मेंदू दे, बुद्धी दे, देवा बुद्धी दे!!!

01 Jul 2023 22:29:32
Article On Dalit And Muslim Community

दलित आणि मुस्लीम समाजाची एकी व्हावी आणि त्यातून सत्ता प्राप्त करावी, असे बेरकी राजकारण अनेक नेते करत आहेत. त्यातही नवबौद्ध समाज आणि मुस्लीम समाज यांची युती करून पदरात मत पाडून घ्यायचा विचारही काही नेते करत आहेत. राजकारण बाजूला ठेवले तरीसुद्धा सामाजिक दृष्टीने दलित आणि मुस्लीम समाजाची एकी याबद्दल वास्तव काय आहे? बौद्ध आणि मुस्लीम या दोन्हींचा इतिहास आणि त्या इतिहासासचे परिणाम यातून समाजासमोर काय वास्तव आहे? याचा मागोवा घेणारा हा लेख...

प्रकाश आंबेडकरांसारख्या राजकारण्यांना सत्ताप्राप्तीसाठी दलित आणि मुस्लिमांची युती करायची आहे. दुसरीकडे आपण मोठे पुरोगामी निधर्मी आणि तथाकथित मानवतावादी वगैरे आहोत, असे सांगणारेही काही लोक आहेत. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच. पण, हे लोक ’दलित मुस्लीम भाई-भाई हिंदू कौम कहासे आर्ई’चा नारा देतात; पण प्रकाश आंबेडकर आणि हे काही मोजके लोक यांना कितीही दलित-मुस्लीम एकी हवी असली, तरीसुद्धा समाजाचे मत काय आहे? याबाबत विचार करताना जाणवते की, समाजाला कळले आहे की, मुस्लीम समाजातील कट्टरतावाद्यांच्या दृष्टीने हिंदू समाजातील प्रत्येक जातगट हा गैरमुस्लीम असून काफीरच आहेे. देशात अशा अनेक घटना घडल्या, ज्यामध्ये मागासवर्गीय समाजाच्या युवकाचे मुस्लीम युवतीसोबत प्रेमप्रकरण होते. मात्र, या प्रेमाचे बक्षीस म्हणून त्या युवकाचा खून झाला. हिमाचल प्रदेशामध्ये मनोहर खट्टर असू दे की, कर्नाटकमधला विजय कुमार कांबळे असू दे की, तेलंगणचा बि. राजू असू दे की, राजस्थानचा खेतराम भिम असू दे की, हरियाणाचा संजय असू दे, हे सर्व जण मागासवर्गीय हिंदू होते.

मुस्लीम मुलींशी प्रेम होते; म्हणून त्यांचा निर्घृण खून त्या मुलींच्या नातेवाईकांनी केला. दलित-मुस्लीम एकच आहेत, म्हणणारी मंडळी या विषयावर काहीही बोलताना दिसत नाही. ‘आयआयटी पवई’मध्ये दर्शन सोळंकी या मागासवर्गीय तरुणाने आत्महत्या केली. मागासवर्गीय मुलाने आत्महत्या केली, तर त्याला मारणारा सवर्ण हिंदूच असणार, या पूर्वग्रहदूषित मानसिकतेमुळे तेव्हा काही संघटनांनी प्रचंड गदारोळ माजवला. या संघटनाही हिंदुत्व विरोधी होत्या. (हिंदुत्व विरोधी असणे म्हणजे दलित-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कर्ता असणे, हे या संघटनांचे अजब समीकरण) पुढे जसे खर्‍या गुन्हेगाराचे अरमान खत्रीचे नाव समोर आले, तेव्हा कुणीही तोंडातून साधा ‘ब्र’ही काढला नाही. कारण, मग दलित-मुस्लीम ऐक्यावर घाला आला असता म्हणे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नगरमध्ये, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे घेतलेले एक टोळके घुसले. त्यांनी मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या आयाबहिणींची छेडछाड केली, त्यांना त्रास दिला. यामुळे नगरमध्ये बौद्ध आणि मुस्लीम समाजामध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर छोट्यामोठ्या घटना घडतच आहेत. या अनुषंगाने बौद्ध आणि मुस्लीम या दोघांची एकी होती की, काय होते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर कधी काळी बौद्ध साम्राज्य आणि बौद्धकेंद्री असलेल्या काश्मीर आणि लडाखच्या इतिहासाचा मागोवा घ्यायला हवा. हा मागोवा घेताना डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले यांच्या बौद्ध-मुस्लीम संबंध आजच्या संदर्भात या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे. हे दोन प्रदेश मुस्लीमबहुल कसे झाले, हा इतिहास समजून घेतला की, बौद्ध आणि मुस्लीम समाजाची एकी, मैत्री किती खरी किती खोटी, याबद्दल तर्कशुद्धता येते.
 
