मुंबई (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत टॅग केलेले बागेश्री हे कासव आता श्रीलंकेतील गेल शहराजवळ असल्याचे लक्षात आले आहे. साधारण चार दिवसांपुर्वी हे कासव श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासुन १५० किलोमिटरच्या अंतरावर होते. आता पुढे प्रवास सुरु ठेवत ते गेल शहर जवळ करते आहे. तर, गुहा या मादी कासवीणीने दक्षिणेकडे पाठ फिरवली असुन ती आता उत्तरेच्या दिशेने प्रवास करते आहे.
काही दिवसांपुर्वी केरळाच्या किनाऱ्यांवर असलेल्या बागेश्रीने रत्नागिरीहुन थेट श्रीलंकेपर्यंतचा प्रवास कापलाय. रत्नागिरीतील गुहागरच्या किनारी बागेश्री आणि गुहा या दोन कासवीनींना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. भारताच्या दक्षिण टोकाकडे सुरु असणारा या दोन्ही कासविणींचा प्रवास अतिशय उत्सुक्तापुर्ण राहिला आहे. बागेश्री झपाट्याने प्रवास करत असुन तिने याआधी कर्नाटका, केरळ अंतर कापत आता श्रीलंका गाठण्याच्या तयारीत आहे.
गुहाचा प्रवास तुलनेने सावकाश होत असला तरी कर्नाटका पार करुन ती लक्षद्विपमधील कडमाट बेट जवळ करत होती मात्र, आता तिने दक्षिणेकडे पाठ फिरवली असुन तिने पुन्हा उत्तरेच्या दिशेने आपला प्रवास सुरु केल्याचे चित्र आहे. बागेश्री ही आता आणखी पुढे प्रवास करत ते श्रीलंकेचा किनारा लवकरच जवळ करेल असे दिसते.