हिमाचल प्रदेशच्या मनोहर लालचा खून आणि काही प्रश्न...

24 Jun 2023 22:55:38
Manohar Lal Murdered In Manohar Lal

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील मनोहर लाल या मागासवर्गीय समाजातील युवकाची नुकतीच निर्घृण हत्या झाली. मनोहर लाल याचे गावातील एका मुस्लीम मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच मुलीच्या परिवाराने त्याचा खून केला. प्रेमाची सजा म्हणून मनोहर लाल याच्या देहाचे सात तुकडे करून ते पोत्यात भरून नाल्यात फेकण्यात आले. काही दिवसांतच गुन्हेगाराला अटक झाली, तरीही लोकांचा आक्रोश थांबता थांबत नाही. त्यांच्या मते, गुन्हेगाराचा दहशतवादी संबंधही विचारात घ्यावा. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोहर लाल याचा खून, गुन्हेगार त्याची पार्श्वभूमी आणि समाजवास्तव याचा वेध घेणारा हा लेख...

हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील सलूणी परिसरामधला २१ वर्षीय मनोहर लाल. १५ दिवसानंतर त्याचे लग्न होते. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. अशातच दि. ६ जूनला मनोहर लाल आपल्या खेचरांना चारापाणी देण्यासाठी पहाडावर गेला. पहाडावर खेचर चरायला घेऊन गेला. त्याचा तो व्यवसाय होता; पण त्यानंतर तो पुन्हा कधीच कुणाला दिसला नाही. त्याची खेचरंही त्या दिवशी दिसली नाहीत. मात्र, दुसर्‍या दिवशी त्याची खेचरं एका नाल्याजवळ उभी राहिलेली दिसली. मनोहर लाल घरी परतला नाही, म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. शोधाशोध सुरू झाली आणि दि. ९ जून रोजी गस्त घालणार्‍या सैनिकी दलाला एका नाल्यामधून दुर्गंधी येताना जाणवली. शोध घेतल्यानंतर त्या नाल्यामधून आठ तुकडे केलेले एक शव मिळाले. अत्यंत निर्घृणपणे हत्या करून तुकडे केलेले तो निष्प्राण देह होता, मनोहर लाल याचा!

पोलिसांनी धागेदोरे जुळवत माग काढत गुन्हेगारांना पकडले. मुस्लीम समाजातील एकाच कुटुंबातील ते गुन्हेगार होते. त्यांनी मनोहर लालचा खून का केला असेल, तर या कुटुंबातील मुलीचे आणि मनोहर लाल यांचे प्रेमसंबंध होते. अर्थात, धर्म वेगळे, संस्कार वेगळे आणि जीवनपद्धतीही वेगळी. म्हणून मनोहर लाल आणि रूखसाना दोघांच्या घरातून या विवाहाला विरोध होताच. रूखसानाच्या कुटुंबाने, तर मनोहर लाल आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे मनोहर लालचे प्रेम प्रकरण बळेबळे संपवण्यासाठी त्याचे लग्न करून देण्याचा त्याच्या घरातल्यांचा प्रयत्न होता. अशातच दि. ६ जून रोजी असे काय घडले की, मनोहर लाल दोन खेचरांना घेऊन पहाडावर गेला? तर घटनाक्रम विशद करताना असे दिसते की, त्याच्या प्रेयसीने रूखसानाने त्याला भेटायला बोलावले.

मनोहर लाल तिथे गेल्यानंतर रूखसानाच्या घरातील शब्बीर मुसाफिर, मोहम्मद आणि फरिदा सकट इतर सदस्यांनी त्याच्याशी वाद सुरू करून त्याला काठीने मारहाण केली. मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याचे तुकडे केले आणि ते पोत्यामध्ये भरून नाल्यामध्ये असलेल्या दगडाखाली ते प्रेत दाबून टाकले. दगडाखाली यासाठी दाबून ठेवले की, प्रेत तिथेच सडेल आणि त्याचे विघटन होऊन वाहत्या पाण्यासोबत ते वाहून जाईल. मात्र, मनोहर लाल याच्या पायातली चप्पल पोत्यातून वाहत बाहेर आली आणि त्याचबरोबर नाल्याच्या त्या जागेतून प्रेताची दुर्गंधीही येऊ लागली. तिथे गस्त घालणार्‍या राखीव दलाच्या सैनिकांना संशय आला आणि त्यांनी तपास सुरू केला असता, मनोहरचे क्षतविक्षत केलेले शव त्यांना सापडले.