काश्मीरची सत्ता मिळावी म्हणून अनेक शतके अनेक वेळा मुस्लीम आक्रमणकर्ते आक्रमण करत राहिले. पण, ते काश्मीरला जिंकू शकले नाहीत. १३व्या शतकात काश्मीरचा राजा होता रिंचेन शहा. बौद्धधर्मीय रिंचेनच्या संपर्कात बुलबुल शहा नामक सुफी व्यक्ती आली. त्याने रिंचेनचे धर्मांतरण केले. राजा मुस्लीम झाला; म्हणून राज्यातील बहुसंख्य नागरिक मुस्लीम झाले. मुसलमान झाल्यानंतर रिंचेन याने ‘सद्र उद्दिन’ नाव लावायला सुरुवात केली. ‘बाटग्याची बांग मोठी’ अशी एक नागरी म्हण आहे. त्यानुसार रिंचेन हा सद्र उद्दिन होताच. त्याने काश्मिरी गैर-मुस्लीम जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली. पुढे मृत्यूची चाहूल लागताच त्याने त्याच्या मुलाची जबाबदारी त्याच्या अत्यंत विश्वासू मंत्री शहामीर याच्यावर सोपवली. शहामीर इतका विश्वासू होता की, रिंचेनचा मृत्यू झाल्या झाल्या त्याने रिंचेनची विधवा पत्नी राणी कुटा हिला विवाहाचा प्रस्ताव पाठवला. कुटाने विरोध केला, लढाईही केली. पण, शेवटी शहामीरने तिच्याशी जबरदस्तीने निकाह लावला. मात्र, निकाहानंतर अंतपूरात येताच कुटाने शहामीरसमोरच स्वतःला तलवारीचे वार करत संपवले. त्यानंतर शहामीर काश्मीरचा राजा झाला. शहामीरने ‘शम्स उद्दीन’ नाव लावायला सुरुवात केली. त्यानंतर काश्मीरमध्ये बहुसंख्य गैरमुस्लीम जनतेला दोनच पर्याय शिल्लक राहिले एक तर मरा नाही, तर मुस्लीम व्हा! भयानक!!! अशाप्रकारे बौद्धकेंद्र असलेला काश्मीर पूर्णतः मुस्लिमांच्या अधीन झाला तो आजतागायत...

तर लडाखची कथा काय वर्णावी? काश्मीरच्या मुस्लीम राजांनी लडाख जिंकण्यासाठीचे प्रयत्न केले. १५७५ पर्यंत त्यांना यश आले नाही. १६व्या शतकामध्ये बौद्धकेंद्री लडाख कसे जिंकता येईल, याचे षड्यंत्र रचले गेले. त्यावेळी लडाखचा राजा होता बौद्धधर्मीय जम्यांग नामग्याल. कारगीलमधील चिगतन व कारत्से इथले प्रमुख लोक मुस्लीम झाले होते. ते स्वतःला ‘सुलतान’ म्हणत असत. या सुलतानांना लडाखवर बौद्ध राजाची सत्ता टोचत होती. पराक्रमी बौद्ध राजा जम्यांगसमोर युद्धात कोण टिकणार? लडाखवर मुस्लीम राज्य यावे, यासाठी या सुलतानांनी षड्यंत्र रचले. चिगतनच्या सुलतानाने जम्यांग नामग्यालशी मैत्री केली. पुढे कारत्से आणि चिगतनच्या सुलतानांनी आपसात वाद करायला सुरुवात केली. बात युद्धापर्यंत आली. मग चिगतनच्या सुलातनाने मैत्रीच्या आणाभाका देत जम्यांग यांच्याकडे कारत्सेच्या सुलतानाविरोधात मदत मागितली. मैत्रीसाठी जम्यांग नामग्यालने त्याला मदत करायचे ठरवले. सैन्य घेऊन तो कारत्सेच्या दिशेने गेला. मात्र, खिंड पार करताच तिथे आधीपासूनच बाल्टिस्तानातील स्कार्दूचा सुलतान अली मीर आणि या दोन सुलतानांची फौज संगनमत करत हजर होती. त्या तिघांनी मिळून जम्यांगवर हल्ला चढवला. जम्यांगला अटक करून स्कार्दूला नेण्यात आले. गाफील लडाखला त्या दोन सुलतानांनी आणि मीर अलीच्या सैन्याने अक्षरशः क्रूरपणे लुटले. पुढे जम्यांग नामग्यालला सोडण्यात आले.

