गंगा आणि नाईलचा अनोखा संगम

27 Jun 2023 21:19:38
Article On India And Egypt Relation

इजिप्त १९७०च्या दशकात अमेरिकेचा मित्रदेश बनल्यानंतर भारताने इजिप्तकडे दुर्लक्ष केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे नवे पर्व सुरू होत असताना, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतील अरब देशांसोबत भारताच्या संबंधांमध्ये मोठे बदल घडणे अपेक्षित आहे.

अमेरिका दौर्‍यावरुन भारतात परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ तासांसाठी इजिप्तला भेट दिली. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी आखाती अरब राष्ट्रांमध्ये अनेकदा जाऊन आले असले तरी त्यांनी इजिप्तला भेट दिली नव्हती. स्वातंत्र्यानंतर सुमारे तीन दशकं भारताच्या सर्वांत जवळच्या मित्रदेशांपैकी एक असलेल्या इजिप्तला १९९७ पासून एकाही भारतीय पंतप्रधानांनी भेट दिली नव्हती. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह सिसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये मोदींनी इजिप्तला भेट देऊन भारताच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या अरब देशाचे महत्त्व अधोरेखित केले. विमानतळावर इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मदबुली यांनी इजिप्तच्या मंत्रिमंडळातील आपल्या सात सहकार्‍यांसह मोदींचे स्वागत केले.

या दौर्‍यात भारत आणि इजिप्तमधील संबंधांना कूटनीतीक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. पंतप्रधानांनी इजिप्तचे अध्यक्ष सिसी यांच्यासोबत राजनयिक संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भारतातील दाऊदी बोहरा समाज अनेक शतकांपूर्वी इजिप्तमधून गुजरातच्या किनार्‍यावर स्थायिक झाला. पंतप्रधानांनी कैरोमध्ये दाऊदी बोहरा समाजाच्या अल हकिम मशिदीलाही भेट दिली. इजिप्तच्या ग्रँड मुफ्तींची भेट घेतली. इजिप्तमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधला. यावेळी मोदींना ‘ऑर्डर ऑफ नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
 
इजिप्तला भारताप्रमाणे हजारो वर्षांचा इतिहास आणि संस्कृती लाभली आहे. इस्लामिक इतिहासातही फातिमिद खलिफत अल-काहिरा येथे म्हणजेच आजच्या कैरोजवळ स्थित होती. १६व्या शतकात तुर्कीच्या ओटोमन साम्राज्याने इजिप्तवर विजय मिळवला. १९व्या शतकात इजिप्तला स्वायत्तता मिळाली असली तरी पहिल्या महायुद्धानंतर १९२२ साली ब्रिटिशांनी इजिप्तला एक देश म्हणून मान्यता दिली. १९५२ साली इजिप्तमध्ये राजेशाही उलथवून टाकण्यात आली. स्वतःला ‘प्रजासत्ताक’ घोषित केलेल्या इजिप्तमध्ये लवकरच लोकशाहीचे रुपांतर समाजवादी प्रभावाच्या लष्करशाहीत झाले. इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्देल नासेर आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यात विशेष मैत्री होती. अमेरिकेने दोन्ही नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कल सोव्हिएत रशियाकडे होता. अरब-इस्रायल संघर्षात इजिप्तने अरब जगाचे नेतृत्व केले. १९६७च्या युद्धात प्रचंड पराभव झाल्यानंतर इजिप्तला वस्तुस्थितीची जाणीव झाली. नासेरनंतर अध्यक्ष झालेल्या अन्वर सदात यांनी इस्रायलशी राजनयिक संबंध प्रस्थापित करून त्याबदल्यात अमेरिकेचा भक्कम पाठिंबा मिळवला. अमेरिका सर्वांत जास्त मदत इजिप्तला करते.

अन्वर सदात यांच्या हत्येनंतर अध्यक्ष झालेल्या होस्नी मुबारक यांच्या ३० वर्षांच्या कार्यकाळात इजिप्त एक आधुनिक अरब राष्ट्रं म्हणून पुढे आला असला तरी भ्रष्टाचाराने व्यवस्था ग्रासली होती. २०११ साली झालेल्या अरब राज्यक्रांतीमध्ये लोकांनी मुबारक यांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या इस्लामिक संघटनेला प्रचंड विजय मिळवला असला तरी २०१४ साली लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आणि तेव्हापासून अब्देल फतह सिसी इजिप्तचे अध्यक्ष आहेत. सध्या इजिप्तची अर्थव्यवस्था संक्रमणावस्थेतून जात आहे. नाईल नदी, सुएझ कालवा आणि पर्यटन हेच उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या इजिप्तची लोकसंख्या दहा कोटींहून जास्त आहे. इथिओपिया नाईल नदीवर प्रचंड धरणं बांधत असल्यामुळे इजिप्तची जलसुरक्षा धोक्यात आली आहे. सुरुवातीला अरब राज्यक्रांती, त्यानंतर वातावरणातील बदलांचा प्रवाळांवर झालेला परिणाम आणि त्यानंतर ‘कोविड-१९’चे संकट यातून बाहेर काढण्यासाठी इजिप्तला गुंतवणुकीची गरज आहे.

