वन्यजीवांचा संघर्ष टिपताना

03 Jun 2023 22:50:01
kokan

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणिगणना ही ‘सॅम्पलिंग सर्वे’ म्हणून जरी योग्य असली तरी अंदाज आणि ‘जनरलायझेशन’ हा याचा मुख्य पाया आहे. पौर्णिमेच्या दिवशी मचाणवर बसून विविध ठिकाणी पाणवठ्यावर येणारे वन्यजीव मोजताना आणि त्यावरून संपूर्ण क्षेत्रातील वन्यजीवांच्या संख्येचा अंदाज बांधताना अनेक चुका होणे सहज शक्य आहे. म्हणून नवनवीन तंत्रज्ञान, ट्रान्सेक्ट लाईन सर्वे आणि ट्रॅप कॅमेराचा अधिकाधिक वापर करून अचूकतेकडे वाटचाल करणारे अंदाज बांधणे अधिक योग्य ठरेल.

कोकणात रात्रीची जेवणे झाली की, अंगणात पडून नाहीतर पानाचे डबे उघडून लोकांच्या गप्पा रंगतात. गावागावांत वाडीवाडीत रंगणार्‍या गप्पा देशाच्या पंतप्रधानांपासून अगदी गोठ्यातल्या गाईपर्यंत नानाविध विषयांना सामावून घेणार्‍या असतात. पारावर बसून रंगणार्‍या गजालीची जागा या गप्पांनी घेतली आहे आणि या कथांचा नायकही आजकाल बदलला आहे. सर्वदूर वस्त्यांवर पोहोचलेल्या लाईटने आता भुताखेतांची झोंबाझोंबी बंद केली आणि अलगद पावलांनी किंचित् सुद्धा आवाज न करता वावरणारे नवीन भूत आता गावात अवतरले आहे. बिबट्या... मानव-प्राणी संघर्षातील हा एक महत्त्वाचा विषय. अगदी शहरात वाहनांच्या गोंधळातसुद्धा सहजतेने वावरणारा आणि कोकणातील वाडीमध्ये रातकिड्यांचा डॉल्बीवर लावल्याप्रमाणे वाटणार्‍या कर्कश आवाजात सुद्धा दबकत वावरणारा हा प्राणी आता नित्यनेमाचा झाला आहे.

कोकणात खरंतर बिबट्याला ‘वाघ’ म्हणून बर्‍याच वेळा समजले जाते. पट्टेरी वाघाचा आढळ तसा दुर्मीळ, परंतु चांगला मोठ्या आकाराचा, वेगाने नजरेआड होण्याच्या कौशल्यामुळे पट्टे दिसले की काय, असा भास निर्माण होऊन वाघ बघितल्याच्या कथा सगळीकडे ऐकायला मिळतात. बरेचवेळा या कथा खर्‍याखोट्या करण्याची संधीसुद्धा आम्हाला मिळते. पावलांचे ठसे बघून ‘ट्रॅप कॅमेरा’ लावला की त्यात खळ्यात सहजतेने वावरणारा बिबट्या आढळून येतो आणि पट्टेरी वाघाच्या चर्चांचा अंत होतो. गेल्या पाच वर्षांत संगमेश्वर तालुक्यात अनेक गावांमध्ये आम्ही लावलेल्या कॅमेर्‍यांतून हीच परिस्थिती वारंवार समोर आली आहे. बिबट्याचा वावर हा जंगले सोडून मुख्यत: मानवी वस्तीनजीक वाढलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या दिसण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. परंतु, यामुळे त्यांची संख्या वाढली आहे, असे गृहीतक मांडणे मात्र धोकादायक आहे.

