मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेवर आज १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरेंनी केले. मात्र, आदित्य ठाकरेंच्या भाषणावेळी सहभागी कार्यकर्त्यांची गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळाले. श्रोते सभेतून परतताना दिसत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, " मला अधिकारी फोन करून सांगतात की, निवडणुका लावायचा प्रयत्न करा. तुम्ही असताना कामं व्हायची. पण आता चोरी केली जातेय. त्यामुळे या चोरांना आपल्याला पळवायचं आहे. जानेवारीपासून मी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. हेच निवेदन आम्ही मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. मी आमदार म्हणून धमकी दिली नाही तोपर्यंत त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. आदित्य ठाकरे यांचं पत्र आलं की उत्तर द्यायचं नाही, हे धोरण आहे."
"मुंबईत सगळं काही आम्ही ऐकून घेऊ. पण, मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा. पाच हजार बाथरूम नसताना पाच हजार मशीन विकत घ्यायला काढताय. २३ हजार रुपयांचं मशीन ७२ हजार रुपयांना खरेदी करण्याचा यांचा प्रयत्न आहे. अनिल परब यांनी तक्रार केल्यानंतर समिती बसवली. हा कसा कारभार चाललाय. तुम्हाला राग येतोय की नाही." असंही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारलं.
मुंबईतील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. चोरांच्या फाईल तयार असून आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. शिवाय, पालिकेची इमारत हे आपसं शक्तीपीठ आहे. इथला आवाज दिल्लीलाही ऐकावा लागतो. हनुमान चालिसेत म्हटल्याप्रमाणे इथं बसलेली भूत आपल्याला पळवून लावायची आहेत. मुंबई कधी दिल्लीसमोर झुकली नाही, यांना आपल्याला कटोरं घेऊन उभं करायचं आहे. असंही ते म्हणालेत.