राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांना रामायण महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातूनच महानतेचा मानदंड महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज घडले. तात्पर्य, अनेक राजे, महाराजे, राष्ट्रपुरुष, यांच्या चारित्र्यातून नवीन सुसंस्कारीत पिढी घडविता येते. म्हणून संस्कारांचा महामेरू, बहुत जणांचा आधारू, निष्ठावान, वरदवंत, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हा एक प्रेरणास्रोत आहे. २१व्या शतकातल्या ‘आत्मनिर्भर भारता’ला संस्कारी मानवधन हवे आहे. हे मानवधन निर्माण करण्यासाठी शिवचरित्रातून मला उमगलेले अष्टांग मार्ग आपल्यासाठी देत आहे. त्या मार्गावरून मार्गस्थ झाल्यास विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीकडे जाता येईल, असे मला वाटते.
१) संकल्प
आमच्या बाल शिवबाराजांनी आपल्या बालसवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, दृढ निश्चयाने केलेल्या संकल्पाला बळ मिळाले. मित्रांनो संकल्प जर मनापासून केला असेल, तर या सृष्टीतील सर्व शक्ती आपल्या संकल्पपूर्तीसाठी मदतीला धावून येतात. मानवी जीवनात संकल्पाला फार महत्त्वाचे अधिष्ठान आहे. संकल्प करण्याआधी प्रत्येकाने स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे व आवडलेल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा निग्रह करावा. संकल्प करताना मनाची एकाग्रता व तो पूर्णत्वास जाण्यासाठी बौद्धिक, शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता असते. संकल्प हा सकारात्मक असावा. तो स्वतःसह इतरांचे कल्याण करणारा असावा.
२) पायवाट
मित्रांनो, पायवाट कशी तयार होते? काही वेळा इच्छित स्थळी लवकर पोहोचण्यासाठी रस्त्यात एक छोटा पर्यायी मार्ग शोधताना पायवाट तयार होते. कोणीतरी एक व्यक्ती त्या नवीन मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. तो यशस्वी झाला, तर त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न दुसराही करतो. मग त्या पाठोपाठ तिसरा आणि नंतर अनेक जण त्या मार्गाने जातात यातून पायवाट तयार होते. आपल्या बाल शिवबाराजांनी आपल्या आई-वडिलांच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हिंदवी स्वराज्य निर्मितीकडे प्रथम पाऊल टाकले. नंतर त्या मार्गावर ते एकेक सवंगडी जोडत गेले. आधी पायवाट तयार झाली, पुढे त्याचे हमरस्त्यात रुपांतर होऊन, हिंदवी स्वराज्य निर्माण झाले; पण यासाठी आधी कोणीतरी सुरुवात ही करावीच लागते. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी ही सुरुवात आपल्या बालशिवबा राजांनी केली. मित्रांनो, अभ्यासाची व आपल्या उपजीविकेची दिशा ठरवतानाही आपल्याला असेच करावे लागते. आपण सुरुवात करावी, एकेक व्यक्ती जोडत जावी. बघा तुम्हांला जी मोठी झालेली माणसे दिसतात, ती अगदी याच पद्धतीने झालेली दिसतील.
३) ध्यास
महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यासच लागला होता. महाराजांचे ध्येय निश्चित असल्याने ते जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी हिंदवी स्वराज्याचा विचार करत. इतकेच नाही तर त्यांनी हीच भावना त्यांच्या असंख्य सवंगड्यांच्या हृदयातही उतरविण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळेच तर त्यांच्या निधनानंतर तब्बल २७ वर्षे या मातीत आपल्या प्रचंड सैन्यानिशी व करोडोंची संपत्ती घेऊन स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आलेल्या आलमगिराला हिंदवी स्वराज्य जिंकताच आले नाही. उलट त्याची याच मातीत कबर तयार झाली. मित्रांनो, आपण निवडलेल्या क्षेत्रात असेच ध्येयाने पेटून काम केले तर यश मिळेलच. पण, अशा असंख्य ध्येयवेड्या लोकांमुळे हा देश ‘आत्मनिर्भर’ होण्यास वेळही लागणार नाही. श्वासाविना माणसाचा जीव श्वास घेण्यासाठी जसा तडफडतो, ती तडफड आपण ध्येय सिद्धीसाठी करणे आवश्यक आहे. याबरोबरच यशस्वी होण्यासाठी नियोजन, संकल्प व ध्यास असा त्रिवेणी संगम साधता आला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करतांना आपल्याला पदोपदी त्यांच्या प्रत्येक योजनेत हा त्रिवेणी संगम दिसून येतो.
