पेल्यातले वादळ की...?

27 Jun 2023 21:11:46
Wagner Group vows to topple Russian military leadership

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्यावर्षी युक्रेनवर हल्ला करून अमेरिका, युरोप आणि ‘नाटो’ देशांना खुले आव्हान दिले होते. तेच पुतीन रशियाचे खासगी सैन्य असलेल्या ’वॅगनर ग्रुप’च्या बंडामुळे आपल्याच घरात अडकल्याचे दिसून आले. ‘वॅगनर’ने सुरू केलेले बंड अवघ्या २४ तासांतच थंडावले असले तरी पुतीन यांच्यासाठी निश्चितच हा एक मोठा धक्का मानला जातो. ‘वॅगनर’ आणि त्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी केलेल्या बंडामुळे रशियाच्या सत्तेवरील पुतीन यांची पकड कमकुवत झाली आहे का, असाच प्रश्न उपस्थित होतो.

युक्रेनच्या बाखमुट येथील ‘वॅगनर’ प्रशिक्षण शिबिरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशिया आणि ‘वॅगनर’ यांच्यातील वादाला तोंड फुटले. या हल्ल्यात ‘वॅगनर’चे अनेक सैनिक मारले गेले. तेव्हा, ’रशियन जनरल्सनी युक्रेनमधील त्यांच्या सैन्यावर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले होते,’ असा दावा प्रिगोझिन यांनी केला. युक्रेन युद्धात जिंकलेल्या प्रदेशांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून प्रिगोझिनचे पुतीन आणि परराष्ट्रमंत्री सर्गेई यांच्याशी मतभेद आहेत, असे म्हटले जाते. प्रिगोझिनला तो भाग युक्रेनमध्येच ठेवायचा होता. मात्र, पुतीन यांचा यास नकार होता आणि यामुळेच प्रिगोझिनने बंडाला सुरुवात केली.

असा हा ’वॅगनर ग्रुप’ ही सैनिकांची खासगी संस्था. २०१४ पूर्वी ही एक गुप्त संघटना म्हणून सक्रिय होती. या गटात तब्बल ५० हजारांहून अधिक सैनिक आहेत. रशियन सैन्यातील माजी अधिकारी दिमित्री उत्किन यांनी या ग्रुपची सुरुवात केली. पण, आता याच ‘वॅगनर’च्या बंडानंतर पुतीन यांनी देशातील जनतेला संबोधित करताना ‘वॅगनर’ आणि प्रिगोगिन यांना ‘देशद्रोही’ म्हणून संबोधत विश्वासघात करणार्‍यांना शिक्षा होईल, असे कडक शब्दांत सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक आदेश जारी केला होता. ज्यात युक्रेनविरूद्ध लढणार्‍या सर्व खासगी सैनिकांना रशियन सैन्यात सामील होण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी सर्व खासगी सैन्याला करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते.

मात्र, ‘वॅगनर’ने हा करार मान्य करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर मॉस्कोच्या रस्त्यांवर सशस्त्र वाहने आणि रशियन सैन्य तैनात करण्यात आले. शहरात ‘हाय-अलर्ट’ असून राजधानीला जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला. राजधानीत दि. १ जुलैपर्यंत सर्व मैदानी कार्यक्रम रद्द करण्यात आले. महापौरांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. परंतु, ‘वॅगनर’चे हे बंड अवघ्या २४ तासांत थंडावले. याला प्रमुख कारण म्हणजे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को. पुतीन यांनी अलेक्झांडर लुकाशेन्को, उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झीयोयेव आणि कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमार्ट तोकायेव यांच्याशी चर्चा केली. मात्र, पुतीन यांच्या विरोधात सुरू असलेल्या बंडातून ‘वॅगनर ग्रुप’ला माघार घ्यायला लावण्यात अलेक्झांडर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. प्रिगोझिन यांच्या म्हणण्यानुसार, पुतीनना ‘वॅगनर मिलिटरी ग्रुप’ संपवायचा होता.

त्याकारणास्तव दि. २३ जूनला ’मार्च फॉर जस्टिस’ला सुरुवात झाली. २४ तासांच्या आत ‘वॅगनर’ने मॉस्कोच्या दिशेने सैन्यासह कूच केली. परंतु, अलेक्झांडर यांनी मध्यस्थी घेत मॉस्कोच्या दिशेने जाणार्‍या प्रिगोझिनच्या सैन्याला थांबण्याचा प्रस्ताव ठेवला, जो प्रिगोझिनने स्वीकारला. अर्थातच, यामुळे मॉस्कोच्या दिशेने जाण्याची प्रिगोझिनची योजना बदलली. त्यांनी आपल्या सैनिकांना युक्रेनला परतण्याचे आदेश दिले. केवळ रक्तपात टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रिगोझिन यांनी सांगितले. अलेक्झांडर यांनी प्रिगोझिन आणि रशिया यांच्यात केलेल्या करारामुळे ‘वॅगनर’चे हे बंड तूर्तास तरी थंडावले आहे. कारण, त्यातून ‘वॅगनर’ला रशियापासून सुरक्षेची हमी मिळेल, अशी शाश्वती देण्यात आली. याबदल्यात प्रिगोझिन यांनी मॉस्कोकडे मोर्चा थांबवावा, असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव प्रिगोझिनने स्वीकारल्यामुळे रशियामधील गृहयुद्ध आणि बंडाचा धोका सध्या तरी टळला.

इतकेच नव्हे, तर पुतीन यांची जागा घेण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि पुतीनचेच निकटवर्तीय प्रिगोझिन यांनीसुद्धा रशिया सोडल्याचे वृत्त आहे. मात्र, या करारावर पुतीन यांनी अद्याप कुठलीही भूमिका मांडली नसल्याने हा प्रश्न अजूनही टांगणीलाच असल्याचे दिसते. तेव्हा, ‘वॅगनर’चे बंड हे पेल्यातील वादळ ठरले असले तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, हे येणार्‍या काळातच स्पष्ट होईल.


Powered By Sangraha 9.0