दंडेलशाहीचे पुरस्कर्ते तुम्हीच!

07 Jun 2023 20:52:14
NCP Maharashtra Politics

एका बाजूला (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर भाजपच्या पडळकरांनी केलेल्या टीकेमुळे रोहित पवार पक्षातील वरिष्ठांवर नाराज झाले. का? तर पक्षातील ज्येष्ठ नेते पवारांवर होणार्‍या टीकेविरोधात बोलत नाहीत म्हणून. पण, या विपरित चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाले असून त्यातील दाहकता दाखवण्याऐवजी त्याचं कौतुक करण्यातच ‘एचएमव्ही’ पत्रकार धन्यता मानत आहेत. पवारांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उघडउघड दिलेली धमकी हे या दाहकतेचे एक उदाहरण आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त भाषण करताना अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या थेट कानाखाली देण्याची भाषा करत आपली टगेगिरी पुन्हा एकदा दाखवून दिली. “उमेदवारीसाठी भांडलात तर कानाखाली देईल,” अशी अरेरावीची भाषा पक्षासाठी दिवसरात्र झटणार्‍या कार्यकर्त्यांबाबत बोलून दादा नेहमीप्रमाणे मोकळे झाले. मुळातच अजित पवार आणि दादागिरी-दंडेलशाही हे फार जुनं समीकरण. नुकतेच काही दिवसांपूर्वी पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची पोकळ घोषणा केली. तेव्हा, भावनिक झालेल्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना धमकवण्याचे प्रताप अजितदादांनी मोठ्या पवारांसमोर केले होतेच. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी करणार्‍या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना “तू फार शहाणा आहेस का?” असे बोलण्याचे किंवा त्यांना सर्वांच्या समोर टपल्या मारण्याची कृती दादांनी त्यावेळी केली. एकीकडे शरद पवार तरुण रक्ताला वाव देण्याची इच्छा व्यक्त करताना भाकरी फिरण्याचे घोषित करतात, तर दुसरीकडे त्यांचेच पुतणे अजित पवार त्याच कार्यकर्त्यांना कानाखाली मारण्याची भाषा करतात. अशाप्रकारचे विरोधाभासी चित्र केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दिसू शकते. अजित पवार कधी कुणाला बघून घेण्याची धमकी देतात, तर कधी शिवसेनेच्या कुण्या एका नेत्याला ‘तू कसा निवडून येतो तेच बघतो,’ असे दादागिरीचे विधान महाराष्ट्राच्या समोर करतात. त्यामुळे इतरांकडून सौजन्यशीलतेची अपेक्षा करणारी राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांसारखी नेतेमंडळी हीच दंडेलशाहीचे पुरस्कर्ते आहेत, हे राज्याच्या १४ कोटी जनतेच्या ध्यानी आलेले आहे.

तुमची नाटकं बंद करा!

काही लोकांचा अट्टाहास असा असतो की, आपण इतरांवर कितीही चिखलफेक केली तरी कुणी आपल्यावर साधा डागही लावू नये. आपण इतरांवर कितीही आरोप केले तरी इतरांनी मात्र आम्हाला बोल लावू नये. अशीच फालतू अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांपासून ते गावखेड्यांपर्यंतच्या प्रश्नांची जाण असल्याचं नाटक करणार्‍या रोहित पवारांची आहे. गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने शरद पवारांवर केलेल्या टीकाटिप्पणीमुळे रोहित पवार यांनी आपली नाराजीची भावना व्यक्त केली आहे. पवारांवर टीका होत असताना पक्षातील वरिष्ठ काहीच का बोलत नाहीत, असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे. पण, रोहित पवार हे लक्षात ठेवा की, जेव्हा तुमच्या प्रादेशिक पक्षाची नेतेमंडळी इतर पक्षांच्या नेत्यांबाबत, अगदी पंतप्रधानांबाबतही जेव्हा असभ्य भाषेत टीका करतात, त्याविषयी त्यांची कानउघडणी तुम्ही केली का? पुरोगामित्वाची टिमकी मिरवणारे जितेंद्र आव्हाड जेव्हा इतरांना घरातून उचलून आणून आपल्या पोलीस आणि गुंडांमार्फत अमानुष मारहाण करतात, तेव्हा तुमची ही सभ्यतेचा आव आणणारी राजकीय संस्कृती कुठे दिसेनाशी होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करताना तुमच्या नेत्यांची बुद्धी कचर्‍याच्या कुठल्या डब्ब्यात नेऊन टाकली होती, याचं उत्तर रोहित पवारांसह सौजन्याचा आव आणणार्‍या सुप्रिया सुळे यांनीही दिलंच पाहिजे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणार्‍या राजू शेट्टींना तथ्यात्मक प्रत्युत्तर देता येत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांची जात काढणार्‍या शरद पवारांनीही मग यावर बोललं पाहिजे. रोहित पवार आपल्या मतदारसंघात प्रा. राम शिंदेंशी लढताना घायकुतीला आले आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा नको त्या गोष्टीत चोंबडेपणा करून नाक खुपसण्याचे अन् इतरांना ज्ञान देण्याचे उद्योग रोहित पवारांनी खरोखरच बंद करावेत. ‘मतदान केलं नाही, तर पाणी बंद करू किंवा पाणीच नाही तर मग धरणात काय दद’ अशी बुद्धीची चमक वाढवणारी विधाने करणार्‍या आपल्या काका अजित पवारांनाही जरा सौजन्याचे धडे रोहित पवारांनी द्यावेत, अन्यथा आपली नाटकं बंद करावीत!


Powered By Sangraha 9.0