‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये अमरेंद्र यांचे राज्य

25 Jun 2023 21:04:03
Article On Event Manager Amarendra Patwardhan

‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजेच कार्यक्रमाचे संयोजन यात रूची असलेले अमरेंद्र पटवर्धन यांनी विविध अडचणींवर मात करीत यशोशिखर गाठले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

अमरेंद्र यांनी कार्यक्रम संयोजन क्षेत्रात पाऊल टाकायचं ठरविले; पण घरातून पाठिंबा नव्हता. एवढ्या वरच त्यांच्या अडचणी संपल्या नाहीत, तर व्यावसायिक पातळीवरही त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला कार्यक्रम करताना अगदी बॅनर लावण्यापासून ते सामान उचलणे, तर सूत्रसंचालन सर्व एकट्यानेच करण्याचे अनेक प्रसंग पटवर्धन यांच्या आयुष्यात आले. एखाद्या राजकीय कार्यक्रमाची जबाबदारी घेतल्यावर दुसर्‍या पक्षातील राजकीय व्यक्ती नाराज होत, अशा ही काही प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला. काहींनी त्यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी आपले काम आणि आपण हे तत्त्व समोर ठेवून पुढे वाटचाल करीत राहिले. या प्रवासात त्यांना विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले आणि त्यांचे एक-एक पाऊल यशस्वीतेकडे पडत गेले.

अमरेंद्र यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील टिळकनगर शाळा व महाविद्यालयीन शिक्षण पेंढरकर महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करीत असताना मनापासून आवड असलेला कार्यक्रम संयोजन हा व्यवसायदेखील हळूहळू सुरू केला. यामध्ये विविध सांगीतिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम आयोजन व संयोजन केले. ज्यामध्ये काही मालिकेतील कलाकरांच्या मुलाखतीचे संयोजन, काही चॅनलचे कार्यक्रम, मुलाखती अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन व संयोजन कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी केले आणि या कार्यक्रमांचा सिलसिला आज ही तसाच सुरू आहे. सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’, अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’, ‘गीतरामायण’, ‘नक्षत्रांचे देणे’, ‘सरींवर सरी’पासून महानाट्य ‘जाणता राजा’ यांचे आयोजन व सह आयोजनही अमरेंद्र यांनी केले आहे.

हे काम करीत असताना त्यांनी सामाजिक भानही जपले आहे. त्यासाठी त्यांनी काही मदत निधी कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनाथाश्रम, गरजू विद्यार्थी, वृद्धाश्रम यांच्याकरिता मदतनिधीद्वारे सहकार्य केले. सा. ‘विवेक’ने आबासाहेब पटवारी यांच्याकरिता केलेल्या विशेष कार्यक्रम संयोजनातदेखील अमरेंद्र यांचा सहभाग होता. अशाप्रकारे विविध ठिकाणी गेल्या काही वर्षांत लहानमोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून १५०हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन व संयोजन त्यांनी केले आहे. तसेच, महापालिकेच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये हळदीकुंकू समारंभ व मंगळागौरीचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, गुणगौरव सोहळा, विविध नाट्यप्रयोग, बालनाटय शिबिरे, उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी इच्छापत्र या विषयावर कार्यक्रमांचे संयोजन केले. ज्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले.

सध्या समाजाला भेडसावणारी समस्या म्हणजे ऑनलाईन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी यावर जनजागृतीकरिता अनेक शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्था यांच्याकरिता सायबर तज्ज्ञ व पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने ‘सायबर लॉ’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन केले. व याकरिता स्वतः ‘सायबर लॉ’चा अभ्यास करून या विषयातील ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’ हा अभ्यासक्रमदेखील यशस्वीरित्या पूर्ण केला. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून ‘चित्तपावन ब्राह्मण’ संघाच्या माध्यमातून कार्य सुरू करत सहा वर्षे कार्यकारिणी सदस्य राहून विविध उपक्रम राबविले. तसेच, ब्राह्मण महासंघ डोंबिवली उपाध्यक्ष म्हणून कार्य केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ठाणे जिल्हा अध्यक्ष, मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष ते राष्ट्रीय सचिव अशा विविध जबाबदारीच्या पदांवर काम करत पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अमरेंद्र पटवर्धन यांनी ४० जणांच्या टीमच्या सहकार्याने ’कोविड’ काळात लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये कल्याण आणि डोंबिवली येथे वृद्ध, अपंग, गरजू व इतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सेवा स्वत:चा जीव धोक्यात घालून विनामोबदला घरपोच पुरविली. महाड येथील महापुराच्या दुर्दैवी घटनेनंतर कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई पालघर या ठिकाणावरून पाच ते सहा टेम्पो ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू व शिधापुरवठा या कार्यात सहभाग घेतला. बालभवन येथील आवश्यक सुधारणा करणे, याबाबत त्यांनी सर्वप्रथम पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी बालभवनाला भेट देऊन मागणीनुसार बदल करीत नूतनीकरणाच्या सूचना दिल्या.

सावित्रीबाई फुले नाट्यगृह ते रेल्वेस्टेशन अशी बससेवा सुरू व्हावी, यासाठी अमरेंद्र यांनी पत्रव्यवहार केला होता. सध्या काळाची गरज असलेल्या ‘निसर्ग संवर्धन’ याकरितादेखील त्यांचा ‘सृष्टीभान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाज जागृतीपर उपक्रम ते राबवित असतात. सिनेनाट्य , राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रात अनेकांशी सलोख्याचे संबंध असून, सर्वांशी सलोख्याने राहणारे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व असलेल्या अमरेंद्र पटवर्धन यांच्या पुढील वाटचालीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!

Powered By Sangraha 9.0