मात्र, ‘मीर अलीची मुलगी ग्याल खातून हिच्याशी लग्न करावे, तरच पुन्हा राज्य देण्यात येईल,’ अशी अट टाकण्यात आली. तसेच, ग्याल खातूनचा मुलगाच पुढे राजा बनेल आणि लडाखमध्ये इस्लामचा भक्कम प्रचार करायचा, या दोन अटीही टाकण्यात आल्या. आपला राजा जम्यांग गयानमल क्रूर शत्रूच्या तावडीतून सुटून आला. याचे श्रेय मग भोळ्या बौद्ध जनतेने राजाच्या नवीन पत्नीला ग्याल खातूनला दिले. ते तिला बौद्ध धर्माची देवता धवल तारा हिचा अवतार मानू लागले. जनता तिची पूजा करू लागली. मात्र, ग्याल खातूनने कधीही बौद्ध धर्म स्वीकारला नाही. उलट लडाखमध्ये इस्लाम धर्म कसा प्रस्थापित होईल, यासाठी तिने प्रयत्न केले. पुढे ग्याल खातूनचा मुलगा हा राजा झाला. त्याच्यावर बौद्ध धर्माचे संस्कार होते. त्यामुळे जम्यांगचा विवाह ग्याल खातूनशी करूनही इस्लामचा हवा तितका प्रसार करता येत नाही, हे त्या दोन सुलतान आणि बाल्टिस्तानच्या मुस्लीम राजाला कळून चुकले. पुढे जम्यांगचा नातू देलदन सत्तेवर आला. त्यावेळी लडाखवर आणि भूतानवर ‘डुगपा’ या बौद्धपथांचे वर्चस्व होते, तर तिबेट इथे ‘ग्येलुपा’ या बौद्ध पंथाचे वर्चस्व होते.

डुगपापंथीय भूतानवर तिबेटने युद्ध पुकारले. यावेळी लडाखसारखा भूतानही डुगपापंथी आहे, म्हणून देलदेनने भूतानची बाजू घेतली. त्यामुळे तिबेटने लडाखवरही हल्ला केला. तिबेटचा हल्ला परतवण्यासाठी देलदेनने इब्राहिम खान या मुघल राजाची मदत मागितली. देलदेनने इस्लाम स्वीकारला, तर त्याने मदत करणार, अशी अट इब्राहिमने टाकली. देलदेनने डुगपा पंथाचे ग्येलुपा पंथावर वर्चस्व व्हावे, यासाठी ही अट मान्य केली. त्यानुसार देलदेन हा महमूद खान म्हणून धर्मांतरित झाला. तर त्याच्या मुलाला इब्राहिमने ओलीस ठेवून त्याला काश्मीरमध्ये नेले. त्याचे पूर्ण संगोपन मुस्लीम रितीरिवाजात व्हाव, त्याच्यावर बौद्ध धर्माचे जराही संस्कार होऊ नयेत, हा त्यामागचा उद्देश. मात्र, लडाखचा राजा जरी मुस्लीम झाला, तरी राजपरिवार बौद्ध धर्माला चिकटून राहिला. तेव्हापासून लडाखमध्ये बौद्ध-मुस्लीम तणाव संघर्ष आजही आहे. आज लडाखमध्ये ५१ टक्के बौद्ध आणि ४९ टक्के मुस्लीम धर्मीयांची लोकसंख्या आहे. तिथे दररोजचा बौद्ध-मुस्लीम संघर्ष होत आहे.
 
