डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायगडावर जायचे, तर नातू औरंग्याच्या कबरीवर!

26 Jun 2023 14:42:55

Prakash Ambedkar 
 
 
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायगडावर जायचे, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला गेले. अशी टीका माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. संभाजी राजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांच्या भेटीगाठीही सुरु होत्या. मात्र, संभाजी राजे यांना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
 
छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "प्रकाश आंबेडकरांच्या कृतीचं समर्थन कसं करणार? प्रकाश आंबेडकरांसोबत जाणार नाही. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. या पलिकडे अजून काय बोलणार? मी माझी भूमिका काल स्पष्ट केली आहे. ज्या शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना औरंगजेबाने ठार मारण्याचा प्रयत्न केला, ज्या संभाजी महाराजांची हत्या केली, ज्या ताराराणींनी सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला, अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची गरज काय?" असा सवाल करत संभाजी राजेंनी आपली भुमिका मांडली.
 
पुढे ते म्हणाले, "तुम्हाला अभिवादन करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडला गेले होते. तिथे गेल्यावर ते न चुकता रायगडावर गेले. तिथे झुडपं होतं, समाधीच्या ठिकाणी पोहोचण्याची अडचण होती. पण बाबासाहेब गेले आणि त्यांनी त्यांना अभिवादन केलं. देशच नाही तर राज्यातील कोणत्याही नेत्याला शाहू महाराजांना बाजूला ठेवून राजकारण करता येणार नाही. शाहू महाराज हेच तुमचे रोल मॉडल होऊ शकते. त्यांना रोल मॉडल ठेवूनच राजकारण करावं लागेल." असं ही ते यावेळी म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0