प्लास्टिकचे वैर जगाशी

05 Jun 2023 21:27:04
Global Crisis Plastic Pollution

प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. ‘संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमा’नुसार जगात दर मिनिटाला प्लास्टिकचा एक ट्रकभर कचरा समुद्रात टाकला जातो. १९५०-२०१७ पर्यंत उत्पादित झालेल्या ९.२ अब्ज टन प्लास्टिकपैकी अंदाजे सात अब्ज प्लास्टिकचे रुपांतर कचर्‍यात झाले आहे. हा कचरा लँडफिल्समध्ये आणि समुद्रात टाकला जातो आणि प्लास्टिकचे जैवविघटन होत नाही. त्याऐवजी कालांतराने त्याचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन होते. या तुकड्यांना ‘मायक्रोप्लास्टिक्स’ म्हणून ओळखले जाते. अनेकदा प्लास्टिकचे तुकडे अनेक जलचरांच्या पचनसंस्थेत आढळून येतात. या यादीमध्ये सर्व सागरी कासवांच्या प्रजाती, काही समुद्री पक्षी आणि सागरी सस्तन प्राण्यांपैकी जवळपास निम्म्या प्रजातींचा समावेश आहे.

सागरी जीवनावर होणार्‍या परिणामांमध्ये प्राण्यांना शारीरिक इजा, रासायनिक हानी, जैवविविधता नष्ट होणे यांचा समावेश आहे. तसेच प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात येतात आणि नैसर्गिक चक्र विस्कळीत होते. त्याचबरोबर विविध परिसंस्थांची पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची क्षमताही कमी होते. यामुळे लाखो लोकांचे जीवनमान बदलते. अन्न उत्पादन क्षमतेवर आणि सामाजिक राहणीमानावर त्याचा थेट परिणाम होतो. म्हणूनच प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी आपण वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली पाहिजे, असा चर्चेचा सूर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या बैठकीत दिसून आला.

यावर्षी दि. १६ मे रोजी प्रकाशित केलेल्या नवीन अहवालानुसार, विविध देश आणि कंपन्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून, वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे वळल्यास जागतिक प्लास्टिक प्रदूषण २०४० पर्यंत ८० टक्क्यांनी कमी होऊ शकते. याउलट जर हे बदल आपण सर्वांनी अमलात आणले नाही, तर २०४० पर्यंत अतिरिक्त खर्च तर होईलच; सोबत ८० दशलक्ष टन प्लास्टिक प्रदूषण होईल. पॅकेजिंग क्षेत्र हे जगातील एकेरी (सिंगल युज) वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक कचर्‍याचे सर्वांत मोठे उत्पादक. एकूण उत्पादित प्लास्टिकपैकी अंदाजे ३६ टक्के प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये वापरले जाते. यामध्ये एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या कंटेनरचा समावेश आहे. कृषी हे दुसरे क्षेत्र, जेथे प्लास्टिक सर्वव्यापी आहे. मासेमारी उद्योग हा प्लास्टिक प्रदूषणाचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत. तसेच फॅशन उद्योग हा आणखी एक मोठा प्लास्टिक वापरकर्ता.

पॉलिस्टर, क्रीलिक आणि नायलॉनसह कपड्यांमध्ये बनविलेले सुमारे ६० टक्के साहित्य प्लास्टिकचे असते. जगातील प्रत्येक देशाने अनावश्यक प्लास्टिकचा वापर थांबविणे आवश्यक आहे. त्यांना बाजारातील तीन बदल करणे आवश्यक आहे - पुनर्वापर, पुनर्चक्री, पुनर्रचना आणि विविधता. या आवश्यक बदलांमुळे (Reause, Recycle, Reorient Diversify), पॉलिमर आणि रासायनिक उत्पादक, प्लास्टिक कन्व्हर्टर, ब्रॅण्ड/निर्माते, किरकोळ विक्रेते, सरकार, ग्राहक, कचरा वेचक, कचरा व्यवस्थापन कंपन्या आणि पुनर्वापर करणार्‍या कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या अहवालांमध्ये मुख्यत्वे काही सल्ले देण्यात आले आहेत. पुनर्वापर न करता येण्याजोग्या प्लास्टिकच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मानके निश्चित करण्यात यावी. या मानकांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि सूक्ष्म प्लास्टिक्स निर्माण करणार्‍या उत्पादनांसाठी उत्पादकांना जबाबदार धरावे. देशांनी नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.

सोबतच अनावश्यक प्लास्टिक दूर करणार्‍या व्यवसायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन किंवा वापर रोखण्यासाठी कर आवश्यक आहेत, तर पुन्हा वापरता येण्याजोग्या उत्पादनांसारख्या पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी कर सूट, अनुदाने आणि इतर आर्थिक प्रोत्साहने सादर करणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधाही सुधारल्या पाहिजेत. प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाला प्रगत सुधारणांची आवश्यकता आहे. यामध्ये वैयक्तिक निवडदेखील महत्त्वाची. जसे की जेव्हा शक्य असेल तेव्हा एकल-वापर प्लास्टिक उत्पादनांचा वापरे टाळणे. जर प्लास्टिक उत्पादने अपरिहार्य असतील, तर त्यांचा पुन्हा वापर केला जावा. किराणा दुकानात कापडी पिशव्या न्याव्यात आणि शक्य असल्यास, कमी प्लास्टिक पॅकेजिंग असलेली उत्पादने वापरावी, असे छोटे बदल सर्वांनी केले, तर त्याचा परिणाम मोठा होईल.


Powered By Sangraha 9.0