कोकणात बिबट्याचा वावर वस्तीत वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, सहज खाद्याची उपलब्धता. ओला कचर्‍याच्या व्यवस्थापनाचे प्रकल्प कोकणात जवळजवळ नसल्याने या कचर्‍यावर उंदीर, घुशी आणि भटके कुत्रे यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे आणि तुलनेने कमी कष्टात मिळणारे हे खाद्य बिबट्यासारख्या जगातील सर्वाधिक अनुकूलित भक्षकाला आकर्षित करत नसेल तर नवलच! मध्यंतरी रत्नागिरीजवळील पावस रस्त्यावर बिबट्याकडून दुचाकीस्वारांवर हल्ले होण्याचे प्रमाणसुद्धा मोठे होते. या कथेमागची पार्श्वभूमी तपासून पाहिली असता, दुचाकीवरून कोंबड्यांची होणारी वाहतूक पुढे आली आणि अपघाताने यातील काही कोंबड्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आढळल्या. तेव्हापासून हा बिबट्या दुचाकीस्वारांची पाळत ठेवत होता, हे विशेष. गेल्या काही वर्षांत बिबट्यांची एक ते दोन वर्षांची पिल्लेसुद्धा लक्षणीयरित्या वस्तीत मिळत आहेत आणि वन विभागाने वेळोवेळी अशी पिल्ले ‘रेस्क्यू’ केली आहेत.

रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाढलेल्या वाहतुकीमुळे बिबट्याचे दर्शनसुद्धा अनेकांना होते आहे आणि मोबाईल क्रांतीमुळे हातोहाती कॅमेरा आल्याने बिबट्याचे व्हिडिओ शूट करून क्षणार्धात ‘व्हायरल’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी वन्यजीव निरीक्षक म्हणून सुखद वाटणार्‍या असल्या तरी मानवी संघर्षात होणारी वाढ आणि बिबट्यांच्या मृत्यूत झालेली वाढ त्यांच्या संख्येविषयी चिंतीत करणारी आहे. विशेषत: उघड्या विहिरीमध्ये पडून जखमी किंवा मृत होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे आणि त्याखालोखाल रस्त्यावर वाहनाखाली येऊन बिबटे मेल्याच्या पाच ते दहा घटना वर्षभरात घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची संख्यावाढ की घट, यावर अधिक शास्त्रीय संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ही कोकण आणि सह्याद्रीच्या परिसरातील वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चांदोली, कोयना आणि राधानगरीच्या जलाशयाभोवती असणारी जंगले, गवताळ मैदाने आणि कातळ पठारे यावरील समृद्ध असणार्‍या वन्यजीवनाला सुरक्षित करण्याच्यादृष्टीने या प्रकल्पाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. सह्याद्रीच्या उतारावरील जंगले ही या प्रकल्पाच्या ‘बफर झोन’ आणि नजीकच्या परिसरात येतात. त्यातील काही भाग संरक्षित असला तरी सर्वाधिक भाग मात्र खासगी मालकीच्या जंगलांचा असंरक्षित असा आहे आणि गेल्या काही वर्षांत वन्यजीवन मुख्यत: या जंगलांमध्ये स्थलांतरित झाल्याचे आढळून येत आहे. ही जंगले सह्याद्रीच्या तीव्र उतारावर वसलेली असल्यामुळे येथील नद्या डिसेंबर-जानेवारीमध्येच कोरड्या होतात आणि पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होऊन वन्यजीव खालच्या वस्तीकडील भागात स्थलांतरित होतात. या खासगी जंगलामध्ये वृक्षतोडीचे प्रमाण सुद्धा सर्वाधिक आहे आणि अलीकडच्या काळात जंगलांमधील मानवी वावर अत्यंत कमी झाल्यामुळे अनेक पायवाटा काळानुरूप नष्ट झाल्या आहेत. या वाटांची आणि मोकळ्या भागांची जागा आता रानमोडी करवंद अशा काटेरी झुडपांनी घेतली आहे.