सुएझ कालव्यातून १२ टक्के जागतिक व्यापार होतो. कंटेनरद्वारे होणार्‍या जागतिक व्यापारात सुएझ कालव्याचा वाटा ३० टक्के आहे. हिंद-प्रशांत महासागरीय क्षेत्रात विस्तारवाद करणार्‍या चीनचा इजिप्तवर डोळा आहे. पण, इजिप्त आर्थिक मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून असल्याने इजिप्तमध्ये भारताला मोठी संधी आहे. इजिप्त १९७०च्या दशकात अमेरिकेचा मित्रदेश बनल्यानंतर भारताने इजिप्तकडे दुर्लक्ष केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचे नवे पर्व सुरू होत असताना, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतील अरब देशांसोबत भारताच्या संबंधांमध्ये मोठे बदल घडणे अपेक्षित आहे. पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी भारतातील रेल्वे विकासावर लक्ष केंद्रित केले. गेल्या नऊ वर्षांत रस्तेविकास क्षेत्रातही आपण तितकीच मोठी मजल मारली आहे. आखाती आणि अरब राष्ट्रांमध्ये रेल्वेमार्ग उभारणी, बंदर विकास आणि सौरऊर्जा या क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योगांना मोठी संधी आहे. संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ व्हायच्या निर्णयाचे परिणाम आता दिसू लागले असून, भारतीय खासगी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील संधी आता खुणावू लागल्या आहेत. या दृष्टीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इजिप्त भेटीचे महत्त्व आहे.

नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या क्रिस्तियान अमनपूर यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची मुलाखत घेतली. त्यात प्रश्न विचारताना हेतूतः भारताचा ‘संकुचित विचारसरणीची लोकशाही’ असा उल्लेख करण्यात आला. ओबामांनीही उत्तर देताना सांगितले की, बायडन यांनी मोदींसोबत चर्चेत भारतातील मुसलमानांच्या सुरक्षेचा मुद्दा काढायला हवा. ओबामा पुढे म्हणाले की, “जर ते बायडन यांच्या जागी असते, तर त्यांनी मोदींना सांगितले असते की, जर भारताने वांशिक अल्पसंख्याक असलेल्या मुसलमानांच्या हक्कांचे संरक्षण केले नाही, तर भविष्यात भारतीय समाज दुभंगू शकेल.” अध्यक्ष झाल्यानंतर ओबामांनी दि. ४ जून, २००९ ला कैरो विद्यापीठातून भाषण करताना जगभरातील मुस्लीम समुदायाशी संवाद साधला होता. असं म्हटलं जातं की, त्याने तर दीड वर्षांने झालेल्या अरब राज्यक्रातीचे बीज या भाषणात रोवले गेले. ‘अरब वसंता’चे लवकरच ‘ग्रीष्म ऋतू’मध्ये रुपांतर झाले. देशोदेशांमध्ये झालेल्या निवडणुकांत विजयी झालेली लोकशाहीवादी सरकारं अल्पजीवी ठरली. अनेक ठिकाणी यादवी युद्धांमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले. लाखो लोकांवर निर्वासित व्हायची वेळ आली. ज्या अमेरिकेने आपला मित्र असलेल्या होस्नी मुबारक यांचे सरकार उलटून टाकले जात असताना बघ्याची भूमिका घेतली होती, तिलाच अब्देल फतह सिसी इजिप्तमध्ये लष्करी राजवट आणत असताना तिला पाठिंबा द्यावा लागला. दहशतवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली ओबामांनी सहा मुस्लीमबहुल देशांमध्ये हवाई हल्ले करण्यास आपल्या हवाईदलाला परवानगी दिली.

आपल्या अमेरिका भेटीदरम्यान असे विषय बाहेर काढण्याचा प्रयत्न होणार, हे माहिती असल्यानेच मोदींनी अमेरिकेसोबत इजिप्तचा दौरा योजला असावा. कैरोमधील अल हकिम मशीद ११व्या शतकात बांधण्यात आली होती. कालांतराने मोडकळीस आलेल्या या मशिदीची भारतातील बोहरा समाजाने १९८० साली पुनर्बांधणी केली. भारतातल्या दाऊदी बोहरा समाजाने राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होऊन संपूर्ण समाजासाठी रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मदत कार्यात भरीव योगदान देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. या समाजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अनेक दशकांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या दौर्‍यात मोदींनी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती शौकी इब्राहिम आलम यांचीही भेट घेतली. मुस्लीम देशांमध्ये फतवा काढणार्‍या १००हून अधिक संस्थांच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या महिन्यातच आलम भारतात आले होते. भारतात मोदींच्या नेतृत्त्वाखाली सर्वसमावेशकता आणि विविधता जपली जात आहे याचे त्यांनी कौतुक केले. त्यातूनच बराक ओबामांच्या टीकेला उत्तर दिले गेले.
भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये नैसर्गिक मैत्री आहे. शीतयुद्धाच्या काळात ती घट्ट होण्यासाठी अलिप्ततावाद आणि समाजवादाची मदत झाली होती. पण, या दोन्ही विचारांना उतरती कळा लागल्यापासून भारत आणि इजिप्तमधील संबंधांतील औपचारिकता वाढू लागली. नरेंद्र मोदींच्या इजिप्त भेटीने सहकार्याचे नवीन आयाम समोर आले. जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रगतीशील अरब देशासोबत चांगले संबंध असणे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मोदींच्या इजिप्त भेटीने हाच मुद्दा अधोरेखित करण्यात आला.


Powered By Sangraha 9.0