मनोहरच्या खुनाची बातमी वार्‍याच्या वेगाने पसरली आणि हिमाचल प्रदेशाचे वातावरण तापू लागले. मनोहरचा खून झाला, तोही प्रेमप्रकरणातून? हिंदू मागासवर्गीय समाजाच्या मनोहरचे प्रेम मुस्लीम समाजाच्या मुलीसोबत होते. त्यामुळे त्याचा खून झाला होता. एकच चर्चा होती की, ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रचत ते हिंदूंच्या मुलीबाळींचे जीवन नरक बनवतात. त्यावेळी कुणी ‘जिहाद’ हा शब्दही उच्चारायचा नाही. कारण, ते त्या दोघांचे प्रेम असते आणि ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य असते. ते प्रेम मुस्लीम मुलाला जन्नतपर्यंत पोहोचवू शकते. मात्र, हिंदू मुलाने मुस्लीम मुलीशी प्रेम केले, तर ते अत्यंत नरकासमान कृत्य. त्याबदल्यात हिंदू मुलाला मारणे, हा एकच उपाय? असा दुटप्पीपणा का? दुसरीकडे मनोहर लाल याच्या खुन्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष होता.

कारण, दि. ३ ऑगस्ट १९९८ हिमाचल प्रदेशातील चंबामधील कालाबन आणि सतरूंडी परिसरामध्ये ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी ३५ निष्पापांचा नरसंहार केला होता. त्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणारा आणि त्या हत्याकांडात सक्रिय असणार्‍या व्यक्तींची पोलीस चौकशी झाली होती. मनोहरच्या खुनामधला गुन्हेगार त्यापैकी एक होता. भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मनोहरला न्याय मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरल्या. मनोहरच्या खुन्यांना फाशीची सजा व्हावी, म्हणून जनआंदोलन सुरू झाले. आंदोलनात लोकं इतकी संतप्त होती की, त्यांनी गुन्हेगार कुटुंबाचे घरच जाळून टाकले. दुसरीकडे तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली की, मनोहरच्या खुन्याची चौकशी दहशतवादाच्या मुद्द्यातूनही व्हावी का? त्याच्या मागचे कारण समजून घेऊया.

चंबाचा सतरूंडी परिसर जम्मू-काश्मीरच्या सीमेवर. दि. ३ ऑगस्ट १९९८चा सूर्य उगवण्याआधी दहशतवाद्यांनी ३५ मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. चंबामधील दुर्गम जंगलपहाडी भागात रस्ता बांधण्याचे काम हे मजूर करत होते. दुर्गम भागात रस्ताबांधणी केली, तर इथे लोकांची वर्दळ वाढेल. तसेच, स्थानिक लोकांचाही बाहेरच्या समाजाशी संपर्क वाढेल. त्यामुळे या दुर्गम भागाचा विकास होऊच नये, अशी दहशतवाद्यांची भूमिका. त्यामुळे इथे विकासकामांमध्ये मजुरीचे काम करणार्‍या निष्पाप गरीब मजुरांवर ते झोपेत असताना गोळ्या झाडण्यात आला. त्या गरिबांचे सामानही लुटण्यात आले. इतकेच काय तिथे विकासकामांसाठी लागणारी जी काही साधनं होती, तीसुद्धा लुटून नेण्यात आली. हे लुटलेले सामान उचलून नेण्यासाठी दहशतवाद्यांनी सहा जणांना बंधक बनवले. त्यापैकी एकाला दहशतवाद्यांनी सोडून दिले; पण बाकीच्या पाच बंधकांचे काय झाले, हे त्यानंतर कुणालाच कळले नाही. यामध्ये ज्या बंधकाला दहशतवाद्यांनी सोडले होते, ती व्यक्ती स्थानिक मुस्लीम समाजातली होती. पुढे या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांची धरपकड करण्यात आली. त्यावेळी या हल्ल्यासाठी काही स्थानिक मुस्लीम व्यक्तींनी दहशतवाद्यांना सहकार्य केले होते, हे उघड झाले, तर या दहशतवादी हल्ल्यासाठी ज्यांची धरपकड आणि चौकशी झाली, त्यातून एक जण सुटला. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने पुढे काही वर्षांनी मनोहरचा खून केला.

