पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

10 Jul 2023 18:46:24
PM Narendra Modi Lokmanya Tilak National Award

पुणे
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांना पुरस्काराने गौरविले जाईल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे.

सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्‍वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची वेळ लवकरच जाहीर केली जाईल. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन.आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीत स्वदेशी हा महत्त्वाचा भाग आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उद्योगांच्या प्रगतीला नवी दिशा दिली, याकडे डॉ. रोहित टिळक यांनी लक्ष वेधले.

ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्‍क आहे’, अशी सिंहगर्जना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकासासाठी सुराज्याची व्यक्‍त केलेली गरज आणि त्यासाठी आखलेली धोरणे, हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल होय. समाजातील गरीब, अतिगरीब, असुरक्षित आणि उपेक्षितांकरता सुराज्य आणण्यासाठी ते कार्यरत आहेत. आर्थिक, सामाजिक सुरक्षा, आरोग्य आणि सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत, या धोरणांद्वारे पंतप्रधान मोदी यांनी मानव केंद्रित दृष्टीकोनातून विकासावर भर दिला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी घडविलेला गुजरातचा विकास सर्वांसाठी आदर्श ठरला.

डॉ. रोहित टिळक म्हणाले, आत्मनिर्भर भारत किंवा स्वयंपूर्णता यावर पंतप्रधान मोदी यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ही काळाची गरज होती. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी मोदी सरकारने विविध सुधारणा केल्या. यातून उद्योजक-व्यावसायीकांना व्यवसाय करणे सोपे झाले. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेद्वारा गुंतवणुकीला चालना मिळाली आहे, बौद्धिक हक्क संपदेचे रक्षण, उत्पादनासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार यांसह अनेक घटकांमुळे प्रगतीचे नवे टप्पे पार करता येतील. २०१४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा दहावा क्रमांक होता. आता तिने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. येत्या काळात ती आणखी उंची गाठेल. जोपर्यंत नागरिकांची नाळ संस्कृतीच्या मुळाशी जुळत नाही, तोपर्यंत कोणताही समाज फुलत नाही. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. या उत्सवांतून जागृतीबरोबरच भारतीयांमध्ये सांस्कृतिक संवेदना जागृत होण्यास मदत मिळाली.

आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदी यांनी संस्कृतीला सर्वोच्च स्थान दिले आहे. काशी, केदारनाथ आणि अयोध्या येथील कामे त्याची प्रचीती देतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अपरिचित नायकांची माहिती घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी आदिवासी संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला. १५ नोव्हेंबर हा ‘जनजातीय गौरव दिवस’ घोषित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंच तीर्थाचा विकास करण्याचे ठरवले. ही बाब त्यांच्या विशाल दृष्टीचे उदाहरण ठरले आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉर खुला करून सांस्कृतिक पाळेमुळे अधिक बळकट केली.

गेल्या नऊ वर्षांत भारताच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. जग भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. जग मानवासाठी अधिक अनुकूल बनविण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे संपूर्ण विश्‍वाला वाटू लागले आहे. त्यामुळेच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याचे ठरवले, असे डॉ. रोहित टिळक यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, कोरोनाच्या महासंकटात त्यांच्या दूरदर्शी धोरणामुळे १४० कोटी देशवासीयांना कोणत्याही अडथळ्याविना लस उपलब्ध झाली. याचबरोबर कोरोनावरील भारतीय लशीमुळे जगातील अनेक देशांना मदतीचा हात मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने आखलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे. यातून बेरोजगारीची समस्या लक्षणीयरीत्या कमी होईल. लोकमान्य टिळकांनीदेखील कौशल्य विकास शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. या शिक्षणातून रोजगार वाढेल हा त्यांचा विश्वास होता. याच भूमिकेतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांची आर्थिक क्षमता वाढावी यासाठी त्यांनी तळेगावात काच कारखाना उभारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. स्वतंत्र भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून २६ मे २०१४ रोजी त्यांनी शपथ घेतली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशातील नागरिकांच्या मनात त्यांनी जागविलेल्या देशप्रेमाच्या भावनेमुळे देश आज आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल करीत आहे.


Powered By Sangraha 9.0