स्पेनच्या पूर्वेकडील जंगलाच्या पठारावर प्रझेवाल्स्कीचे घोडे गवत चरताना आढळून आले. त्यांचे फिकट तपकिरी रंगाचे पोट आजूबाजूच्या करड्या अन् हिरव्यागार वातावरणासमोर विरोधाभासी दिसते. या भागासाठी हे दृश्य नवीन आहे. स्पेनच्या पूर्व भागात ८.५ लाख हेक्टरवर पसरलेल्या या पुनर्वन्यजीवीकरण प्रकल्पात, येथील मूळ वन्यजीव प्रजातींचे पुनर्प्रस्थापन करण्याचा स्पेन सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये ‘इबेरियन हायलॅण्ड’ पुनरुज्जीवित करणे, हा मूळ उद्देश आहे. हा प्रकल्प इबेरियन प्रदेशातील दक्षिणेकडील भागावर केंद्रित आहे. हे विस्तीर्ण आणि मनमोहक डोंगर, टेकड्या, दर्या तसेच पाईन, ओक, जुनिपरची जंगले, गवताळ प्रदेश आणि कृषी क्षेत्रांचा समावेश असलेला हा प्रदेश मंत्रमुग्ध करणारा आहे.
‘इबेरियन हायलॅण्ड्स’ तीन मुख्य भागांनी बनलेले आहेत: ’सेरानिया डी कुएन्का’, ’अल्टो ताजो’ आणि ’मॉन्टेस युनिव्हर्सेल कॅस्टिला-ला मांचा’ आणि ’अरागॉन’चे प्रदेश. देशाच्या पूर्वेकडील ‘इबेरियन हायलॅण्ड्स’ प्रदेशात पशुधन शेती आणि वन्य प्राण्यांची शिकार फार पूर्वीपासून होत होती. परंतु, आता परिस्थिती बदलते आहे. याचे कारण म्हणजे एक नवीन आणि आशादायक ‘ट्रेंड’ तिथे उदयास येत आहे, तो म्हणजे निसर्ग पर्यटन. या प्रदेशातील जैवविविधता संपन्न आणि मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे निसर्ग पर्यटनाला वाव आहे. पर्यटन संधी निर्माण झाल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थांना वैविध्य आणि बळकटी येते.
गेल्या दोन दशकांमध्ये या भागातील अनेक लोक शहरी भागांमध्ये कायमचे स्थलांतरित झाले. परिणामी, हा युरोपमधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश बनला. या भागात हरीण, आयबेक्स आणि रानडुक्कर यांसारख्या प्रजातींनी उल्लेखनीय पुनरागमन सुरू केले आहे. या प्रकल्पाच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे जुन्या-वाढीच्या जंगलांचे संरक्षण करणे. या परिसरातील स्थलांतराने निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे उपजीविकेच्या संधी नष्ट झाल्या. याचे निराकरण करण्यासाठी हा प्रकल्प शाश्वत निसर्ग-आधारित पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतो. शिवाय, या प्रदेशातील नैसर्गिक रहिवासी असलेल्या इबेरियन लांडगे परिसराच्या पर्यावरणीय पुनर्संचयनास हातभार लावतात. ’इबेरियन हायलॅण्ड्स’मध्ये इजिप्शियन गिधाडांची युरोपमधील सर्वात मोठी लोकसंख्या आहे. त्याचबरोबर काळी गिधाडे आणि इबेरियन लिंक्स यांसारख्या प्राण्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. मानवी हस्तक्षेप नाहीसा झाल्यामुळे विविध प्राण्यांच्या प्रजातींनी आधीच ‘इबेरियन हायलॅण्ड्स’मध्ये त्यांचे निवासस्थान पुन्हा मिळवण्यास सुरुवात केली आहे.
वनीकरणाच्या प्रयत्नांमध्ये स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी, एक सार्वजनिक मोहीम सुरू केली जात आहे. यामध्ये नागरिकांना जुनी झाडे दत्तक घेतील आणि त्यांच्या खरेदीद्वारे लाकडाच्या मूल्याची भरपाई करता येईल. हा उपक्रम वनसंवर्धनासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देतो आणि लोकसहभाग वाढवतो. मालकी आणि जबाबदारीची भावना वाढवून, मोहिमेचे उद्दिष्ट अधिक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध नैसर्गिक वातावरणासाठी सामायिक दृष्टी निर्माण करणे आहे. स्थानिक समुदायाच्या दैनंदिन जीवनात वन्यजीव-सम्यक दृष्टिकोन आणणे, जबाबदार निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देणे, स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. असे केल्याने, वैविध्यपूर्ण नैसर्गिक संपत्ती ही या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकते. नैसर्गिक कुरणे पुनर्संचयित करणे, ही या प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे जैवविविधता सुधारते आणि मातीचे पुनरुज्जीवन होते. शिवाय, प्रझेवाल्स्कीचे घोडे, सेरानो घोडे आणि टोरोचे कळप (अरोचसारखे दिसणारे गुरे) यांसारख्या चराईचा परिचय जंगलातील बायोमास कमी करण्यास मदत करते.
‘इबेरियन हायलॅण्ड्स’ रिवाइल्डिंग प्रकल्प हा लॅण्डस्केप पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न आहे. वैविध्यपूर्ण आणि पुनरुज्जीवित नैसर्गिक वातावरणावर आधारित समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थापना करणे, हे त्याचे ध्येय आहे. या प्रकल्पाद्वारे लोकांच्या विचार पद्धती बदलणे, सार्वजनिक समर्थन निर्माण करणे, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आहे. निसर्ग पर्यटनाला चालना देऊन, स्थानिक समुदायाचा समावेश करून आणि स्थानिक व्यवसायांना सक्षम बनवून हे साध्य केले जाते. यामध्ये भागधारकांशी गुंतणे, यासाठी प्रभावी संवाद आवश्यक आहे.