राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा प. पू. श्रीगुरूजी यांच्या निधनास नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांचे हे पुण्यस्मरण...
या पुढील काळात डॉ. हेडगेवार यांनी श्रीगुरूजींवर संघाच्या विविध जबाबदार्या टाकून त्यांचे नेतृत्वगुण पारखून घेतले. संघशिक्षावर्गाचे सर्वाधिकारी, कलकत्त्यात प्रचारक, पुढे संघाचे सरकार्यवाह म्हणून नियुक्ती, या सर्व घटना घडलेल्या दिसतात. सिंदी (महाराष्ट्र) येथे प्रमुख कार्यकर्त्यांची, संघाची जी दहा दिवसांची प्रदीर्घ चिंतन बैठक डॉक्टरजींच्या उपस्थितीत पार पडली, तिचे नेतृत्त्व डॉक्टरजींच्या मार्गदर्शनाखाली, श्रीगुरूजींनी केले. याच काळात ते वैचारिक व व्यावहारिकदृष्ट्या ते अधिकाधिक परिपक्व होत गेलेले दिसतात. त्यांचा हा विकासक्रम डॉक्टरजी डोळ्यात तेल घालून पाहत होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या पश्चात सरसंघचालकपदाची धुरा श्रीगुरूजींनी सांभाळावी, अशी योजना करुन ठेवली. दि. २१ जून, १९४० रोजी डॉक्टरजींचे निधन झाले. त्यांनी केलेल्या योजनेनुसार त्यांच्या पश्चात म्हणजे दि. ३ जुलै, १९४० रोजी श्रीगुरूजींनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतली. श्रीगुरूजींची सरसंघचालकपदी नियुक्ती करून डॉक्टरांनी आपल्या अचूक निवडशक्तीचा व दूरदृष्टीचा प्रत्यय आणून दिला. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवीत श्रीगुरूजींनी पुढील ३३ वर्षे म्हणजे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत म्हणजे दि. ५ जून १९७३ पर्यंत ही जबाबदारी मनोभावे व सर्व शक्तीनिशी समर्थपणे पार पाडली.
आपल्या ३३ वर्षांच्या सरसंघचालकपदाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गुरूजींनी प्रतिवर्षी दोनदा संपूर्ण भारताचे संघटनात्मक दौरे केले. ‘आगगाडीचा डबा हेच माझे घर’ असे ते म्हणत, ते याच अर्थाने! देशाच्या कानाकोपर्यात संघकार्याचा विस्तार व्हावा, संघमंत्र व शाखातंत्र जनमानसात रुजावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. संघशाखा हे कार्यकर्तानिर्मितीचे, कार्यासाठी लागणार्या मानवी ऊर्जानिर्मितीचे केंद्र बनावे, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. ही प्रक्रिया म्हणजे एका बाजूला 'chiseling out the unessantial' अशा हळूवार स्वरुपाची असावी व दुसर्या बाजूने कोणताही 'Factory Defect' नसलेला तो Finished Product'असावा, अशी त्यांची धडपड होती. या अर्थाने शाखातंत्र ही गुणवत्तापूर्ण कार्यकर्ता निर्मितीची विनाभिंतीची शाळा आहे. आपण सारे अपूर्णांक आहोत आणि आपला प्रवास संघमंत्र व शाखातंत्र या माध्यमातून पूर्णांकाच्या दिशेने झाला पाहिजे, असे त्यांचे प्रतिपादन असे. या वैचारिक व व्यावहारिक मुशीतूनच हजारो कार्यकर्त्यांची फळी संघ व संघपरिवारात तयार होऊ शकली. विविध स्तरावर कार्य करणार्या स्वयंसेवकांच्या बैठका, शिबिरे, संघशिक्षावर्ग, अभ्यासवर्ग, चिंतन बैठका यांच्या माध्यमांतून लाखो स्वयंसेवकांशी त्यांनी सतत संपर्क ठेवलेला दिसतो.