यामुळे प्राण्यांना हालचाल करणे आणि स्थानिक स्थलांतर अशक्य झाले आहे. यातूनच गवे, सांबर, रानडुकरे यांचा अधिवास मानवी वस्तीभोवती वाढलेला आढळून येतो. वेळोवेळी केलेल्या कॅमेरा सर्वेमध्ये याला सशक्त पुरावेसुद्धा मिळाले आहेत. एवढेच नव्हे, तर गव्यांची दोन-तीन महिन्यांची लहान असणारी पिल्ले दिसणे हे या प्राण्यांचे ‘ब्रीडिंग ग्राऊंड’ ‘शिफ्ट’ झाल्याचे ढळढळीत पुरावे आहेत. गवे, डुक्कर, वानरे हे प्राणी वस्तीमध्ये स्थलांतरित झाल्याचा पहिला दृश्य परिणाम म्हणजे, जंगलाकडेची शेती करणे सोडली जाणे. सातत्याने होणार्‍या पिकांवरील धाडी, भक्ष्यस्थानी पडण्यापेक्षा हालचालीमुळे होणारे जास्त नुकसान आणि सातत्याने तणावाखाली वावरावे लागणे याला कंटाळून अनेक शेतकर्‍यांनी शेती करणे सोडले आहे. मुख्यतः नाचणी, वरी, भात आणि भाज्यांसारखी पौष्टिक आणि चवदार पिके या प्राण्यांना आवडली नसती तर नवलच. जंगलात आधीच गवताळ कुरणांची असणारी कमी संख्या चराई आणि हिरवाईसाठी करावी लागणारी भटकंती सोडून रात्रीच्या वेळी मानवी वावर कमी झालेला असताना पिकांवर धाडी टाकण्याचा सोपा मार्ग प्राणी पत्करला आहे, हे आता स्पष्ट आहे.

जंगलाकडील शेती जसजशी कमी होत गेली आणि त्यांची जागा आंबा, काजू, रबर अशा बागांनी घेतली आहे. हे बागायती लागवडीचे वाढलेले क्षेत्र अनेक वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास म्हणून चांगलेच भावले आहे. काजू बागायतीमध्ये १० ते १५ प्रकारचे प्राणी सहजतेने वावरत असल्याचा अभ्यास नुकताच प्रदर्शित-प्रकाशितसुद्धा झाला आहे. (Mammals Make Use of Cashew Plantations in a Mixed Forest-Cashew Landscape: Anushka Rege, Girish Punjabi et el २०२०). यात भेकर, पिसेरा, साळिंदर, उदमांजर, वानर, गवे, बिबटया, सांबर आणि रानकुत्रे हे प्राणी समाविष्ट असल्यामुळे संघर्षाच्या घटना वारंवार घडणार हे निश्चित आहे आणि यावर उपाययोजना करावी, यासाठी प्रथमदर्शनी संरक्षित क्षेत्राबाहेरील प्राण्यांचा अधिवास ओळखून त्यांची संख्या निश्चिती ही महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणिगणना ही ‘सॅम्पलिंग सर्वे’ म्हणून जरी योग्य असली तरी अंदाज आणि ‘जनरलायझेशन’ हा याचा मुख्य पाया आहे. पौर्णिमेच्या दिवशी मचाणवर बसून विविध ठिकाणी पाणवठ्यावर येणारे वन्यजीव मोजताना आणि त्यावरून संपूर्ण क्षेत्रातील वन्यजीवांच्या संख्येचा अंदाज बांधताना अनेक चुका होणे सहज शक्य आहे. म्हणून नवनवीन तंत्रज्ञान, ट्रान्सेक्ट लाईन सर्वे आणि ट्रॅप कॅमेराचा अधिकाधिक वापर करून अचूकतेकडे वाटचाल करणारे अंदाज बांधणे अधिक योग्य ठरेल आणि प्राण्यांच्या संख्येतचा योग्य अंदाज करून संघर्षाविषयीचे धोरण ठरवणे अधिक सोपे आणि संयुक्तिक ठरेल.

प्रतिक मोरे


Powered By Sangraha 9.0