योगींचा ‘गुंतवणूक प्रदेश’

28 Jun 2023 21:08:20
CM Yogi Adityanath Uttar Pradesh Development

उत्तर प्रदेश हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण बनले आहे. अराजकता आणि माफियाराज हा आता इतिहास बनत चालला आहे. जागतिक पटलावर बदलत्या चित्रासह उत्तर प्रदेश देश आपली नवी छाप सोडत आहे, यात शंका नाही. आता ‘लढाऊ राज्य’ अशी उत्तर प्रदेशची प्रतिमा बनत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचा सध्या चौफेर विकास होत आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर जणूकाही झोपलेला सिंह जागा झाला आणि आपली खरी ओळख शोधण्यासाठी निघाला. उत्तर प्रदेशबद्दलची प्रत्येकाची धारणा बदलली आहे. पूर्वी उत्तर प्रदेशचा उल्लेख केला की माफिया, अराजकता, असुरक्षितता असे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असे. आज मात्र उत्तर प्रदेशचा उल्लेख केला की, डोळ्यासमोर येते ते मजबूत कायदा व सुव्यवस्था, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ, सर्वाधिक एक्सप्रेस हायवे आणि प्रचंड वेगाने होत असलेली गुंतवणूक. या सगळ्यांचे श्रेय जाते, ते मुख्यमंच्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या भक्कम प्रशासनाला!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सांगितले की, राज्य सरकारने सुमारे ३६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या गुंतवणूकदार परिषदेत सामंजस्य करार करण्यात आले होते. ’रिलायन्स ग्रुप फर्म अ‍ॅडव्हर्ब’च्या २०० कोटी रुपयांच्या रोबोट निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, “राज्यात प्रथमच सर्व ७५ जिल्ह्यांसाठी गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत आणि सर्वाधिक प्रस्ताव गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातून आले आहेत.” योगी आदित्यनाथ म्हणाले की, “दुसरी ’ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’ २०२३ मध्ये लखनऊ येथे झाली होती. या कालावधीत राज्य सरकारने स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांमधून राज्यात आता ३६ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. चांगली कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा आणि सुविधा, सुरक्षा वातावरण आदींमधून गुंतवणूक येते आणि हे सर्व आता राज्यात दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटले आहे.

आंतर्देशीय जलमार्ग असलेले उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरले असल्याचेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. राज्यात हवाई संपर्क सुधारला असून, उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी फक्त दोन विमानतळ कार्यरत होते, तिथे आता नऊ पूर्णपणे कार्यरत विमानतळ आहेत. राज्यातील १२ विमानतळांचे काम सुरू असून, या वर्षाच्या अखेरीस पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे हे पहिले राज्य होणार आहे. राज्य अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण लवकरच स्थापन केले जाणार असून, त्यामुळे मालवाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याद्वारे उत्तर प्रदेशात रस्तेमार्ग, जलमार्ग आणि हवाईमार्ग अशा सर्व पद्धतींना दळणवळणाची उत्तम सोय निर्माण होणार आहे. राज्यात ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि डेटा सेंटरपासून ते टेक्सटाईलपर्यंत आता उद्योग उभारण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आपले लक्ष्य असल्याचे अनेकदा सांगितले आहे. देशाची अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलर्स असेल तेव्हा त्यात राज्याचा वाटा दोन ट्रिलियन डॉलर असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही अभिनव योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी विशिष्ट उत्पादन ठरवण्यात आले आहे, जे तेथील अन्न सुरक्षा आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. ही योजना उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासात आणि बेरोजगारी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांच्या विपणन आणि निर्यातीची व्यवस्थादेखील केली जाते, ज्यामुळे स्थानिक उत्पादकांना चांगले मूल्य मिळते आणि त्यांची आर्थिक पातळी वाढते. जिल्ह्यातील स्थानिक लोकांसाठी ’एक जिल्हा-एक उत्पादन’ कार्यक्रम अतिशय फायदेशीर आहे. कारण, त्यांना त्यांच्या स्थानिक संसाधनांचा वापर करून उद्योजकतेसह स्थानिक बाजारपेठेत उत्पादन आणि विक्री करण्याची संधी मिळते. अशाप्रकारे, त्यांना उत्पादनाच्या विकासाशी संबंधित नोकर्‍यांची संधीदेखील मिळते, जी त्यांच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वाची असते. याशिवाय, ’एक जिल्हा एक उत्पादन’ कार्यक्रम विविध जिल्ह्यांमधील व्यापार वाढवतो, ज्यामुळे जिल्ह्यांमधील आर्थिक संबंध सुधारतात आणि त्यांच्या आर्थिक विकासाची गती वाढते. या कार्यक्रमाद्वारे, उत्तर प्रदेश सरकार उत्पादकांना त्यांच्या स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि माहिती प्रदान करते.

उत्तर प्रदेशची कायदा व सुव्यव्यस्था सुधारणे, हा उत्तर प्रदेशच्या विकासाचा सर्वांत मोठा कारक घटक ठरला. राज्यात एकेकाळी माफियांनी आपापले बालेकिल्ले ठरवून घेतले होते. परिणामी, त्यांच्या मर्जीनुसारच राज्य कारभार चालवावा लागत असे. मात्र, माफियांना नेस्तनाबूत करण्याचे धोरण राबवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रथम विकासाला लागलेले ग्रहण दूर केले आणि माफियांना धुळीस मिळविण्यास प्रारंभ केला. परिणामी, राज्यामध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी अशाप्रकारे उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलण्यास प्रारंभ केला आहे. ज्या गोष्टी कालपर्यंत अशक्य वाटत होत्या, त्या आज सहजशक्य होताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण बनले आहे. अराजकता आणि माफियाराज हा आता इतिहास बनत चालला आहे. जागतिक पटलावर बदलत्या चित्रासह उत्तर प्रदेश देश आपली नवी छाप सोडत आहे, यात शंका नाही. आता ‘लढाऊ राज्य’ अशी उत्तर प्रदेशची प्रतिमा बनत आहे. आपल्या अफाट संसाधनांचा अधिक चांगला वापर, गुंतवणुकीत वाढ, उत्पादन, निर्यात आणि व्यावसायिक वातावरण सुधारणे, ही आता उत्तर प्रदेशची नवी ओळख आहे!

Powered By Sangraha 9.0