संवाद, संपर्क, स्नेह सहवास व आत्मियता यातून माणसे संघाशी कशी जोडावी, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. 'Man-making for nation building' हे सूत्र त्यांनी प्रत्यक्षात आणले. त्यामुळेच समाज व राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदू जीवनदृष्टी घेऊन संघटनात्मक, रचनात्मक व सेवाभावी कार्याचे डोंगर उभे करणारे कार्यकर्ते व संस्था जीवन संघ व संघपरिवार उभे करू शकला. "Yes, we want to conquer all walks of life,'' असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार त्यांनी एका मुलाखतीत काढले होते, त्याचे प्रत्यक्ष रुप आज आपण पाहत आहोत. राष्ट्रउभारणीची प्रक्रिया कशी बहुकेंद्री व बहुआयामी असते, हेच यातून सिद्ध होते. साधी दररोजची तासाभराची संघशाखा. या शाखेतून संघभावना (team spirit) विकसित होते. मातृभूमीविषयी भक्तिभाव, समाजाविषयी आत्मियता इ. संस्कार स्वयंसेवकाच्या मनावर दररोज होत राहतात. खेळ, व्यायाम, योग, बौद्धिक, चर्चा, प्रार्थना याद्वारे कार्यकर्त्याची जडणघडण होत असते. जातीपातीच्या जन्मजात उतरंडीतून समाजमनात रुजलेली सामाजिक विषमता व उच्च-नीचतेचा भाव आणि हिंदू समाजाला कलंकभूत असलेला स्पृश्यास्पृश्यतेचा घृणास्पद व्यवहार या सार्यांचा निचरा होतो. समरसत्तायुक्त व तुच्छतामुक्त असे संघटित समाजजीवन निर्माण करण्यासाठी शाखातंत्र हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले प्रभावी माध्यम आहे. संघटनशास्त्राचा तो एक अपूर्व व यशस्वी प्रयोग आहे. या प्रयोगाचे परिपूर्णत्व करण्यात श्रीगुरूजींच्या चिंतनाचा व प्रत्यक्ष जीवन व्यवहाराचा मोठा वाटा आहे.
शाखा हे समाजपरिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजे. सामाजिक न्याय, सुरक्षा व समरसता यांचे आश्वासक सदन बनले पाहिजे, अशी मांडणी ते सातत्याने करीत. जिथे जिथे संघमंत्र व शाखातंत्र यांचा चोख व चैतन्यदायी आविष्कार झाला, तिथे तिथे असंख्य कर्तृत्ववान अशा कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहिले. जेथे शाखातंत्र ढिले पडले वा केवळ कर्मकांडी झाले, तेथे समस्या उभ्या राहिल्या. अशा शाखा हे गुरूजींच्या चिंतेचे विषय होत. म्हणूनच प्रत्येक बैठकीत स्वयंसेवकांच्या व्यवहाराची ते बारकाईने व आस्थेने चौकशी करत. संघशाखा या साधनाविषयी असलेली त्यांची श्रद्धा अगदी विपरित परिस्थितीतही कधी डळमळीत झालेली दिसत नाही.
श्रीगुरूजींनी भारतीय चिंतनाच्या आधारे राष्ट्रवादाच्या सांस्कृतिक आशयााची सातत्याने मांडणी केली. हिंदू, हिंदुत्व, हिंदू जीवन पद्धती, हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती या देशाच्या अस्तित्वाशी निगडित संकल्पनांची ते शास्त्रसुद्ध व साधार मांडणी करीत. त्याचं पोटतिडकीने ते येथील समाजजीवन निर्दोष, सुसंघटित व बलवान व्हावे म्हणून आवश्यक असणार्या संघाच्या कार्यपद्धतीची- संघमंत्र व शाखातंत्र यांच्या माध्यमातून कार्यकर्तानिर्मिती व त्याद्वारे सुसंघटित समाजजीवन व बलशाली, वैभवसंपन्न राष्ट्रजीवन यांची उभारणी, याबद्दलची श्रीगुरूजींची आग्रही भूमिका संघाच्या वाढीस व विकासास कारणीभूत ठरली आहे. जेव्हा केव्हा ‘संघटनशास्त्र’ या विषयाचे विश्वकोशीय स्वरुपाचे ग्रंथलेखन होईल, तेव्हा श्रीगुरूजींच्या या विषयातील महत्त्वपूर्ण योगदानाची योग्य ती दखल निश्चितपणे घेतली जाईल, असा विश्वास वाटतो.
रा. स्व. संघाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. संघविचार मानणारे आज राजकीय क्षेत्रात नेतृत्वपदी बसले आहेत. दुसर्या बाजूला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशासमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे या आव्हानांचे संधीच्या सोन्यात रूपांतर करण्याचे आव्हान आज आपल्यासमोर उभे आहे. राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर व अंगावर भारतीय चिंतनावर आधारित ठसा उमटवून देश परमवैभवाप्रत नेण्याचे हे आव्हान आहे. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या संघमंत्र व शाखातंत्रावर आधारित मनुष्यनिर्माण व राष्ट्रउभारणी यांची गती वाढवणे, हीच श्रीगुरूजींच्या पुण्यप्ररेक स्मृतींना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल,असे वाटते.
९३२४३६५९१०