‘अखंड भारता’चे नव्या संसदेत स्थापन केलेले भित्तीचित्र देशांतर्गत तसेच मित्रराष्ट्रांची काळजी वाढवणारे खरंतर अजिबात नाही. कारण, याबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहेच. नेपाळने ती समजून घेतली, पण पाकची ती समजून घेण्याची मुळी कुवतच नाही, हेच यावरुन पुनश्च सिद्ध झाले आहे.
'अखंड भारत’ हा राजकीय मुद्दा नसून, ही संकल्पना प्राचीन भारतीय संस्कृतीमधूनच आलेली. नेपाळसारख्या मित्रराष्ट्रांना भारताची भूमिका स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानसारख्या राष्ट्राची ती समजून घेण्याची क्षमता नाही,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नव्या संसद भवनातील ‘अखंड भारता’च्या भित्तीचित्रावरून उद्भवलेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. हे भित्तीचित्र सम्राट अशोक यांच्या साम्राज्याचा प्रसार किती विशाल होता, हे दर्शवते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नव्या संसद भवनात ‘अखंड भारता’च्या भित्तीचित्राचे छायाचित्र जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हापासून पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश या शेजारील राष्ट्रांनी चिंता प्रकट केली होती. तथापि, बांगलादेश, नेपाळ यांनी भारताची भूमिका समजूनही घेतली.
काही दिवसांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड भारत भेटीवर आले असता, हा विषय ऐरणीवर आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर प्रचंड यांचे शंकानिरसन अर्थातच झाले. पाकिस्तानचे मात्र तसे काही झाले नाही. पाक देशांतर्गत यादवी तसेच महागाईचा उडालेला भडका यामुळे त्रस्त झाला आहे. तेथील लष्कराला निमित्त हवे होते. ते या भित्तीचित्राने दिले. ‘अखंड भारताचा नकाशा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत केव्हाही आक्रमण करेल आणि विजय मिळवेल. १९७२च्या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तान जसा स्वतंत्र केला, त्याच पद्धतीने पाकचे भारत पुन्हा एकदा तुकडे तुकडे करेल,’ अशी भीती पाकला सतावत आहे. या भित्तीचित्रात गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनी तसेच कपिलवस्तु हे भारताचा भाग म्हणून दाखवले गेले आहेत. नेपाळने गेल्या अनेक दशकांपासून नेपाळी नकाशांमध्ये लुंबिनीला प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून स्थान दिले आहे. यात तक्षशिलासह विविध राज्ये आणि शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे, जो सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे. प्राचीन भारताचा ते अविभाज्य भाग होते, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे त्याच्यावरुन कांगावा करुन प्राचीन इतिहास आपण बदलू शकत नाही आणि सत्यही नाकारु शकत नाही, हेच खरे!
‘अखंड भारत’ ही संकल्पना प्राचीन भारतीय संस्कृतीतून आली आहे. नव्या संसद भवनात भारताच्या प्रत्येक संस्कृतीचे, क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यात आले आहे. ‘अखंड भारता’चे हे भित्तिचित्र सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा प्रसार दर्शवणारे आहे. तसेच अशोकाच्या लोकाभिमुख शासनाची कल्पना यात अधोरेखित होते. आजच्या अफगाणिस्तान ते म्यानमार आणि तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत पसरलेल्या भूभागाचा उल्लेख ‘अखंड भारत’ या संकल्पनेत येतो. रामायण काळापासून तो अस्तित्वात असल्याचे मानले जाते. मुस्लीम लीगच्या दबावानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली, हा इतिहास सर्वश्रूतच. इतिहासकार राधा कुमुद मुखर्जी यांनी ‘अखंड भारत’ परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सर्वात प्रथम ‘अखंड भारता’ची कल्पना मांडली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राम माधव यांनी २०१५ मध्ये एके दिवशी विभाजित झालेले प्रदेश सद्भावनेने परत एकत्र येतील, यातूनच ‘अखंड भारता’ची निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
त्याचवेळी संघाच्या मते ‘अखंड भारत’ ही कोणतीही राजकीय कल्पना नाही, तर ती सांस्कृतिक संकल्पना आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. भारताची फाळणी झाल्यानंतर लगेचच भारताला पुन्हा एकत्र आणण्याची विनंती संघानेच केली होती. जनसंघाने दि. १७ ऑगस्ट, १९६५ रोजी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत “भारताचे राष्ट्रीयत्व, परंपरा या कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत. मुस्लीम समाज स्वतःला राष्ट्रीय जीवनाशी जोडून घेतील. सर्व जण एकत्र येऊन पुन्हा एकदा ‘अखंड भारता’ची निर्मिती करू. सर्व भेद नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना जोपासू,” असे आवाहन केले होते. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीही काही दिवसांपूर्वीच जातपात, धर्म-पंथ सारे काही विसरून भारतीय म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज विषद केली होती, हे लक्षात घ्यायला हवे.
‘अखंड भारत’ हा एकसंध भारताच्या संकल्पनेसाठी वापरला जाणारा शब्द असून, सध्याचे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे एकेकाळी ‘अखंड भारत’चा भाग होते, ही त्यामागची संकल्पना. इतिहासकार दिनेशचंद्र सरकार यांच्या ‘स्टडी इन द जिओग्राफी ऑफ एन्शिएंट अॅण्ड मेडिव्हल इंडिया’ या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, ‘भारतवर्ष’ ही सर्वात जुनी ज्ञात संस्कृती सिंधू संस्कृतीत सापडली. तथापि, त्यानंतर ‘अखंड भारत’ अनेक प्रजासत्ताकांमध्ये विखुरला गेला. इ.स.पूर्व ३२१ मध्ये आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्याने या विखुरलेल्या प्रजासत्ताकांना पुन्हा एकत्र केले. चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, दख्खन व म्हैसूर यांचा समावेश होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर ‘अखंड भारत’ पुन्हा एकदा विभाजित झाला.
दक्षिण भारतात त्यानंतर शक, सातवाहक, चोल, चेरा, पांड्या अशी साम्राज्ये नव्याने उदयाला आली. श्रीलंका हादेखील चोल तसेच पांड्या साम्राज्याचा भाग होता. १३१० मध्ये तो स्वतंत्र झाला. अफगाणिस्तान १८७६ मध्ये रशियाच्या पुढाकाराने स्वतंत्र राज्य म्हणून वेगळे करण्यात आले होते. १९१९ मध्ये तो देश म्हणून स्वतंत्र झाला. इंग्लंडने १९०७ मध्ये भूतानला भारतापासून वेगळे केले. १९३७ मध्ये म्यानमार, तर १९४७ मध्ये पाकिस्तानचा तुकडा पाडण्यात आला. भाजपने ‘अखंड भारता’बद्दल कधीही ठोस वक्तव्य केलेले नसले, तरी भाजपची भूमिका स्पष्ट आहे. जनसंघाने ती केव्हाच मांडलेली आहे. नव्या संसदेतीलल भित्तीचित्रावरून ‘अखंड भारता’चा विषय पुन्हा एकदा राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनात आशेचे दीप प्रज्वलित करणारा ठरला आहे. पाक, नेपाळ हे केवळ निमित्तमात्र!