४) तंदुरुस्ती
जीवनात यशस्वी होण्यासाठी तंदुरुस्त शारीरिक क्षमतेची आवश्यकता असते. छत्रपतींनी स्वराज्य निर्मितीच्या यज्ञात या गोष्टीकडे फार गांभीर्याने लक्ष दिलेले दिसते. सर्व मावळे अतिशय काटक, दणकट व चपळ होते. शरीर संपदेतही ते शत्रूला ऐकत नसत. मित्रांनो, आपल्यालाही जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग, ध्यानधारणा, व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. नुसती मोठी स्वप्ने बघितली; पण त्याला स्वतःच्या शरीराची पूरक साथ नसेल, तर स्वप्न विफल होण्यास वेळ लागणार नाही.
५) नियोजन
जीवनात यशस्वी होताना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. काही संकटे मानवनिर्मित असतात, तर काही संकटे निसर्गनिर्मित असतात. यातून जर आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचे असेल, तर रोजचा अभ्यास रोज पूर्ण केला पाहिजे; म्हणजे आपल्याकडे असणार्या माहितीचे योग्य पृथक्करण करता येणे व त्या पृथक्करणातून एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक असते. रोजच्या अभ्यासाच्या सवयीमुळे बर्याच वेळा संकटे येण्यापूर्वीच आपल्याला त्यांची चाहूल लागते व त्यातून मार्ग काढणे सोपे होऊन जाते. महाराजांनाही हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात संकटांची कमतरता नव्हती; पण महाराजांचा या संकटांबद्दलचा अभ्यास इतका उत्कृष्ट असायचा की, कधीही कोणत्याही संकटाने महाराजांवर राज्य केले नाही, तर सर्वच संकटांनी महाराजांच्या अभ्यास कौशल्यासमोर नांगीच टाकली. महाराजांना येणार्या माहितीचे पृथक्करण करण्याची क्षमता चांगली होती. योग्य पृथक्करणामुळे ते एकाच वेळेस अनेक कामे करू शकत होते.
६) आव्हानांचा स्वीकार
छत्रपती शिवाजी महाराज स्वतः जहागीरदार होते, त्यांच्या वडिलांचा आदिलशहाच्याच नव्हे, तर दिल्लीच्या मुघल बादशाहच्या दरबारातही प्रभाव होता. एकूणच जहागीरदार म्हणून ते सुखाने आपले आयुष्य जगू शकले असते. पण, जीवनात स्वतःचे काही निर्माण करावयाचे असेल, तर या सुरक्षाकवचामधून स्वतःला बाहेर काढले पाहिजे. आपल्या शिवबाराजांनी अगदी लहान असतानाच हे सुरक्षाकवच ओलांडले. त्यामुळेच ते रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. मित्रांनो आव्हाने स्वीकारा, त्यांना घाबरू नका, त्यावर मात करणार्या कृत्यांचा विचार केला, तर आणि तरच आपण यशस्वी होऊ शकतो. सुरक्षाकवचात आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. संकटे, अडचणी, आव्हाने हे आपल्याला अधिक सक्षम करतात. पालकांनो तुम्ही आपल्या पाल्यांना सुरक्षित कवच देऊ नका. नाहीतर मुले पांगळी बनतील व ते कदाचित तुम्हांलासुद्धा आवडणार नाही.
७) कार्य संस्कृती
माझ्या ध्येयवेड्या मित्रांनो, मला काय करायचे व काय नाही करायचे याची यादी तयार करा. तुमचे अर्धे काम ही यादीच करेल. छत्रपतींचे जीवन कार्य सर्वांसाठी मार्गदर्शकच नाही, तर तो एक प्रेरणास्रोत आहे.
८) मनाचे व्यवस्थापन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणात हिंदवी स्वराज्याची भूमिका रुजविण्यात त्यांची आई जिजामातेची भूमिका अनेक अंगानी महत्त्वपूर्ण ठरली आहे. जिजामातेने बाल शिवबाला स्वधर्माबद्दलच्या वास्तविकतेची म्हणजे सद्यःस्थितीची जाण करून देताना स्वतःच्या क्षमतांची, सामर्थ्याची व कर्तव्याची जाणीव करून दिली. हे करतानाच आपला गौरवशाली इतिहासही सांगितला. त्यातून प्रभू रामचंद्रांसारखे तसेच भगवान श्रीकृष्णांसारखे अन्यायाचा प्रतिकार करण्याची व त्यासाठी दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्याचे कार्य करण्याची प्रेरणा दिली. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट शक्ती असते. त्या शक्तीची जाणीव त्या व्यक्तीला जितक्या लवकर होते, तितक्या लवकर त्या व्यक्तीच्या करिअरची दिशा निश्चित होते, तिला जागृत करणे, हे काम फार महत्त्वाचे असते. कधीकधी ही जाणीव जागृती व्यक्तीला स्वतःच्या अनुभवातून होते, तर काही वेळेला काही जणांना ही जाणीव करून द्यावी लागते. यालाच आपण ’स्व’ची ओळख होणे असेही म्हणतो.