आज समाजात काय सुरू आहे, याचा आढावा घेतला की, जाणवते काही ठरावीक लोक इतिहासाच्या नावाने काहीही विधान करतात. पण, हे लोक बौद्धकालीन काश्मीरविषयी बोलत नाहीत. काश्मीरचे श्रीनगर हे सम्राट अशोकाने वसवले होते आणि तिथे विशालकाय स्तुप बनवले होते. इसवी सातमध्ये चिनी प्रवासी ह्वेनसांग यांने हे स्तुप पाहिले होते. त्याच्या मते काश्मीरमध्ये हजारो बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी ५०० संघाराम होते. सम्राट अशोक नंतर त्याच्या पुत्राने जल्लोकने आताच्या बारामुल्लामध्ये भव्य़ स्तुप बनवले होते. कुठे गेली ते स्तुप? कुठे गेले ते संघाराम आणि विहार? याच संदर्भात एक लेख वाचनात आला, त्यानुसार बौद्ध धम्माचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या श्रावस्ती जिल्ह्यातील अंगुलीमाल गुफा ही पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारित येते. इथे अनेक बौद्ध मठ आणि स्तुप आहेत. त्याच्याबरोबरच एक मजारही आहे. तिथे असलेल्या व्यक्तीच्या मते, ती मजार कयामतपासून तिथे आहे. तसेच, मजारीवर वक्फ बोर्डच्या अंतर्गत ती जागा आहे. अंगुलीमालची कथा सर्वश्रुत आहे. तथागत गौतमबुद्ध आणि अंगुलीमालचे संवाद आणि नंतरची घटना सगळ्यांनाच माहिती आहे. तिथे वक्फ बोर्डाची जागा असलेली मजार कशी काय आणि कधी अस्तित्वात आली? ही मजार प्रशासनाने तोडली, मात्र ती पुन्हा बांधली गेली. इतर ठिकाणं तर सोडाच; पण बौद्ध धम्माचे अधिष्ठान आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या पुरातन वास्तूवर अतिक्रमण अगदी हक्काने केले गेलेे. हा विचार मनात येताच मला ते लोक आठवतात, जे दोनचार लोकांना सोबत घेऊन कायम म्हणतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या लेणी आणि विठ्ठल मंदिर इतकेच काय, तिरूपतीचे मंदिर हेसुद्धा बौद्धविहार होते .

त्यावर हिंदूंनी कब्जा केला. आता आम्ही ती सगळी स्थानं पुन्हा मिळवू. मात्र, हेच लोक काश्मीरमधून क्रूरपणे विनाश केलेल्या त्या स्तुपांबद्दल, हजारो भिक्खूंच्या संघारामाबद्दल आणि विहारांबद्दल बोलत नाहीत. ते कधीही म्हणताना दिसत नाहीत की, ’काश्मीर आमच्या बौद्ध धम्माचे केंद्र आहे आणि आम्ही तिथे पुन्हा बौद्ध धम्माचे केंद्र प्रस्थापित करू.’ इतिहास असेही सांगतो की, श्रीनगरच्या कुंडलवन विहारमध्ये प्रसिद्ध बौद्ध विद्वान वसुमित्र याच्या अध्यक्षतेखाली चौथे बौद्ध महासंमेलन आयोजित केले होते. आज त्या काश्मीरमध्ये बौद्ध तसेच मागासवर्गीय समाजाची स्थिती काय आहे? तर जे काश्मीर बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते ते मुस्लीमबहुल झाले. पुढे काश्मीरसाठी काँग्रेसने ‘३७०’चे बक्षीस दिले. ‘३७०’ कलमानुसार काश्मीरमध्ये वसवला गेलेला महेतर समाज हा कधीच काश्मीरचा दुय्यम नागरिक नव्हता. समाज कितीही शिकला तरीसुद्धा त्याला काश्मीरमध्ये केवळ घाण-अस्वच्छता स्वच्छ करण्याचेच काम मिळणार. हिंदू मागासवर्गीयांना असली पशुसारखी वागणूक काश्मीरमध्ये मिळू लागली होती. आता काश्मीरमधले ‘३७०’ कलम भाजप सरकारने हटवले. त्यामुळे समाजाने मोकळा श्वास घेतला आहे. या अनुषंगाने ‘३७०’ कलम भाजपने हटवले ते पुन्हा काश्मीरवर लागू व्हावे; म्हणून मेहबूबा मुफ्ती म्हणे पाटण्याच्या बैठकीत आल्या होत्या. त्यांच्या बाजूला आपल्या महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे बसले होते, याबद्दल समाजाने विचार करणे गरजेचे आहे.

