बुलढाणा : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींची शनिवारी बुलढाण्यातील मलकापूर येथे जाहीर सभा होती. मलकापूर येथील सभेत असदुद्दीन ओवेसींनी "औरंगजेब अमर रहे"च्या घोषणा दिल्या. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय जनता पक्षाकडून पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा पोलीसांशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील कडासने यांच्याशी बोलून औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, किरीट सोमय्या म्हणाले, औवेसी, काँग्रेस , उध्दव ठाकरे , राष्ट्रवादी फक्त मुस्लिम मतांसाठी औरंग्याचे उदात्तीकरण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंग्याला हीरो बनविण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई होणारच असे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले.
व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत औरंगजेबाचे नाव राहील. मात्र, ही घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी या लोकांना हातवारे करताना दिसले. पोलिसांनी व्हिडिओचा तपास सुरू केला असून व्हिडिओ तपासून कायदेशीर कारवाई केली जाईल.