रामायणामध्ये हनुमानाला त्याच्यातील विशेष शक्तीची ओळख जांबुवंताने करून दिली. त्यानंतरच तो समुद्र पार करून लंकेत जाऊ शकला. महाभारतात अर्जुनालासुद्धा याच गोष्टीची जाणीव कुरुक्षेत्रावर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी करून दिली. त्याचा पुढे काय परिणाम झाला हे तुम्हां आम्हां सर्वांना ज्ञात आहेच. चंद्रगुप्ताला त्याच्यातील शक्तीची जाणीव जागृती त्याचे गुरु आचार्य आर्य चाणक्य यांनी करून दिली व महान मौर्य साम्राज्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवरायांसाठी हे कार्य ते लहान असताना जिजामातेने केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
यावर तुम्ही आम्ही सर्वांनी सकारात्मकतेने विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यकता असते स्वतःला वास्तविकतेने ओळखण्याची. आपले गुण, क्षमता, आवड, वैशिष्ट्ये, स्वतःच्या यथार्थतेची जाणीव करून स्वतःचे ध्येय व उद्दिष्ट निश्चित करण्याची. इथे प्रश्न निर्माण होतो, हे कसे करायचे? ते अगदी सोपे आहे. असे काम की जे करताना आपल्याला थकवा, कंटाळा, आळस येत नाही. १८-१८ तास काम करतो तरी आपण थकत नाही. हे तेव्हाच घडते, जेव्हा आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाणीव जागृतीसह काम करतो. यानंतर आपल्याला आपले ‘व्हिजन’ म्हणजे दूरदृष्टी निश्चित करता येईल. ‘व्हिजन’ व स्वप्न यात काही मूलभूत फरक आहे. स्वप्न हे झोपेत पडतात आणि जाग आल्यावर विसरण्याची दाट शक्यता असते. ‘व्हिजन’ जागेपणी ठरवले जाते. ‘व्हिजन’मध्ये स्वतःतील उत्तमता ओळखून त्यात मार्गक्रमण करण्याचे नियोजन असते. सचिन तेंडुलकरांनी क्रिकेटपटू होण्याचे, लता मंगेशकर यांनी गायिका होण्याचे, अमिताभ बच्चन यांनी अभिनेता होण्याचे, तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन या देशाला उज्वल भविष्य देण्याचे ‘व्हिजन’च बघितले होते.
मित्रांनो, आपले ‘व्हिजन’ निश्चित झाल्यावर ते लिहून काढा व आपल्याला रोज दिसेल, अशा ठिकाणी लावा. ‘व्हिजन’ लिहिताना त्याच्या पूर्ततेसाठीचे वेळापत्रकही बनवा. म्हणजे पुढील पाच वर्षांत, एका वर्षात, पाच महिन्यात, एका महिन्यात, पाच दिवसांत, एका दिवसात, पाच तासांत, एका तासात, पाच मिनिटांत, एका मिनिटात आपण आपल्या ‘व्हिजन’पूर्तीसाठी काय करायला हवे तेही लिहून काढा. ‘व्हिजन’पूर्तीसाठी स्वतःची संपूर्ण क्षमता वापरा. दुसर्यांकडे बघून स्वतःचे संतुलन बिघडवून घेऊ नका. दुसर्यांशी स्वतःची तुलना करू नका. विचार सकारात्मक ठेवा, कृती सकारात्मक होतेच. गरज वाटल्यास योग्य व्यक्तींशी चर्चा करा. आपल्या ‘व्हिजन’चे कधीही दडपण येऊ देऊ नका. आपले ‘व्हिजन’ आपल्याला आनंदाने पूर्ण करताच आले पाहिजे. कारण, जे यश आपण आनंदाने व उत्साहाने मिळवतो ते लवकर मिळते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मानवी जीवन हे अमूल्य आहे, ते आपल्याला आनंदानेच जगता आले पाहिजे.
आज तुम्ही आम्ही सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे, हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या ‘आत्मनिर्भर’ होऊन जगात महासत्ता होईल यात शंकाच नाही. एक राष्ट्रवादी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यकर्तृत्वातून घ्यावा, असा यशस्वी जीवनाचा अष्टांग मार्ग प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावा, या उद्देशानेच येथे मांडला आहे. ही व्यक्तिरेखा पुढील अनेक पिढ्यांना अशीच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील. मित्रांनो, या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातून मला समजलेला यशस्वी जीवनाचा अष्टांग मार्ग आजच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे केला आहे. तुम्हीं माझे भले-बुरे विचार काळजीपूर्वक वाचले, याबद्दल मी आपला ऋणी आहे.
प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे सहशिक्षक आणि इतिहास संकलन समितीचे सदस्य आहेत.)
prashantshirude१६७४@gmail.com
९९६७८१७८७६