असा हा कधीकाळी बौद्ध धर्माचे केंद्र असलेल्या काश्मीर आणि लडाखचा इतिहास हा आजही या ना त्या स्वरुपात जगभरात पुन्हा-पुन्हा जीवंत होताना दिसतो. मालाडच्या मालवणीमधील गायकवाड नगरमध्येही कधीकाळी बौद्ध समाजाची वस्ती होती. ९७ टक्के बौद्ध, मागासवर्गीय समाजाची वस्ती होती. आता इथे केवळ सात घरं मागासवर्गीय समाजाची राहिलेली आहेत. त्यांनीही घर सोडून पळून जावे; म्हणून अपवाद सोडून स्थानिक मुस्लिमांकडून नियोजनबद्धरितीने त्रास दिला जातो आहे. देशभरात अशा घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. ज्याचे जळते त्यालाच कळते. नुसते दलित-मुस्लीम एकतेचे सोंग घेतले म्हणून मागासवर्गीय समाजाचे कल्याण झाले असते, तर देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही दलित-मुस्लीम ऐक्यतेचा प्रसार प्रचार आणि पुरस्कार केलेला नाही. डॉ. बाबासाहेबांनी दि. २५ मे १९५० रोजी कोलंबो येथे भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश यावर भाषण केले. या भाषणातही त्यांनी बौद्ध धर्माच्या भारतातील र्‍हासास अल्लाउद्दीनसारख्या मुस्लीम आक्रमकाच्या अत्याचारास अधोरेखित केले आहे.

दुसरीकडे जागतिक स्तरावर बौद्ध -मुस्लीम संबंधांबाबत काय चित्र आहे, तर २००१ साली तालिबान्यांनी ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली बामियानची भगवान बुद्धांची मूर्ती क्रूरपणे फोडली. सध्या तालिबानी राज्यात वाताहत झाली आहे. देशाच्या तिजोरीत पैसे नाहीत. पवित्र बुद्धमूर्तीचे तुटलेले अवशेष दाखवत त्यातून पैसे मिळवण्याचे प्रयत्न सध्या तालिबानी करत आहेत. याला बौद्ध आणि मुस्लीम समाजाची एकी म्हणावी का? बौद्धधर्मीय म्यानमार आणि श्रीलंका येथील बौद्ध आणि मुस्लिमांचा हिंसक संघर्ष तर शब्दातीत आहे. वस्ती पातळीपासून जागतिक स्तरावर घडणार्‍या या सगळ्या प्रकरणातून समाज काही शिकेल का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’च्या मूळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे जे कोटेशन होते, त्याचा अर्थ होता - ‘मेंदू दे देवा, मेंदू दे -बुद्धी दे देवा, बुद्धी दे, अन्यथा मरेल विजयाची - सुनिश्चित आशा!!’
समाजाला जागृत बुद्धिवादी व्हायला हवे, सामाजिक सत्य स्वीकारावेच लागेल. तसे झाले नाही तर, नीतीधर्म विजयाची सुनिश्चित आशा मरून जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ, हे आवाहन समाजाने स्वीकारण्याची वेळ आली आहे.
‘बूत’ या मूळ पर्शियन भाषेतील शब्दाचा अर्थ मूर्ती. परंतु, या शब्दाची व्युत्पत्ती बौद्ध धर्मापासून झाली. मुस्लीम हे मूर्तिपूजेचे विरोधक. त्यामुळे मूर्तिभंजकता म्हणजे ‘बुद्धिझम’चा नाश हे इस्लामचे मिशन बनले. इस्लामने बौद्ध धर्माचा नाश केवळ भारतातच नव्हे, तर जगात जिथे जिथे इस्लाम पोहोचला तिथे तिथे त्यांनी या धर्माचा नाश केला. नालंदा येथील विद्यापीठे मुस्लीम आक्रमकांनी उद्ध्वस्त केली. हजारोंच्या संख्येत बौद्ध भिक्खू परागंदा झाले. मुस्लीम आक्रमकांनी मोठ्या संख्येत बौद्ध साधूंना ठार मारले व बुद्धविहार जमीनदोस्त केले.
(संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (समग्र साहित्य खंड ३, पृष्ठ २२९.)
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0