विजय केंकरे यांचं नवं नाटक डाएट लग्न लवकरच रंगभूमीवर

    05-Jun-2023
Total Views |
 

vijay kenkre 
 
मुंबई : हेल्थ कॉन्शियस हा शब्द हल्ली सगळ्यांच्या तोंडी सर्रास ऐकायला मिळतो. त्यामुळे डाएट हे देखील सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनून गेला आहे ‘डाएट’ची योग्य व्याख्या सांगायची तर ती म्हणजे संतुलित असा आहार. आहाराच्या या पॅटर्न प्रमाणे नात्यांना संतुलित राखणाऱ्या ‘Diet लग्न’ या नव्या पॅटर्नबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेत्री रसिका सुनील आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी चंद्रलेखा फाऊंडेशन निर्मित डाएट लग्न चा हा पॅटर्न आजमावून पाहिला आहे.
 
रिलेशनशिप बॅलन्स करण्यासाठी हे डाएट लग्न एक उत्तम पर्याय असू शकतो का? हे तपासायचं असेल तर रंगभूमीवर डाएट लग्न हे नवं नाटक नक्की पाहायला हवं. ‘रिलेशनशिप बॅलन्स करणारं क्रिस्पी नाटक’ अशा टॅग लाइनचं हे नाटक लेखिका मनस्विनी लता रवींद्र हिच्या लेखणीतून उतरलं असून दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटकं दिग्दर्शित केलं आहे. या नाटकाद्वारे विजय केंकरे आपलं १०१ वा नाटक दिग्दर्शित करीत आहे. आदित्य सूर्यवंशी आणि सविता सूर्यवंशी या नाटकाचे निर्माते आहेत.
 
चांगल्या नाटकात उत्तम रंगकर्मींसोबत काम करण्याची संधी मिळतेय, हे नक्कीच आमच्या दोघांसाठी आंनदायी असून आमचं हे ‘डाएट लग्न प्रेक्षकांना खात्रीशीर मनोरंजनाची हमी देईल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. ऋता आणि आलोक या जोडप्याची ही कथा आहे. काही कारणाने बिघडलेला नात्याचा समतोल साधण्यासाठी हे दोघे समुपदेशकांनी सांगितलेला डाएट लग्न हा पर्याय स्वीकारतात. हे करत असताना त्यांचे नातं कोणतं वळणं घेणार? हे मार्मिक पद्धतीने दाखविणार हे नाटक आहे.
 
रसिका सुनील, सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आर पी या त्रिकुटाच्या डाएट लग्न च्या शुभारंभाचे प्रयोग शुक्रवार ९ जून ला शिवाजी मंदिर, दादर दुपारी ४.०० वा. आणि शनिवार १० जून सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे दुपारी ४.३० वा. रंगणार आहे. डाएट लग्न नाटकाचे संगीत आनंद ओक यांचे आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे तर प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.