या गुन्हेगाराची आर्थिक स्थितीही पाहण्यासारखी आहे. शेळी-मेंढी पालन करणार्‍या या व्यक्तीकडे मोजून १०० पशू असतील. मात्र, दरवर्षी तो २०० ते ३०० पशूंची विक्री करतो. त्याच्या नावार दीड एकर जमीन होती. मात्र, इतरांच्या ५० एकर जमिनीवर त्याने अतिक्रमण करून त्या जागेवर कब्जा केलेला. शेळी-मेंढी पालन करणार्‍या या व्यक्तीची बँकेत किती रक्कम शिल्लक असावी, तर दोन कोटी! नुकतेच त्याने ९८ लाख रूपयांच्या दोन हजार रूपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेतल्या होत्या. या माणसाचे घर मैदानापासून दहा हजार फूट उंचीवर होते. तिथे वर्षभर सहा ते आठ फूट बर्फ पडत असतो. मात्र, तरीही हा व्यक्ती त्या घरातच राहतो, का? काही वर्षांपूर्वी गुर्जर जात लावणारा मुस्लीम समाज, हिमाचल प्रदेशाच्या पहाडी भागामध्ये राहायचा. बर्फ पडायला लागला की, पहाड उतरून हा समाज खाली मैदानात वास्तव्यास यायचा. यातील अनेक घरांमध्ये मग दहशतवादी तळ ठोकायचे. पहाडावर पशू चरायला आलेल्या लोकांना लुटायचे. त्यांचे पशुधन ताब्यात घ्यायचे. जीवाच्या भीतीने याबद्दल कुणीही काही बोलत नसे.

पहाडावरच्या घरांमध्ये दहशतवादी निवारा करतील, असा संशयही कुणी घेऊ शकत नव्हते; पण पहाडावरच्या काही व्यक्ती दहशतवादी आपल्या कौमचा आहे, म्हणून त्यांना थारा देत. त्याबदल्यात अर्थातच या लोकांना आर्थिक साहाय्यता आणि बरेच काही लाभ दहशतवाद्यांकडून मिळत असत. हे सगळे सत्य बाहेर आल्यानंतर त्यावेळी सरकारने पहाडावर दुर्गम स्थानी राहणार्‍या या लोकांना खाली मैदानात जबरदस्तीने वसवले. मात्र, त्यानंतरही मनोहर लालचा खून करणारे कुटुंब मात्र पहाडावरच राहत होते. हे सगळे संशयास्पद आहे, हे सांगायलाच हवे का? या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय त्यातही दारिद्य्र रेषेखालील जीवन जगणार्‍या मनोहर लालच्या मृत्यूवर काँग्रेसच्या गांधी परिवाराने शोक व्यक्त केल्याचे ऐकण्यात नाही की पुरस्कारवापसी गँग ते डफली वाजवून क्रांतीच्या नावाने केवळ हिंदू संस्कृती धर्मविरोधात बोलणारे डफली गँगही तिथे उतरली नाही. नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी औरंग्याच्या कबरीवर डोके ठेवले.

वंचितांच्या नावाने त्यांचा कारभार चालतो. मग गरीब आणि वंचित मनोहर लाल याच्या मृत्यूबद्दल चकार शब्द नाहीत. का? मारणारे जर हिंदू असतील, तरच तोंड उघडायचे असो काही, अलिखित अजेंडा आहे का? बरं, ते मानवी हक्कवालेही दिसत नाहीत. ना कुठे प्रेम प्रकरणातून हत्या झाली, प्रेमाचा खून झाला, असे म्हणत मेणबत्ती पेटवली गेली. मनोहरचा खून जितका गंभीर तितकीच या सगळ्या तथाकथित पुरोगामी निधर्मी आणि खोट्या मानवी हक्क उर्फ डाव्या चळवळीवाल्यांची तळागाळातल्या समाजाविषयीची खोटी आपुलकी गंभीर आहे. असो. विषयांतर झाले; पण तरीही मनात वाटतेच आहे. मनोहरच्या जागी मुनिर असता तर? बरं, मनोहरचे खुनी कोणी खुल्या गटातील हिंदू असते तर? हो आणि हे काही नसताना तिथे काँग्रेसऐवजी भारतीय जनता पक्षाचे सरकार असते तर? हं...हा जर-तरचा प्रश्न आहे. तूर्तास मनोहरच्या खुनाने चंबावासीयांच्या १९९८ सालच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद वेदना पुन्हा चिघळल्या, हे नक्की!

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0