पुण्यात जल्लोषात निघाली श्री जगन्नाथ रथयात्रा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल ८० हजार भाविकांना महाप्रसाद

    25-Jun-2023
Total Views |
Shri Jagannath RathYatra In Pune

पुणे
: हरे राम हरे कृष्णा...जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा... चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
 
टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प.पू.लोकनाथ स्वामी महाराज, प.पू.प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, प.पू.श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, रथयात्रेचे मार्गदर्शक व इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती दास, रथयात्रा समन्वयक अनंत गोप दास, मंदिराचे उपाध्यक्ष श्वेतदीप दास उर्फ संजय भोसले, माध्यम व संपर्कप्रमुख जर्नादन चितोडे आदींच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. तसेच इस्कॉनचे वरिष्ठ ब्रह्मचारी, भक्तगण व ५ ते ६ हजार पुणेकरांनी सहभाग घेतला.

भगवान जगन्नाथ, भगवान बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची दया जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते.

रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ७० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि १० हजार भक्तांना भोजन देण्यात आले. विविध प्रकारचे वाद्यवादन व वेशभूषा केलेले कलाकार देखील रथयात्रेत सहभाग झाले.

स.प.महाविद्यालय येथून निघालेली यात्रा अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यात्रेत अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.