लढाऊ डॉल्फिन्सच्या निमित्ताने...

26 Jun 2023 22:13:34
Article On Combat Dolphins

जगाच्या नकाशावर प्रत्येक देश आपापल्या सीमांच्या संरक्षणाबाबत जागृत आणि तितकाच संवेदनशील असतो. मग त्यासाठी अफाट संसाधनांचाही वापर करायला तो पुढे-मागे पाहात नाही. सध्या युक्रेनसोबत युद्धस्थितीत असलेला रशियाही याला अपवाद नाहीच. नौदल, भूदल आणि हवाई दलात म्हणूनच सैन्यभरतीकडे रशियाचा कल असतो. इथंवरही ठीक, पण रशियाने फार पूर्वीपासूनच काही समुद्रीजीवांचाही हेरगिरीसाठी, निगराणीसाठी वापर केल्याचे उजेडात आले आहे.
 
’मिलिटरी मॅमल्स’ म्हणजेच लष्करी सागरी सस्तन प्राणी म्हणून बॉटलनोज डॉल्फिन, सील, समुद्री सिंह (सी-लायन) आणि बेलुगा व्हेल यांचा समावेश केला जातो. संयुक्त राष्ट्रे आणि सोव्हिएत युनियनच्या सैन्यांनी विविध उपयोगांसाठी महासागरातील डॉल्फिन्सला अशाप्रकारे प्रशिक्षित करून संरक्षणात्मक कामात उतरविले. साधारणपणे १९६५ मध्ये पहिला ‘मरीन मॅमल प्रोग्रॅम’ राबविण्यात आला होता. यावेळी काही शार्क, पक्षी आणि सागरी सस्तन प्राण्यांच्या १९हून अधिक प्रजातींच्या चाचण्या घेण्यात आल्या. बॉटलनोज डॉल्फिन आणि समुद्री सिंह यांच्या साहाय्याने पाणबुड्या आणि पाण्याखालील शस्त्रे तयार करण्यासाठीचे प्रयोग सुरु झाले. हा विषय आता पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, याचं कारण रशियाने यंदा पुन्हा ‘कॉम्बॅट डॉल्फिन्स’ म्हणजेच ‘लढाऊ डॉल्फिन्स’चे प्रशिक्षण सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. रशियातील क्रिमियामध्ये या लढाऊ डॉल्फिन्सचे प्रशिक्षण रशियाने सुरू केले असून, नौदलाने गेल्या वर्षापासून सेवस्तोपोल येथील ब्लॅक सी फ्लिटच्या मुख्य तळावर सुरक्षेसाठी मोठी गुंतवणूक केली आहे.

सोव्हिएत युनियन आणि संयुक्त राष्ट्रे या दोन्ही देशांनी शीतयुद्धादरम्यान डॉल्फिनचा वापर केल्याचे समजते. पाणबुड्या, खाणी, बंदर आणि जहाजांजवळील संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती शोधण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. एका निवृत्त अधिकार्‍याने डॉल्फिनला शत्रूंच्या जहाजांवर स्फोटक उपकरणे ठेवण्यासाठीही प्रशिक्षित केले जात असल्याचे सांगितले आहे.
प्रत्येक देशागणिक कायदे बदलतात आणि म्हणून कायदेशीररित्या ही बाब कितपत योग्य हा मोठा प्रश्नच. मात्र, असे असले तरी नैतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या ही बाब गंभीर आणि अयोग्य वाटते. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉल्फिन्स बरोबरच काही पक्ष्यांचा वापर गुप्तहेर म्हणूनही केला जातो. प्राणी अथवा पक्ष्याच्या शरीरावर कॅमेरे बसवून त्यांना विशिष्ट भागात पाठवणे, हे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यांना विशिष्ट प्रकारे प्रशिक्षितही केले जाते.

‘बॉटलनोज्ड डॉल्फिन्स’ ही ‘आययुसीएन’च्या लाल यादीमध्ये संकटग्रस्त प्रजातींच्या जवळ जाणारी प्रजाती. भारतात तर सर्व नद्या आणि समुद्रात आढळणार्‍या ‘मरीन स्पिशिज’ म्हणजेच ’सागरी प्रजातीं’ना ‘वन्यजीव संवर्धन कायदा, १९९८’ अंतर्गत संरक्षण पुरविण्यात आले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलाढ्य असलेल्या तसेच विकासाच्या अंगाने खूप पुढे गेला असला, तरी रशियासारख्या देशाला स्वसंरक्षण आणि सीमेचा बचाव करण्यासाठी जैवविविधतेतील जीवांवर अवलंबून राहावे लागते. तंत्रज्ञान आणि संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या अनेक यंत्रतंत्र आणि लोकसंख्याबळ उपलब्ध असतानाही अशाप्रकारे मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात आणला जातो. म्हणजे ज्यापद्धतीने सैन्यात श्वानांना वगैरे प्रशिक्षण दिले जाते, तसाच हा प्रकार. पण, रशिया ज्या उत्तर गोलार्धात आहे, तेथील अतिशीतकटिबद्धीय समुद्रात म्हणा हेरगिरीसाठी मानवाचा, बोटींचा फार काळ टिकाव लागणे कठीणच. त्यात हेरगिरी करताना अशा गुप्तहेरांना पकडले तर मोठी अडचण. म्हणूनच मग ज्यांच्यावर कोणी संशय घेणार नाही, जे रडारमध्ये कदाचित शत्रूसारखे दिसणार नाहीत, सहज घुसखोरी करु शकतील म्हणून मग अशा समुद्रीजीवांचा याकामी वापर केला जातो.

किमान भारतात असे प्रयोग आजवर निदर्शनास आलेले नाहीत. जैवविविधतेतील या घटकांना कोणतीही हानी न पोहोचवता संरक्षणात्मक बचावांचे कित्येक पर्याय आजच्या आधुनिक युगात नक्कीच अवलंबता येऊ शकतात. नैसर्गिक अधिवासातील विविध घटकांचा असा अनाठायी विपर्यास थांबवून तंत्रज्ञानाचा हात धरून, संरक्षणात्मक कर्तव्ये बजावावी, हीच स्वसंरक्षणाची योग्य दिशा ठरेल, असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
Powered By Sangraha 9.0