अनधिकृत दिवा होणार अधिकृत; दिव्यात क्लस्टर योजनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा
दिवा परिसरातील ६१० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण
08-Jun-2023
Total Views |
ठाणे : दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिव्यामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी ५ कोटी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
ठाणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे ६१० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दिवा येथे पार पडला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानंत्री आवास योजनेतील २८०० घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे सांगितले.
खा.श्रीकांत शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत हजार कोटींपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. दिवा स्थानकामध्ये कोकणात जाणाऱ्या रेल्वेला थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दिवा शहरात स्वतंत्र पोलिस ठाणे असावे तसेच ठाण्याप्रमाणे दिव्यातही क्लस्टर योजना राबवावी, अशी मागणी खा. शिंदे यांनी यावेळी केली. त्यावर क्लस्टर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
दिव्याच्या विकासासाठी कोटी कोटी
दिव्यात पाणीपुरवठ्यासाठी २४० कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी १३२ कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी ६३ कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी १५ कोटी, देसाई खाडीपूलसाठी ६७ कोटी, आगासन येथे रुग्णालयासाठी ५८ कोटी, तलाव सुशोभिकरणासाठी २२ कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी साडेतेरा कोटी असा सुमारे ६१० कोटी रुपयांचा निधी आतापर्यत दिला.यापुढील काळातही दिव्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
दिवा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी खिडकाळेश्वर महादेवाचे दर्शनही त्यांनी घेतले. येथील भूमिपुत्रांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराचे सुशोभिकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.