ओडिशातील बालासोरमधील भीषण रेल्वे अपघाताने देश हळहळला. या अपघातात २७५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जवळपास ९०० हून अधिक जण जखमी झाले. सध्या याठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली असून त्यामागे ‘एनडीआरएफ’च्या जवानांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा वाटा आहे. या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून घटनास्थळी पोहोचले. दुसर्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांची अनेक छायाचित्रेही ‘व्हायरल’ झाली. ज्यामध्ये कधी ते घटनास्थळी अपघाताची चौकशी करताना तर कधी रात्री अधिकार्यांसोबत बैठक घेताना दिसले. दि. १० जुलै, २०११ साली उत्तर प्रदेशात एकाच दिवसांत दोन रेल्वे अपघात झाले. उत्तर प्रदेशातील फतेहपूरजवळ कालका मेल रुळावरून घसरली आणि गुवाहाटी-पुरी एक्सप्रेसच्या चार डब्यांसह इंजिन रंगिया आणि घागरापार, नलबारी जिल्हा, आसाम दरम्यान रुळावरून घसरले आणि एका नाल्यात कोसळले होते. या दोन्ही अपघातांमध्ये ७० जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. धक्कादायक म्हणजे, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुकूल रॉय यांना गुवाहाटी येथील घटनास्थळी जाण्यास सांगितले खरे. परंतु, त्यावेळी मुकूल रॉय यांनी परिस्थिती नियंत्रणात असून बचावकार्य पूर्ण झाले असून त्याठिकाणी जाण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सांगत घटनास्थळी जाण्याचे टाळले. मात्र, बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी घटनास्थळी भेट तर दिलीच, परंतु, रेल्वेमंत्री घटनास्थळी दिवस असो वा रात्र तळ ठोकून होते. वैष्णव हे दोन दिवस घटनास्थळावरून हलले नाही. त्यांनी संपूर्ण बचावकार्य, मदतकार्य आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून सूचना केल्या. अगदी पहिली रेल्वे जेव्हा रवाना झाली, तेव्हा वैष्णव यांनी जाणार्या रेल्वेला हात जोडून नमस्कारही केला. माध्यमांशी बोलत असताना त्यांना अश्रूही अनावर झाले. जो रेल्वेमंत्री घटनास्थळावर तळ ठोकून होता आणि नुसता तळ ठोकून नव्हे, तर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत होता, त्यांचा राजीनामा मागितला गेला. परंतु, त्यावर वैष्णव यांनी राजीनामा नव्हे, तर जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे असल्याचे प्रांजळ उत्तर दिले.
अपघाताचे दुर्देवी राजकारण
रेल्वे अपघातानंतर परिस्थिती कशी पूर्वपदावर येईल, याचा विचार करण्याऐवजी विचारांचा दरिद्रीपणा देशातील विरोधी पक्षांकडून पाहायला मिळाला. अपघातानंतर सर्व विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनी तर थेट घटनास्थळीच मृतांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रेल्वेमंत्री मृतांचा अधिकृत आकडा सांगत असतानाही ममतांनी तो खरा नसल्याचे सांगत ५०० हून अधिक मृत्यू झाल्याचा दावा केला. ममतांनी घटनास्थळीही राजकारणाची पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही या प्रकरणी टीका केली. परंतु, संपुआच्या काळात झालेल्या रेल्वे अपघातांचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडला. रेल्वे अपघातानंतर लाल बहादूर शास्त्री आणि नितीश कुमार यांनीही आपल्या कार्यकाळात राजीनामा दिला होता, असा युक्तिवादही करण्यात आला. परंतु, नैतिकता म्हणून राजीनामा द्यायचे ठरले, तर या देशात निम्मे राजकारणी घरात बसतील. नुकताच बिहारमधील खगडिया-भागलपूर येथे गंगा नदीवरील एक निर्माणाधीन पूल पत्त्यासारखा कोसळला. नऊ वर्षांपासून पुलाचे काम सुरू होते. परंतु, तो अवघ्या नऊ सेकंदांमध्येच कोसळला. विशेष म्हणजे दोन वर्षांत दोन वेळा पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यावर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आम्हाला पुलाच्या कामावर शंका होती, त्यामुळे हा पूल सरकार पाडणारच होते. परंतु, त्याआधीच तो पडल्याचा जावईशोध लावला. या पुलासाठी थोडेथोडके नव्हे, तर १ हजार, ७१७ कोटी खर्च करण्यात आले. परंतु, आता पूल कोसळल्याने हे सगळे पैसे पाण्यात गेले. त्यामुळे आता नैतिकता म्हणून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यायला हवा. पण, ते तसे करणार नाही. कारण, अशावेळी नैतिकता लपून बसते. त्यामुळे रेल्वे अपघाताच्या आडून राजकारणाचा हा असंवेदनशील डाव सामान्य जनता ओळखून आहेच. शिवाय ममता, लालू मुख्यमंत्री असताना त्यांनी रेल्वे अपघात टाळण्यासाठी सरकारी पातळीवर काय प्रयत्न केले, तेही जनतेला सांगावे. अशी ही घटना सर्वस्वी दुर्देवीच, पण त्याहूनही त्याचे राजकीय भांडवल लाटण्याचा विरोधकांकडून सुरु असलेला प्रयत्न त्याहूनही दुर्देवीच म्हणावा लागेल!