंतुष्टांचा ’हम ख्याल ग्रुप’ स्थापन केला आहे. याशिवाय हाजी गुलबर खान आणि अपात्र खालीद यांच्यात दुफळी माजली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ’पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) आणि ’पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ’ (पीएमएल-एन) यांच्यासोबत युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जोरदार संकेत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती होती. दि. ११ एप्रिल रोजी पाकव्याप्त काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान आणि ’पीटीआय’ नेते तन्वीर इलियास यांना उच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात सभागृहाचे सदस्यत्व आणि पंतप्रधानपदावरून अपात्र ठरवले होते. त्यामुळे या नव्या पेचप्रसंगातून पाकला आता मार्ग काढावा लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटर या प्रभावशाली समाजमाध्यमाने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे झाले असे की, रविवारी या भागातील लोकांनी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलमधील घडामोडी पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले, तेव्हा हे हॅण्डल ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश झळकला. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या काश्मीर अंतर्गत असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा वापरकर्त्यांनी येथून ट्विट केले, तेव्हा तेथील लोकांना ते भारताचा भाग असल्याचे सांगण्यात आले. कारण, ते सध्या राहत असलेले ठिकाण हे काश्मीरमध्ये आहे.
वापरकर्त्यांनी बराच काळ सरकारच्या हॅण्डलचा एक्सेस घेण्याचा करण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी त्यांना कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून भारतात खाते गोठवले, असे उत्तर मिळाले. मार्चपासून, पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. २०२२ मध्ये कायदेशीर तक्रारींनंतर खाते दोनदा बंद करण्यात आले होते. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमधील खात्यांनाही ट्विटरने ब्लॉक केल्यानंतर पाकमध्ये खळबळ उडाली. पाकमधील वृत्तपत्र ‘डॉन’नेदेखील या घटनेची दखल घेऊन वृत्त प्रकाशित केले आहे. त्यांनी यासिर हुसेन नामक ट्विटर वापरकर्त्याचा हवाला देत म्हटले आहे की, “जेव्हा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकेशन जोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आढळले की ते पाकिस्तानऐवजी भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये असल्याचे दाखवले जात आहे. पाकिस्तानच्या अधिकार्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी,” असे ‘डॉन’ने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे भारताने गिलगिट-बाल्टिस्तानचे जिओ टॅगिंग बदलण्यासाठी ट्विटरवर प्रभाव टाकला असावा, अशीही शंका ‘डॉन’कडून व्यक्त करण्यात आली आहे. पाकमधील काही लोकांनी ट्विटरकडे याविषयी विचारणादेखील केली. मात्र, त्यांनादेखील ट्विटरने साचेबद्ध उत्तर देण्यात आले. त्याचप्रमाणे याविषयी पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाकडूनही कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचेही ‘डॉन’ने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणामुळे ट्विटरने संभाव्य घडामोडींची भविष्यवाणी तर केली नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे.