दि. २८ मे ते ३ जून, १९४५ या कालावधीत हजारो कोसॅक शरणार्थींना लिअंझ शहरातून गुराढोरांप्रमाणे ट्रक्समध्ये कोंबून सोव्हिएत सैन्याच्या स्वाधीन करण्यात आलं. अनेकांनी आत्महत्या केल्या. ज्यांनी केल्या नाहीत, त्यांना सोव्हिएत सेनापतींनी गोळ्या घालून किंवा फासावर लटकावून ठार मारलं, ही घटना ’लिअंझचा विश्वासघात’ या नावाने (कु) प्रसिद्ध आहे.
महाभारतीय युद्धातला घटोत्कचाचा प्रसंग सुप्रसिद्ध आहे. भीमाचा राक्षसपुत्र घटोत्कच मायावी युद्ध करून संपूर्ण कौरव सैन्याला हैराण करून सोडतो. अखेर नाईलाजाने कौरव सेनापती कर्णाला त्याच्यावर वासवी शक्ती सोडावी लागते. ही भयंकर घातक शक्ती त्याने अर्जुनाला ठार मारण्यासाठी राखून ठेवलेली असते. पण, तिचा वापर घटोत्कचावर करावाच लागतो. ती भयंकर शक्ती आपल्याकडे येताना पाहून घटोत्कच आपलं मरण ओळखतो. तो मायेने आपलं शरीर पर्वताएवढं विशाल करतो. वासवी शक्तीने प्राण हरण केलेलं घटोत्कचाचं ते पर्वताकार मृत शरीर कौरव सेनेवर कोसळून पडतं आणि असंख्य सैनिक त्याखाली दबून ठार होतात. मरता-मरतासुद्धा घटोत्कच स्वपक्षाचं काम करून जातो.
१८५३ मध्ये ब्रिटन आणि रशिया यांच्यात क्रीमिया या काळ्या समुद्रातील एका भूभागावरून युद्ध जुंपलं. ’बालाक्लाव्हाची लढाई’ या नावाने ओळखल्या जाणार्या या युद्धातल्या एका लढाईत एक विलक्षण प्रसंग घडला. कमांडर-इन-चीफ लॉर्ड रॅगलन याने दिलेल्या एका हुकुमाचं नीट आकलन न करता, लेफ्टनंट जनरल जेम्स टॉमस बु्रडनेल या सेनापतीने आपल्या हाताखालच्या एका घोडेस्वार तुकडीला रशियन तोफखान्यावर हल्ला चढवण्याचा आदेश दिला. ही उघड-उघड आत्महत्या होती. कारण, रशियन तोफखाना तुकडी ५० उत्कृष्ट तोफांनिशी सज्ज होती, तर या इंग्रजी घोडेस्वार तुकडीकडे फक्त भाले आणि तलवारी होत्या. म्हणूनच या तुकडीचं नाव होतं ’लाईट ब्रिगेड.’ शत्रूच्या तोफांवर चालून जाणं हे तिचं कामच नव्हतं. स्वपक्षीय तोफखान्याने शत्रूच्या तोफखाना फळीत खिंडार पाडली किंवा शत्रूची बगल त्याच्या तोफखाना दलापासून बाजूला पडली की, त्यांच्यावर तुटून पडून हातघाईची लढाई करणं, हे कोणत्याही ’लाईट ब्रिगेड’चे काम असते. त्यामुळे शत्रूच्या सुसज्ज तोफांवर समोरून हल्ला करणं म्हणजे शत्रूला जणू नेमबाजीचा अभ्यास करू देण्याची संधी देण्यासारखं होतं. पण, लढाईच्या धुमश्चक्रीत सेनापतीकडून ही आज्ञा दिली गेली.
ही आज्ञा चुकीची आहे आणि आपण आता फुकट मरणार आहोत, ही गोष्ट या तुकडीतल्या ६५० घोडेस्वार सैनिकांना लगेचच कळली. पण, कुणीही मागे हटलं नाही. सगळे जण घोड्यांना टाचा मारीत बेभानपणे शत्रूवर तुटून पडले. परिणामी, रशियन तोफांच्या भडिमारात किमान १०० जण ठार झाले आणि १५० जण जबर जखमी झाले. ही ससेहोलपट पाहिल्यावर सेनापती जेम्स बु्रडनेलला आपली चूक लक्षात आली. त्याने माघार घेण्याचा हुकूम सोडला आणि निरर्थक कत्तल थांबवली. पण, इंग्रज सैनिकांचं ते काटेकोर आज्ञापालन आणि बेछूट बलिदान पाहून शत्रूसुद्धा थक्क झाला. लगेचच ही वार्ता सर्वत्र पसरली आणि जगभरच्या लष्करी बाण्याच्या लोकांनी इंग्रजांच्या काटेकोर शिस्तपालनाचं मनापासून कौतुक केलं. खुद्द इंग्लिश राष्ट्र तर बेहद्द खूश झालं. ही घटना घडल्यापासून ठीक सातव्या दिवशी प्रख्यात इंग्लिश कवी लॉर्ड आल्फ्रेड टेनिसन याने ’चाजर्र् ऑफ दि लाईट ब्रिगेड’ ही त्याची कविता प्रसिद्ध केली. ही कविता इतकी सुंदर आहे की, संपूर्ण ब्रिटिश समाज तेव्हाही आणि आताही त्या कवितेवर अक्षरश: जीव ओवाळून टाकतो. शिस्तपालन या गुणामुळे इंग्लिश राष्ट्र मोठं झालं आणि त्याने साम्राज्य निर्माण केलं, यात काही वादच नाही.
परंतु हा लष्करी बाणा, मनाचा उमदेपणा वगैरे फक्त स्वतःपुरताच आपल्यावर बरं का! आपल्याला मदत करणारे, आपल्या आश्रयाला आलेले, आपल्यावर अवलंबून असणारे अशांचा विश्वासघात करताना इंग्रजांना काहीही लाजलज्जा वाटत नाही, हेदेखील इतिहासाने पाहिलं आणि नोंदवलं आहे. जेम्स बाँड या ब्रिटिश हेराच्या कामगिर्यांवर लिहिल्या गेलेल्या कादंबर्या या पूर्णपणे काल्पनिक नाहीत. त्यांचा लेखक इयान फ्लेमिंग हा स्वतःच ब्रिटिश नौदल खात्याचा हेर होता. त्यामुळे असंख्य राजकीय आणि सैनिकी गुप्त घडामोडी त्याला चांगल्याच माहिती होत्या. बाँड कादंबर्यांच्या कथानकांमध्ये त्याने अशा अनेक गुप्त घटनांचा वापर केला आहे.
एका कथेत बाँड आणि त्याचा एक साथीदार यांच्यावर शत्रूचं एक संशोधन केंद्र उडवण्याची कामगिरी सोपवली जाते. ती पार पाडताना बाँडच्या लक्षात येतं की, आपला साथीदार शत्रूला फितूर झालेला आहे. बाँड हिकमतीने त्या प्रसंगातून निसटतो. नंतर तो त्या साथीदाराला गाठून याचा खुलासा विचारतो, तेव्हा तो साथीदार उत्तरतो, ’‘मी मूळचा कोसॅक आहे. आम्ही लोक नाईलाजाने सोव्हिएत रशियन सैन्यात भरती झालो होतो. पण, हिटलरने रशियावर आक्रमण केल्यावर आम्ही ती संधी साधून हिटलरला सामील झालो. पण, लवकरच आम्हाला कळलं की, स्टॅलिन आणि हिटलर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा आम्ही ऑस्ट्रियन सीमेवर लढणार्या ब्रिटिश सेनापतीला शरण गेलो. तुम्ही आम्हाला प्रथम चांगली वागणूक दिलीत. पण, १९४५ सालच्या फेब्रुवारीत ‘याल्टा’ परिषद झाली. स्टॅलिनने सर्व मूळ रशियन नागरिकांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. तुम्ही ती गुप्तपणे मान्य केलीत आणि एक दिवस गुराढोरांप्रमाणे ट्रक्समध्ये कोंबून आम्हाला त्या सोव्हिएत लांडग्यांच्या हवाली केलंत. आमच्यापैकी हजारो लोक सोव्हिएत सैनिकांनी कुत्र्याप्रमाणे गोळ्या घालून ठार केले. हजारो लोक सैबेरियातल्या छळछावण्यात अतिश्रमाने मेले. अनेकांनी आत्महत्या केल्या. माझ्या बापाने आईला गोळी घालून मग स्वतःलाही गोळी घातली. तुमच्या नेत्यांच्या या विश्वासघातकी धोरणाचा सूड म्हणून मी पण तुमचा विश्वासघात केला.”
कादंबरीच्या कथानकात वापरलेला हा प्रसंग संपूर्ण खरा आहे. रशिया, या देशाच्या नैऋत्येला कझाकस्तान हा देश आहे. या देशातले लोक साधारणपणे तुर्कवंशीय समजले जातात आणि ते धर्माने मुसलमान आहेत. त्यांना ‘कझाक’ असे म्हणतात. पण, या कझाकस्तानच्या सीमेलगत रशियाच्या गवताळ स्टेप्स प्रदेशात, डॉन आणि नीपर नद्यांच्या खोर्यात उरल पर्वताच्या डोंगराळ भागात, उरल समुद्र आणि कास्पियन समुद्रांच्या किनार्यालगत राहणार्या टोळीवाल्या लोकांना म्हणतात ’कोसॅक.’ कझाक आणि कोसॅक, किती जवळचे शब्द आहेत. पण, कोसॅक पक्के ग्रीक आर्थोडॉक्स पंथीय ख्रिश्चन आहेत. शिवाय ते कडवे लढवय्ये आहेत. रशियन झार सम्राटांच्या सैन्यान कोसॅक लढवय्यांची, घोडेस्वारांची खास पथकं असायची. या पलटणींनी युरोपातली अनेक रणांगणं गाजवलेली आहेत.
रशियात क्रांती होऊन साम्यवादी सत्ताधारी झाले, हे खरं. म्हणजे विविध कोसॅक टोळीप्रमुखांना फारसं पसंत नव्हतं. पण, यांना दुसरा पर्यायच नव्हता. शिवाय साम्यवादी सरकारलाही सैन्य नव्याने उभारायचं होतंच. त्यामुळे त्यांनी कोसॅक जमातींच्या टोळ्यांना सैन्यात सामावून घेतलं. १९४१ साली हिटलरने अगदी अचानक सोव्हिएत रशियावर हल्ला चढवला आणि अल्पावधीत रशियन मुलखात खूप खोलवर मुसंडी मारली. कोसॅक सेनापतींना ही योग्य संधी वाटली. त्यांनी आक्रमण करून येणार्या जर्मन सेनापतींची भेट घेऊन त्यांना सांगितलं की, ’‘आमचं रशियावर प्रेम आहे. पण, रशियावर हुकूमशाही गाजवणारी ही सोव्हिएत राज्यव्यवस्था आम्हाला नको आहे. त्यासाठी आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत.” चकित झालेल्या जर्मन सेनापतींनी राजधानी बर्लिनशी संपर्क साधला. हिटलरलाही असं काही घडेल, अशी कल्पना नव्हती. त्यामुळे थोड्या दिरंगाईने का होईना, पण त्याने कोसॅक लोकांना अनुकूल निर्णय दिला.
पण, १९४३ सालापासून पारडं फिरलं. जर्मन सेना जबर मार खात मागे हटू लागल्या. आता कोसॅक सेनापतींची पंचाईत झाली. अनेक कोसॅक सैनिकांनी मिळेल त्या मार्गाने युरोपातल्या मिळेल त्या देशात पलायन केले. सुमारे ४५ ते ५० हजार सैनिकांचा एक मोठा गट ऑस्ट्रिया ’देशातल्या लिअंझ शहरानजीक ब्रिटिश सेनापतीला शरण गेला. ब्रिटिशांनी शरणार्थी छावण्या उभ्या करून यांना आश्रय दिला. या सगळ्या घटना अर्थातच तातडीने लंडनला कळवण्यात आल्या. आता राजनैतिक पेच कसा होता पाहा. सोव्हिएत रशिया कट्टर साम्यवादी आणि ब्रिटन कट्टर साम्यवादविरोधी. त्यामुळे सोव्हिएत सैन्यातले कोसॅक हे ही ब्रिटनचे शत्रूच, पण ब्रिटनविरूद्ध युद्ध पुकारून ब्रिटनला भस्मसात करण्याचा चंग बांधलेल्या हिटलरने अचानक रशियावर पण हल्ला चढवला. रशियन सैन्यातले साम्यवादविरोधी कोसॅक जर्मनीला सामील झाले. पण शत्रूचा शत्रू, तो मित्र, या नियमानुसार जर्मनीचा शत्रू असणारा रशिया आता ब्रिटनचा मित्र झाला. म्हणजे जर्मनीला सामील झालेले कोसॅक ब्रिटनचे शत्रू झाले. पण, मुळात ते साम्यवाद विरोधी आहेत. उत्तम लढवय्ये आहेत. म्हणजे ब्रिटनच्या कामाचे आहेत. मग द्या त्यांना आश्रय!
पण, फेब्रुवारी १९४५च्या याल्टा बैठकीत स्टॅलिनने मूळ मागणीच केली की, तुमच्या आश्रयाला आलेले मूळ आमचे नागरिक परत करा. मग करा आता विश्वासघात आश्रयाला आलेल्यांचा. पाठवा त्यांना परत. स्टॅलिन त्यांना ठार मारणार हे नक्की, पण मरू द्या ना, मेले तर, ते काही प्रोटेस्टंट अँग्लो-सॅक्सन इंग्रज नव्हेत, ते तर ग्रीक ऑर्थोडॉक्स रशियन कोसॅक आहेत. ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी! दि. २८ मे ते ३ जून, १९४५ या कालावधीत हजारो कोसॅक शरणार्थींना लिअंझ शहरातून गुराढोरांप्रमाणे ट्रक्समध्ये कोंबून सोव्हिएत सैन्याच्या स्वाधीन करण्यात आलं. अनेकांनी आत्महत्या केल्या. ज्यांनी केल्या नाहीत, त्यांना सोव्हिएत सेनापतींनी गोळ्या घालून किंवा फासावर लटकावून ठार मारलं, ही घटना ’लिअंझचा विश्वासघात’ या नावाने (कु) प्रसिद्ध आहे. कसं वाटतं पाहा! एकीकडे ’चार्ज ऑफ दि लाईट ब्रिगेड’सारखी मर्दानी घटना आणि दुसरीकडे ’बिट्रायल ऑफ लिअंझ’सारखं नामर्द कृत्य! करणारे इंग्रजच!